पत्र… एक हळवी आठवण…
लहानपणी खेळ असायचा .. आईचं पत्र हरवलं.. ते मला सापडलं.. खुप गंमत वाटायची… घरी येणार पोस्ट कार्ड … आकाशी रंगाचे आंतरदेशीय पत्र … वाचायला मजा यायची… आई साठी कधी मामाचं.. तर बाबांंसाठी आत्या , काका यांची पत्रंं हमखास यायची… सुख दुःख वाटुन घेण्याचं एक साधन म्हणजे पत्र होतं..
टपाल घेऊन येणारे पोस्टमन काका पण चांगले ओळखीचे झालेले असायचे…. नाही म्हटले तरी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले होते… उन्हाळ्यात झाडावरचे चार सहा आंबे आवर्जून त्यांना दिले जायचे.. दसरा दिवाळी च्या वेळी न मागता वडील पाकीट आणि आई फराळ भेट द्यायची… पोस्टमन काकांचा तो खाकी गणवेश भारी वाटायचा… त्यांना बघुन कुतुहल वाटायचे.. सोबत च्या सायकल ला अडकवलेल्या खाकी बॅगमध्ये कितीतरी जणांच्या सुख दुःखाच्या भावनांची शिदोरी घेऊन न चुकता प्रत्येक पत्त्यावर सुपूर्द करत असायचे..
आम्ही बहीणी कळत्या आणि जरा बरं लिहीत्या वयाचे झालो तेव्हा मग रक्षाबंधनाच्या आधी आम्ही आमच्या चुलत, मामे भावांना राखी पाठवताना सोबत चार ओळींचा मजकूर पाठवत असे… खरं तर त्या चार ओळीत प्रेम …माया …आठवण.. सगळंच सामावून जात असायचं..
कोणाचं आलेलं पत्र वाचताना मन हरखून जायचं… कित्येक वर्षे आमचा शालेय निकाल ही पोस्टाने यायचा.. तेव्हा कॉलनीमध्ये पोस्टमन काका दिसले की धाकधूक व्हायला लागायची …जणु काही त्या निकालाच्या बंद पाकिटात आमचा जीवच ठेवला आहे…आता आठवलं की हसु येते…पण तेव्हा चांगलाच घाम फुटायचा…
घाम फुटण्यावरुन आठवलं…तार … काही महत्त्वाच्या … तातडीच्या निरोप संपर्कासाठी वापरण्यात येणारे एक टपालच होते… अगदी दोन ओळी असायच्या .पण पोस्टमन काका “तार आहे ” म्हटल्यावर पहिल्यांदा नात्यातील सगळी वयस्कर मंडळी डोळ्या समोर येत असतं
… मनात शंकेची पाल चुकचुकायची… कोणाचं तरी दुःख निधन झालं असायचं …हो..कारण ‘तार ‘ या माध्यमाचा वापर एक तर अशा काही गोष्टीसाठी होत किंवा देश रक्षणासाठी कर्तव्य बजावणारे सैनिक.. सुट्टी वर आल्यावर सीमेवर बोलावणे आल्यावर होत असे….
मला आठवतं मी लहान असताना आईची एक चुलत बहीण वारली होती… आम्ही परगावी राहायला… त्यामुळे मामाने पोस्ट कार्ड वर लाल रंगाच्या शाईने अगदी मोजक्या शब्दात दुःखद निधनाची बातमी लिहीली होती..आई पत्र वाचताना रडत होती म्हणून कळाले काही तरी वाईट बातमी आहे..पण तिने वाचून लगेचच फाडून टाकले.. तिच्याजवळ विचारणा केली असता कळाले …अशी दुःखदायक बातमी लाल रंगाच्या शाईने लिहायची पद्धत आहे… आणि अशा दुःखाची आठवण कशाला ठेवायची म्हणुन पत्र (पोस्ट कार्ड) फाडून टाकले होते..आताच्या मुलांना ह्या गोष्टी सांगितल्या तर हसतात.. मुलाला सहज म्हटलं आता हे ऑनलाईन पैसे .. पाठवण्याची पद्धत.आली….पण आमच्या लहानपणीची मनीऑर्डर म्हणजे लॉटरीच लागल्याचा आनंद होत असायचा… एकदा वडीलांच्या कोणत्या तरी लेखाला बक्षिस मिळालं होतं..त्याची रूपये ५० /- अशी मनीऑर्डर पोस्टमन काका घेऊन आले होते…त्या काळात असे ५० रुपये पण किती मोठे होते.. मनीऑर्डरच्या रुपात लॉटरी लागल्याचा आनंद अनुभवला होता… गंमतीचा भाग सोडा…पण एखाद्याची निकड कळाल्यावर मनीऑर्डर पाठवून त्याची गरज पुर्तता करण्यासाठी पुर्वी मनीऑर्डर एक उत्तम माध्यम होते…
टपालमध्येही फरक होता.. म्हणजे मोजक्या शब्दात लिहायचं असेल तर पोस्ट कार्ड वापरायचं…थोडं अधिक लिहण्यासाठी आंतरदेशीय पत्र वापर होत असे.. आणि खुपच भावना ओथंबून जात असतील आणि अगदी खाजगी मजकूर असेल तर पोस्ट पाकीट असायचे.. तुम्ही कागदावर किती ही लिहून त्या पाकीटात भरुन वरती ठराविक स्टॅम्प लावला की झालं ….अशी सुरेख भावनिक लिखाणाची वर्गवारी केली होती…
शेवटी पत्र म्हणजे काय तर… आपल्या मनातील भावना, विचार…मत… अपेक्षित व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचे लिखित स्वरूपातील माध्यम…
हळूहळू मोठ होतं .… शाळेत लिहीलेली औपचारिक ..अन औपचारिक पत्र परीक्षेत मार्क मिळवुन देत असे… पैकीच्या पैकी मार्क मिळायचे नाहीत..पण त्यासाठी मेहनत घेतली जायची..खरी….
मायना.. तारीख … विषय .. पत्ता… अभिवादन…शेवट … इत्यादी तपशिलांच्या जागा ठरलेल्या असायच्या…आणि सुवाच्च अक्षरात लिहीलेला मजकूर.. पैकीच्या पैकी गुण कधी मिळाले नाही..कारण कुठे तरी कमी ही असायचीच…
शैक्षणिक वर्षात मार्क मिळवण्यासाठी लिहीलेली पत्र पुढे फार काही उपयोगात आली नाही.. असं म्हणता येणार नाही … कधी कुठे अर्ज करायला.. आणि आता मुलाला शिकवताना .एवढाचं.काय तो … उपयोग झाला खरा…
पत्र आणि फोन मध्ये किती फरक आहे ना… तुम्ही म्हणाल फोन वर जलद आणि पटकन चुटकीसरशी संवाद साधला जातो…तर मला वाटतं फोन वर आपण बोलतो.. खरा संवाद तर आपण पत्रा मधुन साधतो..लिहीलेली अक्षरे समोर फेर धरून भावना व्यक्त करत असतात.. किती सुंदर असतं पुन्हा पुन्हा पत्र वाचताना मन त्या व्यक्तीला समोर उभं करत असतं..
माझी फार इच्छा होती हो…बाकी काही नाही निदान प्रेमपत्र तरी लिहावे…पण आमचं प्रेम जुळले या डिजिटल युगात… नुसत्या मेसेजेस वर तहान भागवली… हो…
शैक्षणिक जीवन जी काही थोडीफार पत्र लिहीली ती गुण मिळवण्याच्या लालसेने…
पण आता मुलाला त्याच्या प्रत्येक वाढदिवसाला माझ्या कडून एक पत्र . ..माझ्या त्याच्याविषयीच्या भावना लिखित स्वरूपात भेट देत असते.. मला त्याच्या बद्दल काय वाटते… किंवा.. आतापर्यंत कुठे चुक सुधारायला हवी…याबाबत अगदी खेळीमेळीच्या शब्दाने मार्गदर्शन करत असते… उद्या जेव्हा मी नसेल या जगात तेव्हा ही पत्र त्याची मी (आई) म्हणून सोबत करतील…
आताच्या डिजिटल युगात …त्या हळव्या पत्राची जागा मोबाईलच्या मेसेज ने घेतली खरी…पण त्या पत्रातील शब्दांचा ओलावा या मेसेजच्या इमोजी मध्ये नाही मिळतं.. बरोबर आहे ना..
— प्रिती ब्रिजेश नाईक
Priti Naik
लेखाची लिंक : https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/4111495432200174/
प्रोफाईल लिंक : https://www.facebook.com/priti.naik.52?
Leave a Reply