गंगा गवळी (Ganga Gawali)

आज सकाळी सहजच मैत्रिणीचं स्टेटस पाहत होते स्टेटसला पोस्टमन आणि टपालचे सुरेख चित्र होते. त्यात लिहिले होते, “जागतिक टपाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा” वाचताना मन भूतकाळात गेले. खरंच काळाच्या ओघात आपण किती गोष्टी विसरलो… त्यापैकीच एक म्हणजे पत्र. लहानपणीचे गाणे आठवले मामाचे पत्र हरवले खरंय आज मामाचे पत्र खरचं हरवलं….

काही दशकांपूर्वी सोशल मीडियाचा उगम झालेला नव्हता तेव्हा गावागावात, नातेवाईकांमध्ये संपर्क साधण्याचा दुवा म्हणजे पत्र आणि पोस्टमन.. सासरी असलेली मुलगी, शिक्षण किंवा नोकरीनिमित्त दूर असलेली मुलं, जवळचे नातेवाईक यांच्या संदेशासाठी पोस्टमनची चातकासारखी आतुरतेने वाट पाहिली जायची. तेव्हा अनेक म्हातारी माणसं निरक्षर होती मग, कुणा नातेवाईकाच्या पत्राला उत्तर द्यायचे असेल तेव्हा गावातील एखाद्या मुलाकडून किंवा पोस्टमन कडूनच लिहून/वाचून घेत असत. पत्रामध्ये माणसं काळजातून व्यक्त होत असत. पत्राच्या सुरुवाती ला तीर्थरूप तीर्थस्वरूप चिरंजीव प्रिय भाऊ,बहीण मित्र इ.. किती आदराने लिहिले जात असे…

आज पत्रलेखन मराठी, इंग्रजी, हिंदी या विषयांच्या अभ्यासा पुरते मर्यादित झाले आहे…. आज सोशल मीडियाद्वारे दिल्या जाणाऱ्या संदेशामध्ये पत्रातील प्रेमाचा ओलावा दिसून येत नाही..

मला आजही आठवते लहानपणी माझा मोठा भाऊ शासकीय विद्यानिकेतन स्कूल मध्ये पाचवीत असतानाच धुळ्याला शिकायला गेला.त्यावेळी त्याच्या खुशालीच्या पत्रासाठी आई वडील आणि आम्ही बहिणी पोस्टमन ची किती आतुरतेने वाट पाहत असू… त्याच्या पत्राला विलंब झाला की आई कित्येकदा पोस्टमन च्या घरी जाऊन काळजीने विचारणा करत असे. … दिवाळी आणि मे च्या सुट्या लागल्या की आम्ही मैत्रिणी भेटकार्ड, पत्र किती मोत्यांच्या अक्षराने सजवून पाठवत होतो.. खरंच त्या पत्रांमध्ये किती मायेची ऊब होती…

आज सोशल मीडियाद्वारे माणसं किती जवळ आली असे वाटत असले तरी त्यात प्रेमाचा ओलावा काळजातून दिसून येत नाही….

 

— गंगा गवळी

Ganga Gawali

लेखाची लिंक : https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/4114006621949055/

प्रोफाईल लिंक : https://www.facebook.com/ganga.gawali.56?  

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*