प्रिय सूनबाई,
स.आ.
आम्ही जेंव्हा प्रथम तुमच्याकडे येऊन गेलो, तेंव्हा मनात खळबळ उडाली. मला जाणवले की आता माझी भूमिका बदलणार आहे. १९७९ ते २०१२ या मोठ्या कालावधीत मीच या कुटुंबाची सर्वेसर्वा होते. संसारातील अनेक जबाबदाऱ्या पार पाडत, अनेक चढ उतार, सुखदुःख सहन करत हा संसार, अनेक चांगल्या वाईट लोकांशी सामोरे जात, आम्ही दोघांनी एका विशिष्ट बिंदू वर आणून स्थिर केला. आता मात्र दोन सुशिक्षित, सुसंस्कारित मुलांच्या चांगल्या भविष्या व्यतिरिक्त मनात दुसरे काही येत नाही.
तुमच्या घरी आल्यावर असं वाटलं की, आपल्याला ज्या पठडीतील मुलगी सून म्हणून हवी आहे ती इथे गवसेल. कुठेही जादा भपका, दिखाऊपणा नसलेले साधे सुधे सुसंस्कारित कुटुंब! असे पहिले इंप्रेशन झाले तेच कायम रहावे ही अपेक्षा आहे.
सूनबाई, आपल्या घरीही असेच वातावरण असणार आहे त्यामुळे, आपण फार वेगळ्या ठिकाणी पडलो असे तुला वाटणार नाही. इकडे आल्यावर
तुला तुझ्या वैयक्तिक प्रगतीसाठी दाही दिशा खुल्या आहेत. अजूनही तू खूप लहान आहेस शिकण्यासाठी तुझ्या पुढे खूप काही पडले आहे आणि त्यात स्वतःची तू मनापासून प्रगती करून घ्यावी असे आम्हा सर्वांना वाटते. माप ओलांडून घरात येताना पूर्वग्रहदूषित मनाने न येता, स्वच्छ मनाने, कोऱ्या पाटीवर सुंदर जीवनाची कोरीव मुळाक्षरे रेखण्यासाठी, लक्ष्मीच्या पावलाने घरात पाऊल टाक आणि सर्व मंगलमय कर. आमच्या घरात अतिशय मन मोकळे वातावरण आहे थट्टा मस्करी, enjoyment हाआमच्या घरचा स्थायीभाव आहे परंतु त्यातून मोठ्यांचा अनादर कधीच होणार नाही याची आम्ही काळजी घेतो.
आजपर्यंत वेगवेगळ्या वातावरणात वाढलेल्या तुम्हाला एकमेकांना समजून घेऊन लग्न बंधन शेवटपर्यंत निभावून न्यायचे आहे. लग्नामुळे एक मुलगी एक मुलगा यांचेच जीवन नव्याने सुरु होते असे नाही तर त्यांच्या समवेतच त्यांचे आईवडिल, भाऊ बहिण यांच्याही जीवनाचे नवे पर्व सुरू होते. नवीन नाती जोडली जातात, उभयतांकडील कडू गोड स्वभावाच्या नातवाईकांशी संबंध येतो. अशावेळी आपण संयमाने खंबीर राहणे महत्त्वाचे, गरजेचे असते लग्नानंतर उभयतांनी एकमेकांचा परिवार जोडून त्यांच्याशी त्यांच्या मानाप्रमाणे सन्मानाने वागून कर्तव्ये पार पाडावी. एकमेकांच्या आईवडिलांना स्वतःचे आईवडील समजून आदराने वागावे सासूला नुसते “आई” संबोधून, आई मुलीचे नाते जुळत नसते त्यातील ओलावा महत्त्वाचा! याची आपण दोघींनीही जाणीव ठेवावी. दोन्ही बाजूनी समान देवाणघेवाण झाली तरच नाते दृढ होऊन त्याची फळे दीर्घ काळापर्यंत चाखता येतील. एका हाताने टाळी वाजत नाही. तद्वतच जीवन गाणेही एका हाताने लयबध्द होत नाही. माझे जीवन सूर, लय, तालाशी निगडीत आहे तसेच तुलाही त्याची जाण असल्याचे कळले.
लग्नानंतर आपण कुणाच्या तरी फक्त सहधर्मचारिणी होतो असं नव्हे तर, कुणाची सून, कुणाची वहिनी, कुणाची काकू, मामी, आत्याही होणार असतो. ही सर्व नाती अतिशय नाजुक असून त्यांना सांभाळणे जिकिरीचे असते. त्यासाठी स्वतःजवळ खूपसा समंजसपणा तसेच शांतपणा असणे गरजेचे असते. सहजीवनात प्रामाणिक पणा, निष्ठा, पारदर्शकता या गुणांची, संसार नौका पार करण्यास फार मदत होते. संशयाच्या भूताला जवळ सुध्दा फिरकू द्यायचे नाही. कधी कडक शिस्तीने तर कधी हळूवार पणे संसारतल्या गोष्टी हाताळाव्या लागतात. तुझी आई, बाळबोध वळणाची आणि सुसंस्कारित असल्याचे जाणवले तिचीच true copy तू असणार अशी मला खात्री वाटते. राग काहीच कामाच नसतो. रागावर जितका संयम ठेवशील तेवढे आपले जीवन सुसह्य होते.
आता थोडे माझ्या गुणी लेकाविषयी, अतिशय मोकळ्या स्वभावाचा आहे ग तो! प्रत्येक गोष्टीला विनोदाची झालर लावून वातावरण हल्कं फुल्कं करण्याची त्याची हातोटी काही आगळीवेगळीच आहे. त्यामुळे कुठलेही टेन्शन, टेन्शन रहात नाही. त्याचा हा अनमोल गुणस्वभाव कायमस्वरूपी रहाण्याची जबाबदारी आपणच घेऊया. घरातील वातावरण गढूळ न होऊ द्यायचे काम स्त्रीचे असते .रबराला तुटू न देता किती ताणायचे ते आपल्याच हातात असते. त्याच्या चांगुलपणाला दाद दे, मान दे गैरफायदा घेऊ नको. तो खूप रसिक आहे. कदर कर त्याची! तुला उपदेशाचे खूप खूप डोस पाजते असं वाटतंय ना? पण तसं नाही. संसारात पाऊल पडण्यापूर्वी संसाराच्या गुरूकिल्लीची ओळख करून देत आहे.
आता थोडं आम्हा दोघांविषयी…. आम्ही सहा बहिणी. एकच भाऊ! मुलींची संख्या जास्त असल्याने आईला जो त्रास सहन करावा लागला त्याची परिणती म्हणून की काय आपल्याला मुलगी नकोच अशी मानसिकता झालेली आणि घडले ही तसेच दोन मुलगेच झाले. पुढे काळ जसाजसा सरकत गेला तसे मुलगी नसल्याचे तोटे जाणवू लागले. त्यातूनच येणाऱ्या सूनेला आपली मुलगीच बनवायचे असा पक्का विचार केला. पण सासू सून हे नातेच खूप बदनाम! त्यामुळे सून, मुलगी होऊ शकेल का? ही शंका मनात भेडसावत होती. मला तरी तुला मुलगीच बनवायचे आहे. तुला काय बनायचे आहे ते तू ठरव. होणारे सासरे तर देवमाणूसच! अतिशय कुशाग्र बुध्दीचे, मोठ्या मनाचे परंतु रागीट. त्यांच्या वेळा सांभाळल्या तर काहीच प्रश्न नसतो .
अंथरूण पाहून पाय पसरणारे आम्ही! तेंव्हा ऐक हं! घरातली मोठी सून, लक्ष्मी, सखी, मैत्रीण आणि मुलगी बनून घरात प्रवेश कर सगळं कसं सुकर होऊन जाईल!
तुझी भावी
आई.
— वेदवती कोगेकर
Vedavti Kogekar
लेखाची लिंक : https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/4109278155755235/
प्रोफाईल लिंक : https://www.facebook.com/vedavti.kogekar?
Leave a Reply