प्रश्न तसा छोटासा आहे.उत्तरमात्र व्यक्तिभिन्न असू शकतं.याठिकाणी साहित्यिक या शब्दाचा शब्दशः अर्थ घेतला तर स्वतःचे विचार, अनुभव,आलेले प्रसंग कथा कविता,लेख,उतारा,सुविचार, छोटेमोठे लेख अशा नानाविध पद्धतीने शब्दबद्ध करणे.मग ते मौखिक लिखीत वा विविध माध्यमांतून व्यक्त केलेले विचार असतील.हे सारं साहित्यंच आहे.
अर्थात व्यक्त होताना कधीकधी अपसूर लागतो नाही होत तेवढं दमदार शब्दबद्ध पण यात व्यक्त होण्याच्या प्रामाणिकपणा अत्यंत महत्त्वाचा आहे.तो मतितार्थ लोकांच्या ह्रदयापर्यंत पोहोचणं महत्त्वाचं असतं.निश्चितच आपण ज्ञानोबा,नाथ तुकोबा रामदास या व तत्कालीन शेकडो साहित्यिकांचा वारसा आपल्या मराठी विश्वाला लाभला आहे.कधीकधी असं म्हटलं जातं की,यांच्यानंतर कुणी काहीही लिहिलं नसतं तरी चाललं असतं.तरीही त्यानंतर विपुल लेखन झालंच ना ? प्रत्येक जेष्ठ साहित्यिक कधीतरी नवोदित होतेच.धडपड करूनच ते मोठे झाले व सातत्याने त्यांनी विचारांची कास धरून परिवर्तनाचे स्वप्न उराशी बांधून अविरत कार्य करीत राहीले.तेंव्हा प्रत्येकाने मनापासून मनातलं मनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा आणि जो प्रांजळपणे असा प्रयत्न करतो तो साहित्यिक आहेच.आमच्याकडे तुलना करण्यांची पद्धत आहे.नका करु ती.काळानुरुप केवळ विचार, विचार करण्याची पद्धतीचं नव्हे तर व्यक्त होण्याची माध्यमंही बदलली आहेत.क्षणात आम्ही जगाच्या व्यासपीठावर व्यक्त होऊ शकतो.इतका बदल होतोय.
साहित्यातील विविध विषय केवळ कपोलकल्पित रम्यतेपेक्षा,पोकळ आदर्शवत लेखन करण्यापेक्षा लोकांना किती आवडेल यापेक्षा स्वतः ला किती रुचेल.आपण ते किती पचवलंय याचा विचार होणं गरजेचं आहे.लोक आजही खुप चांगलं वाचताहेत.कसदार लिहलं जावं. समाजातील वास्तवाचं प्रतिबिंब लेखणीतून साकारायला हवं.आज खुप लोक अतिशय सुंदर लेखन करंत आहेत त्यांना सन्मानाचं व्यासपीठ जर आम्ही साहित्यिक या नावाने मिळत असेल तर चांगलं आहे ना ?
लोकांना प्रभावित करण्यासाठी काही लिहिण्याचा प्रयत्न करुच नये.केवळ पोपटपंची लेखनही करु नये.वाड.मय चौर्य करु नये.कारण सिंहाची कातडी पांघरुण कोणी सिंह बनंत नाही.कोणत्याही, व्यक्ती गट वा समाजाची खुशामत ही साहित्यात असू नये, समाजात किल्मिश वाचा तेढ समज गैरसमज पसरवण्याचे ही लेखन असू नये.आपल्या शब्दांमधून लोकांना जीवना तील हरवलेले सूर गवसले पाहिजे,निखळ मनोरंजन व्हावे तसेच ऊर्जादायी लेखन असावे.करतो कोणी लेखनाची धडपड तर चुका दाखवण्यापेक्षा त्यातलं चांगलं शोधून प्रोत्साहन देण्याचं जाणतेपण दाखवावे. नसेल पटला एखादा विचार तर त्यांच्या आणखी साहित्या चे वाचन करुन मग त्याला मार्गदर्शन केले तर बरंच काही घडू शकतं.
लिहतो तो साहित्यिक.असं म्हणता येणार नाही पण ती त्यांची सुरुवात असते.तेंव्हा व्यक्त व्हायलाच हवं.यातून अनेक गोष्टी व विचारांचे आदानप्रदान होते. जेष्ठांनी थोडंसं संयमानी घ्यावं.नव्यांनी थोडं अभ्यासोनी प्रगटावे.घाई करु नये .वाचनाचा व्यासंग हवा.लेखनाचा सराव व अनुभवाचं गाठोडे जवळ ठेवून लिहावं अगदी मनापासून.मग आपण सारेच साहित्यिक आहात.
तुम्ही किती शब्दांत लिहिता यापेक्षा किती महत्त्वाचे लिहिता किंवा दर्जेदार लिहिता हे महत्त्वाचे असल्याने तसा लिहिण्याचा प्रयत्न करु या ना.असं मला वाटतं.चलातर लिहित राहूया…
— रविंद्र देशमुख
Ravindra Deshmukh
Leave a Reply