ती – ए पोरा.. शुक शुक…अरे ऐकलंस का?…
मी हा आवाज कुणीकडून येतोय हे पहात होतो.
ती -अरे इथेतिथे काय बघतोयस? मी बघ तुझ्यासमोर …
मी बघतो तर समोर एक लाल डबडं डोक्यावर लालकाळी टोपी, कंबरेला टाळं खोचलेलं, खिशावर बालवाडीतल्या लहानग्या मुलांच्या खिशाला सेप्टी पिनने टोचतात तसा तिचा पत्ता टोचलेला. तोंड सताड उघडं…
तिथूनच ती आवाज देत होती. दादरच्या पारशी काॕलनीतल्या अग्यारीसमोर ऊभी होती ती एका कोनाड्यात कुणाची तरी वाट पहात. होय, तीच आवाज देत होती मला. तिचा आवाज ऐकून तिच्यापाशी थांबलो. काहीतरी सांगायचं होतं तिला मला….
पुन्हा ती – अरे असा बघतोयस काय, मी काय म्हणते ते तरी ऐक!
मी म्हटलं बोला…अगदी दिलखुलास बोला, मी ऐकतोय अन् मग ती बोलू लागली.
तुझं मायेचं, हक्काचं किंवा मग कुठल्याही नात्याचं कुणी इथे कुठेही किंवा मग गावी रहातं का? ज्याला तुम्हाला एखादी आनंदाची बातमी कळवायची आहे, कुणाची ख्यालीखुशाली जाणून घ्यायची आहे का? एखादं शुभेच्छापत्र किंवा मग तातडीची तार वगैरे? काहीतरी असेल कुणासाठी तरी पाठवण्याजोगं? मी वाट पहातेय हो केव्हापासून…हे तोंड त्याचसाठी सताड उघडं ठेवलय, कि कुणीतरी येईल अन् एखादंतरी पत्र माझ्या पोटात टाकेल आणि ते न्यायला माझा धनी येईल, खाकी कपडे घालून डोक्यावर टोपी नी सोबत सायकल घेऊन मला भेटायला, तुमचा लाडका पोस्टमनकाका. मग तो उघडेल माझ्या कमरेला लटकवलेलं टाळं त्याच्याकडच्या चावीनं. माझ्या पोटात गवसेल त्याला कुणाचीतरी ख्यालीखुशाली किंवा सुखद वा दुःखद बातमीचं पत्र. तो ही मग ते घेऊन निघून जाईल पुन्हा आपल्या वाटेनं त्या पत्रातला पत्ता शोधत ज्याचं त्याच्यापर्यंत पोचवायला. तेवढीच काय ती त्याची माझी भेट.
हल्ली तो फार क्वचितच येतो कारण माझ्याकडेही त्याला देण्यासाठी काहीच नसतं. निराश असतो तो ही हल्ली. हे ना सगळं तुमच्या त्या तंत्रज्ञानामुळे. मुडदा बशिवला तो त्या तंत्र ज्ञानाचा. नाही म्हणजे तुमच्यासाठी, जगासाठी ते चांगलंच अन् फायद्याचं आहे म्हणा. जग जवळ आणलं त्याने आणि जगात इतरत्र विखुरलेली माणसंसुद्धा. पण एक सांगू?… नाती फार सोपी करुन टाकलीत याने. नात्यातील जवळीक,ओढ, विरह, वाट पहाण्यातील गंमत, ती आस.. सारी मजा निघून गेली. एवढंच काय तुमची लिहायची सवय पण मोडली. पूर्वी गावाकडच्या घरात वाट बघत असायची मंडळी तुम्हा मुंबईकरांच्या पत्राची. मुंबईची गडबड , धावपळ सारं कळायचं इथनं पत्र पोचलं कि अन् मग तिथनं त्या पत्राचं उत्तर यायचं ज्यात अख्ख्या गावची खबरबात असायची, वाडीतल्या घटना, देवळातले उत्सव, गौरी गणपतीची, शिमग्याची आमंत्रणं, लावणी पेरणीच्या तारखा, पावसाची उघडझाप, ते अगदी म्हशी / गायींच्या बाळंतपणाचीही बातमी. डोळे ओले झाल्यावाचून रहायचे नाहीत पत्र वाचून. तेच तेच पत्र पुन्हा पुन्हा वाचून काढलं जायचं, मन आनंदून उठायचं एखादी आनंदाची बातमी वाचून अन् मग सभोवताली गोळा व्हायचा आठवणींचा गोतावळा. पण तेच जर एखादी तार धडकली कि काळजात धस्स व्हायचं.
बरीच प्रेमप्रकरणंही जुळवलीयेत बरं मी. त्या प्रेमपत्रांची खरी मजा तर त्या दोन प्रेमी जीवांनाच ठाऊक. डोळ्यात प्राण आणून पाहिली जायची पत्रांची वाट अन् आता सारं काही एका क्लिकवर येऊन ठेपलय. नुसता विडीओ काॕल केला तरी समोरचा माणूस ठणठणीत आहे का आजारी ते अगदी थेट कळतं. दूर राहूनही घरातल्या सणांना बसल्याजागेहून हजेरी लावता येते. पण यात ती मायेची उब, नात्यांचा ओलावा असतो का रे पोरा? जो पूर्वीच्या पत्रांमधे असायचा. पूर्वी काठोकाठ भरलेली असायची मी पण आता पोटात कागदाचा तुकडाही नाही.पूर्वी हे कमरेचं टाळं कुणी माझ्या पोटातली पत्र चोरु नयेत म्हणून असायचं पण आता ते कायमचं लागायची वेळ आलीय. बोलण्यासारखं बरच आहे….
असो, तुला घरी जायला उशीर होत असेल. जा तू आपल्या वाटेनं. पण कधी वाटलंच, आलीच जर कुणाची आठवण तर सहजच एखादं दोनचार ओळींच पत्र पाठवायला विसरु नकोस.
— चंदन विचारे
Chandan Vichare
लेखाची लिंक : https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/4106825459333838/
प्रोफाईल लिंक : https://www.facebook.com/chandan.vichare.1?
Leave a Reply