“ए ताई तुझ्या आजोबांचं पत्र आलयं”.. अशी पोस्टमन काकांची हाक ऐकायला आली की मी हातातलं सगळचं सोडून पळत जायचे.. आणि आण्णांचे(बाबांचे बाबा) पोस्ट कार्ड आलेले एका दमात वाचून काढायचे… माझे ताई आण्णा (बाबांचे आई बाबा..माझे आजी आजोबा) दिंडोरी.. जिल्हा नाशिक इथे रहायचे.. तेव्हा फोन नव्हते.. मग आण्णा आजोबा दर आठवड्याला एक छान अक्षरात पत्र लिहून पाठवायचे.. मला पत्र लिहीताना “चि. स्वरुपास… अनेक उत्तम आशिर्वाद..” अशी सुरवात करुन… सुंदर पत्र लिहायचे… आणि शेवट… आपला.. आण्णा.. अशी करायचे..आण्णा प्रत्येक आठवड्यात कधी बाबा कधी आई कधी मानसी अशा आम्हा प्रत्येकाच्या नावाने पत्र पाठवायचे.. त्या पत्रातून त्यांचा मायेचा ओलावा कायमच जाणवायचा…
आण्णा शाळेची परिक्षा असो.. वाढदिवस असो.. कधी रिझल्ट लागलेला असो.. किंवा कधी आईला प्रमोशन मिळालेले असो..सतत पत्रातून ख्यालीखुशाली विचारत असायचे…कधी पत्र यायला उशीर झाला तर आम्हाला चुकचुकायला व्हायचे.. मग पोस्टमन काका दिसले की.. “काका आजोबांचे पत्र नाही आले का” अशी भुणभुण करायचे मी.. तेव्हा पोस्टमन काका ओळखीचे होते… तेही न थकता माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यायचे..”नाही ग ताई पत्र आले की लगेच देईन हो तुला”असं सांगून सायकल भरभर पुढे घेऊन जायचे…
जशी मोठी होत गेले तशी आण्णांना पत्रोत्तर करत गेले…पत्रलेखनामुळे मला ही मराठी व्याकरण लिखाणाचा नकळत सराव व्हायचा..
आण्णांच्या हस्ताक्षरातील पत्रे माझ्या डोंबिवलीच्या घरी आईकडे आहेत….
आण्णा २००४ मध्ये वारले… आणि अखंडित पत्रांची शृंखला खंडित झाली……
सुवाच्च हस्ताक्षरातील पत्रलेखनाची जागा ईमेल ने घेतली.. पण मायेचा ओलावा काही ईमेल देऊ शकले नाहीत.. हे कडवट असलं तरी सत्य आहे..
आजच्या टपाल दिनाच्या निमित्ताने लहानपणीचं हळवं स्मृतिपटलं उलगडलं गेलं..
© स्वरुपा जोशी, मुंबई
९ ऑक्टोबर २०२०
— स्वरुपा रामदासी जोशी
Swarupa Ramdasi Joshi
लेखाची लिंक : https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/4113775831972134/
प्रोफाईल लिंक : https://www.facebook.com/swarupa.joshi?
Leave a Reply