खूप चांगला विषय निवडला गेला आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर जो आपले विचार, भावना, कथा, कविता अगदी रुचकरपणे वाचकांपर्यंत पोहचवतो तो साहित्यिक. साहित्य हा शब्द व्यापक आहे. यामध्ये सगळे विश्व सामावले आहे म्हणले तरी चालेल. कारण या साहित्याच्या जोरावर संस्कृती जपली गेली आहे. साहित्य हे कला, ज्ञान, शास्त्राने युक्त आहे. याची उपासना करून त्यात भर घालणारे ते साहित्यिक.
अगदी मराठी भाषेबाबत बोलायचे झाले तर तिला अभिजात दर्जा सरकार दरबारी प्राप्त करून घेण्याची वेळ आली. एक तर नकळत पणे तिला मिळालेले दुय्यम स्थान आणि आपल्याच भाषेची आपल्याला वाटणारी लाज. अशी वेळ का आली असावी? तर नक्कीच वाचन संस्कृती मागे पडली. सद्य स्थितीत तिला उर्जितावस्था आणण्यासाठी, संवर्धनासाठी जो हिरीरीने लिहिता होतो तो साहित्यिक. याचा संबंध निश्चितच दर्जाशीच जोडला जातो. सवंग लिखाण दीर्घकाळ टिकाव धरू शकत नाही. ज्याला वाचक वर्ग मिळतो तो साहित्यिक ही थोडी उथळ व्याख्या होईल. अन्यथा उडदामाजी काळे गोरे, काय निवडावे निवडणारे असे होईल. अभिरुचीपूर्ण समाज घडविण्याची ताकद ज्याच्या लेखणीत आहे तो साहित्यिक.
रंगभूमीवर प्रायोगिक आणि व्यावसायिक असे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत. म्हणजे एक दर्जेदार तर दुसरे दर्जाहीन नव्हे. फक्त फरक लोकप्रियतेचा, प्रयोगशीलतेचा आहे. तसेच या साहित्य क्षेत्रातही जाणवते असे थोडे धाडसी विधान मला करावे वाटते. प्रायोगिक रंगभूमीने अनेक नावाजलेले कलाकार व्यवसायिक रंगभूमीला दिले. तद्वतच अशा छोट्या मोठ्या प्रमाणात लिखाण करणारे प्रायोगिक लेखक, कवी हे सुद्धा साहित्य परंपरेचे नवीन वारकरी असून ‘आम्ही साहित्यिक’ हे त्यांना मिळालेले खुले व्यासपीठ आहे. जिथे ही परंपरा रुजवली जाते, जोपासली जाते, वृद्धिंगत होते. मग या वारीच्या वारकऱ्यांना साहित्यिक म्हणणे नक्किच उचित आहे. अर्थात इथेही हौशे, नौशे आणि गवशे असतातच. परंतु दिंडी पुढे जाते हे महत्वाचे. उद्देश जेवढा उत्तुंग असेल तेवढे प्रयत्न ही मोलाचे असतात.
अर्थात ज्यांना याची जाण आहे, आवड आहे आणि स्वयं प्रेरणेने जे लिहिते होतात ते साहित्यिक. आपली संस्कृती, विचारधारा यांचे नवनिर्माण जे करतात ते साहित्यिक. यातून जो मार्ग किंवा सोपान तयार होतो तो एका पिढीला दुसर्या पिढीपर्यंत पोहोचवतो. साहित्यिक असा दुवा आहे जो बौद्धिक, सामाजिक, आर्थिक आणि कलात्मक दृष्टया समाजमन घडविण्याच्या प्रक्रियेचा एक भाग असतो.
तलवारीचे पाते आणि लेखणी यांना दुधारी शस्त्र म्हणतात. तलवार तर आता इतिहासजमा झाली. परंतु लेखणी अजून तळपते आहे. कारण तिच्यात कालानुरूप बदल झाला. याचे श्रेय साहित्यिकांना जाते.
इथे बोलायचे झाले तर हे व्यासपीठ आम्ही साहित्यिक ने उपलब्ध करून दिले. जिथे दर्जा टिकवला जातो. उत्कृष्ठ साहित्य व साहित्यिकांची इथे मांदियाळी आहे. तसेच अश्लील साहित्य, साहित्य चौर्य या प्रकाराला बाहेरचा रस्ता दाखवला जातो. म्हणजे इथे साहित्यिकच घडतो असे म्हणायला हरकत नाही. धन्यवाद.
— सौ रश्मी थोरात
Mrs. Rashmi Thorat
Leave a Reply