कृष्णेचा रमणीय काठ लाभलेल्या सांगली या गावात सहा गल्ल्या किंवा भाग असल्याने याचे नाव सांगली पडले असे मानले जाते. सुरुवातीला सातारा जिल्ह्याचा भाग असणारा सांगली जिल्हा दिनांक १ ऑगस्ट,१९४९पासून दक्षिण सातारा म्हणून ओळखला जाऊ लागला, तर २१ नोव्हेंबर, १९६० पासून स्वतंत्र सांगली जिल्हा अस्तित्वात आला. सांगली जिल्हयात ज्वारी हे प्रमुख पीक असून येथे घेतली जाणारी मालदांडी ही ज्वारीची जात विशेष प्रचलित आहे. सांगलीची हळद व येथील हळद-बाजार पूर्ण भारतात प्रसिध्द आहे. या जिल्ह्यात बारा साखर कारखाने असून सांगली येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना हा देशातील सर्वाधिक दैनिक गाळप क्षमतेचा व आशियातील सर्वांत मोठा सहकारी साखर कारखाना आहे. मराठी माणसाच्या जीवनात अढळ असे स्थान असलेल्या मराठी नाटकाचे उगमस्थान म्हणजे सांगली जिल्हा होय. येथेच विष्णुदास भावे यांनी पहिले मराठी नाटक (सीतास्वयंवर) सादर केले. उत्तम दर्जाच्या तंतूवाद्यांची निर्मिती हे सांगलीचे अद्वितीय वैशिष्ट्य आहे.