साहित्य शारदेच्या प्रत्येक उपासकाला साहित्यिक म्हणतात.
ज्याला स्वतःचे असे काही सुचते, गद्य किंवा पद्य वाङ्मयनिर्मिती करता येते त्या कोणालाही साहित्यिक म्हणता येते. खूप मोठी ग्रंथसंपदा निर्माण केल्यावर किंवा साहित्य संमेलनात सहभाग घेतल्यावरच माणूस साहित्यिक होतो असे नाही.
ज्याला ज्याला वाङ्मय सृजनशीलता आहे तो साहित्यिक. चार ओळींची कविता (चारोळी) ही साहित्यच आहे. कारण त्यातून त्या कवींच्या भावना प्रगट होतात.
जो मनातल्या भावना किंवा आपले विचार बोलून व्यक्त करतो तो वक्ता आणि तेच जो लिहून व्यक्त करतो तो साहित्यिक. (अर्थात भाषणे लिहून देणाऱ्याला साहित्यिक म्हणता येणार नाही)
मुळात साहित्यिक हा शब्द तरी कसा निर्माण झाला असेल? साहित्य म्हणजे काय? आपल्या सामान सुमानालाही आपण साहित्यच म्हणतो की. मग वाङ्मयनिर्मितीला साहित्य का म्हटले जाते. ते मला अद्याप तरी ठाऊक नाही. पण साहित्य ह्या शब्दाला एक विशिष्ट दर्जा आहे. जेव्हा आपण एखाद्या लेखसंग्रह, कवितासंग्रह किंवा तत्सम वाङ्मयप्रकाराला साहित्य म्हणतो तेव्हा त्याला एक विशिष्ट दर्जा असतो. काहीतरी अर्थ असतो. त्यात जीवनाची मूल्ये सामावलेली असतात. म्हणून ते साहित्य म्हटले जाते. नाहीतर सिनेमातल्या टुकार गाण्यांनाही साहित्य असे म्हणावे लागेल.
तसेच असे दर्जेदार लिखाण करणारा तो साहित्यिक.
साहित्यिक कोणीही कधीही होऊ शकतो. त्याला स्थळ, काळ, आणि शिक्षणाचे बंधन नाही. त्यासाठी भाषेचा सखोल अभ्यासच हवा असेही नाही. भरपूर शब्द संग्रह आणि सूत्रबद्ध मांडणी मात्र पाहिजे.
साहित्य सर्वसामान्य मनाला भावणारे, सहज आकलन होणारे असावे. उगीच काहीतरी लिहायचे म्हणून जड जड आणि अर्थहीन कल्पनातीत शब्दांचा भडिमार करायचा, सर्व रस त्यात कोंबून भरायचे आणि त्याला आकर्षक वेष्टन लावायचे की झाले साहित्य असा गैरसमज असतो.
सर्वसामान्य लोकांच्या बुद्धीच्या पल्याडवरून जाणाऱ्या अश्या साहित्याला मात्र तशाच प्रकारचे अवजड लिहीणाऱ्या इतर साहित्यिकांकडून भरपूर वाहवा मिळते. पण तसले साहित्य दीर्घकाळ टिकत नाही.
आचार्य अत्रे, पु ल देशपांडे आणि त्यांच्या सारख्या अनेक साहित्यिकांचे वाङ्मय इतक्या वर्षांनी आजही टिकून आहे आणि तितकेच ते नवीन वाटते कारण त्यांची भाषाशैली सहज सोपी आहे. मनाला अलगद भिडणारी आहे. जीवनाचे मर्म सांगणारी आणि सर्वसामान्य लोकांना आपली वाटणारी आहे. म्हणून ते थोर साहित्यिक झाले.
कोणतेही साहित्य प्रकार वाचताना लोकांना ते आपले वाटायला हवे. मनात हा विचार यायला हवा की अरे ही तर आपलीच कहाणी, आपल्या मनातलेच हे विचार आहेत, आपल्याच जीवनाचा सारांश आहे. जेव्हा असा विचार वाचकांच्या मनात येतो तेव्हाच ते साहित्य लोकप्रिय होते. त्याला वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो. साहित्यिकाला त्याच्या निर्मितीची तीच तर पावती मिळते.
तरीही लोकप्रियता म्हणजे काही अंतिम नाही हेही तितकेच खरे. कारण असेही अनेक उत्तम साहित्यिक आहेत की ज्यांचे साहित्य उच्च दर्जाचे असूनही त्यांना म्हणावी तितकी लोकप्रियता मिळत नाही. म्हणून काय त्यांची निर्मिती कमी दर्जाची आहे असे म्हणता येणार नाही. वाचकांच्या आवडीनिवडी आणि आकलनशक्ती प्रमाणे साहित्यिकांना प्रतिसाद मिळत असतो.
साहित्यिक म्हणजे काय ह्याची व्याख्या अशीही करता येईल की जो स्वतःच्या आनंदासाठी, स्वतःच्या कल्पनाशक्तीने वाङ्मयनिर्मिती करतो त्याला साहित्यिक म्हणता येईल. आपण लिहिलेले आपल्यालाच आवडले नाही तर जगाला कसे आवडणार? आणि आपल्याला आवडले पण जगाला जरी नाही आवडले तरी काय फिकीर? असा साहित्यिक खरा साहित्यिक म्हटला पाहिजे.
आजकाल स्वतःच्या आनंदापेक्षा लोकांना काय आणि कसे आवडेल आणि साहित्यिक म्हणून माझे नाव कसे होईल, मानसन्मान कसा मिळेल ह्यासाठी साहित्य निर्मिती होत आहे.
कितीही डोके खाजवून स्वतःला काही सुचले नाही तर मग आहेच वाङ्मयचौर्य. दुसऱ्याचे सुंदर लिखाण स्वतःचे म्हणून मिरवायचे आणि खोटी प्रशंसा आणि प्रसिद्धी मिळवायची. म्हणजे स्वतःला मूल होत नाही म्हणून दुसऱ्याचे मूल त्याच्या नकळत उचलून आणायचे आणि स्वतःला बाप म्हणवून घ्यायचे असाच प्रकार आहे हा. साहित्यातल्या अश्या भुरट्या चोरांचा उद्योग पूर्वापार चालत आलेला आहे, त्याला सध्याचा जमाना तरी अपवाद कसा राहणार.
प्रशंसा, प्रसिद्धी आणि पैसा मिळवण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब करणारे फक्त राजकारणातच आहेत असे नाही तर साहित्य विश्वातही भरपूर आहेत. त्यांची चोरी कधी उघडकीस येते तर कधी येतही नाही. मात्र चोरलेल्या साहित्यावर खूप दिवस हवेत उडू शकत नाहीत हे साहित्यचोर.
कारण साहित्य हे प्रत्येक साहित्यिकांची स्वनिर्मिती असते. बुद्धी आणि मनाच्या संगमातून उत्तम साहित्याचा उगम होतो. त्याची छाप त्या साहित्यावर दिसून येते. प्रत्येक साहित्यिकांची स्वतःची एक शैली असते. त्यामुळे जे साहित्य आणि साहित्यिक अस्सल आहेत तेच टिकतात बाकीचे काळाच्या ओघात विस्मरणात जातात.
साहित्यिक हे समाज सुधारणेचे कार्यही आपल्या लेखणीतून करत असतात. समाजात क्रांती घडवणारे, निराश मनाला आशा देणारे, दुखीताच्या चेहेऱ्यावर हास्य फुलवणारे, विसरलेल्या प्रेमाची आठवण करून देणारे, मनातल्या हळव्या कोपऱ्याला हळुवार जपणारे इत्यादी अनेक प्रकारचे साहित्य निर्माण करून समाजोपयोगी कार्यही साहित्यिक आपल्या समर्थ लेखणीने करत असतात. तेच खरे साहित्यिक.
आजकाल वेगवेगळ्या माध्यमांची संख्या भरमसाठ वाढली आहे त्यामुळे एकाच वेळी अनेकांपर्यंत आपले विचार पोहोचवणे सहज शक्य झाले आहे. मात्र त्याचा योग्य वापर होताना दिसत नाही. कारण आपले उत्तम विचार किंवा सुंदर निर्मिती लोकांपर्यंत पोहोचवतानाच त्याला प्रतिसाद किती मिळतो ह्यावरच जास्त भर देण्यात येतो. माध्यम समूहांवर ज्याला भरपूर वाहवा मिळाली नाही तर त्याच्या मनात नाराजी निर्माण होते. आणि ज्याला भरपूर वाहवा मिळाली ते सुमार दर्जाचे का असेना त्याला आपण मोठे साहित्यिक झाल्यासारखे वाटते. पण अशी वाहवा किंवा प्रशंसा मिळणे हे साहित्याचा दर्जा ठरवणारे प्रमाण असू शकत नाही.
नवसाहित्यिकाला पाठीवर मिळालेली कौतुकाची थाप हवीच असते, वाचकांचा उत्तम प्रतिसाद हे तर नवनिर्मितीसाठी टॉनिकच असते, प्रेरणादायी असते. त्यामुळे अधिक जोमाने अधिक उत्तम साहित्य निर्मिती होण्यास बळ मिळते. पण त्यासाठी संयमही नवसाहित्यिकांकडे पाहिजे. साहित्य निर्मिती एक साधना आहे, आणि साहित्य हे साधन आहे. साहित्य शारदेची उपासना आणि तपश्चर्या केल्याविना झट की पट साहित्यिक होता येत नाही. त्याला साहित्यिक असे म्हणता येत नाही.
ज्याला भाषेची जाण आहे आणि भाषा समृद्ध व्हावी, भाषेची सर्वांगीण प्रगती व्हावी, भाषिक स्पर्धेमध्ये आपली भाषा टिकून राहावी असे वाटते तो साहित्यिक. कारण असे नुसते मनात वाटून काय उपयोग आहे. त्यासाठी भाषेत उत्तमोत्तम निर्मितीही व्हायला हवी. मातृभाषेव्यतिरिक्त इतर भाषांमधून वाङ्मयनिर्मिती करणारेही असतात. त्यांनी त्या भाषेवर उत्तम प्रभुत्व मिळवलेले असते म्हणून तर ते त्या भाषेतून लिहू शकतात. तेही साहित्यिकच होय. त्यामुळे ज्याला ज्याला काही नवनवीन असे स्वतःचे काही सुचते तो साहित्यिक असतो.
मला तरी असे वाटते की, साहित्य निर्मिती म्हणजे स्वहित(आनंद) निर्मिती होय आणि त्या आनंदाचा निर्माता आणि वितरक तो स्वहित्यिक किंवा साहित्यिक.
टीप:- ‘आम्ही साहित्यिक’ समूहातील प्रत्येक सदस्य हा साहित्यिकच होय.
#हास्यतुषार
— तुषार संजय राणा
Tushar Sanjay Rana
Leave a Reply