गणेशदुर्ग किल्ला – कृष्णेकाठी वसलेले सांगली शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय असून, गावात मध्यभागी गणेशदुर्ग हा किल्ला आहे. तेथे राजे अप्पासाहेब पटवर्धन यांनी १८४४ साली बांधलेले गणेशमंदिर असून याच मंदिरात लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांची स्वातंत्र्यलढ्याच्या काळात बैठक झाली होती.
कृष्णा व वारणा नद्यांचा संगम – सांगलीपासून जवळच हरिपूर येथे कृष्णा व वारणा या नद्यांचा संगम झाला असून येथील संगमेश्र्वराचे मंदिर प्रसिद्ध आहे. येथेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे स्फूर्तिस्थळ नावाचे स्मारक आहे.
मिरज – मिरज हे एक महत्त्वाचे रेल्वे जंक्शन असून येथील भुईकोट किल्ला, वानलेस मिशन दवाखाना व मीरासाहेब अवलियाचा दर्गा प्रसिद्ध आहेत.
ख्वाजा मीरासाहेब दर्गा – हा ५०० वर्षे जुना दर्गा असून, सर्व धर्मांतील व पंथातील लोक येथे दर्शनास येतात.
सागरेश्वर अभयारण्य – सांगलीजवळील सागरेश्वर अभयारण्य प्रसिद्ध आहे. खानापूर, पलूस ,वाळवा या तालुक्यांत हे अभयारण्य पसरले असून हे हरणांसाठी राखीव आहे.
चांदोली (ता. बत्तीस शिराळा) – हे धरण वारणा नदीवर बांधण्यात आलेले आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांदोली हे अभयारण्य येते. या जंगलात गवा ,अस्वल, बिबट्या हे प्राणी आढळतात.
औदुंबर – सांगली जिल्ह्यातील औदुंबर येथील कृष्णाकाठचे दत्त मंदिर. औदुंबर येथे राहूनच प्रसिद्ध कवी सुधांशू यांनी काव्य साधना केली.
शिराळा – सांगलीपासून सुमारे ७६ कि. मी. अंतरावर असलेले शिराळा गाव तेथील नागपंचमीच्या उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. नागपंचमीच्या दिवशी येथे नागसापांची मिरवणूक काढली जाते.
कृष्णा व्हॅली वाईन पार्क – सांगली जिल्ह्याने अलीकडेच वाईन निर्मितीत पाउल टाकले आहे. येथे उत्तम दर्जाची वाईन निर्मिती होते.
याचबरोबर पेंटलोद येथील प्रचितगड , बाणूरचा भूपाळगड, तासगावचे गणपती मंदिर, कवठे-एकंद येथील सिद्धारामाचे मंदिर व त्या ठिकाणी दसऱ्याच्या वेळी रात्रभर होणारी फटाक्यांची आतषबाजी विशेष प्रसिद्ध आहे. दांडोबा येथील उंच टेकडीवर शंकराचे प्राचीन मंदिर आहे.
Leave a Reply