अगस्ती ऋषी विंध्य पर्वत ओलांडून आल्यानंतर त्यांनी आपला आश्रम गोदावरीकाठी बांधला. त्यानंतर अनेक ऋषी-मुनी या भागात आले. मुद्गल ऋषींच्या तपश्र्चर्येने पावन झालेले मुद्गल हे गाव, गोदावरी नदीचा किनारा, वाल्मिकी ऋषींमुळे पावन झालेले वालूर (सेलू) व पांडवांपैकी पार्थाने (अर्जुनाने) वसविलेले पाथरी(पार्थपूर)-अशा परभणी जिल्ह्यातील भागांचे उल्लेख पुराणात आहेत. याशिवाय जैनपुर(जिंतूर) हे गाव सम्राट अशोकाच्या राज्यात समाविष्ट होते. या भागाची संस्कृती प्राचीन काळापासून बहराला आली आहे.
हजार बाराशे वर्षांपूर्वीच्या विष्णूच्या, नृसिंहाच्या, सरस्वतीच्या व जैन तीर्थंकारांच्या मूर्ती या जिल्ह्यात आहेत. जगातील एक आश्र्चर्य मानावे लागेल अशी एक अधांतरी असलेली जिंतूर येथील पार्श्वनाथ भगवानांची मूर्ती हे या जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. पुरातन काळातील प्रभावती देवीच्या मंदिरावरून सध्या जिल्ह्याचे मुख्यालय असणार्या गावाला परभणी असे नाव पडले. गंगाखेड हे गाव प्राचीन काळापासून दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. संत नामदेवाची दासी असा स्वत:चा उल्लेख करणार्या संत जनाबाईंचे वास्तव्य याच जिल्ह्यात गंगाखेड येथे काही काळ होते. त्यांची समाधीही येथेच आहे.
भारताच्या स्वातंत्र्यानंतरही परभणी जिल्हा स्वतंत्र भारतात नव्हता तो निजामाच्या स्वतंत्र हैद्राबाद मध्ये होता. १३ सप्टेंबर, १९४८ रोजी म्हणजे स्वातंत्र्यानंतर साधारण १३ महिन्यांनी हैद्राबादच्या निजामावर भारतीय पोलिसांनी कारवाई केली व तो भाग भारताच्या अखत्यारीत आणला. परभणी जिल्ह्याचे १ मे १९९९ रोजी विभाजन होऊन हिंगोली या नवीन जिल्ह्याची स्थापना झाली.
Leave a Reply