प्रिय पत्रा,
सस्नेह नमस्कार ….
तुला लिहिण्यास कारण की, खूप वर्ष झाली असतील ना आपण भेटलोच नाही आमच्या पिढीतला सुखदुःखाचा साक्षीदार तू… पण काळाच्या ओघात खरंच तुला विसरायला झालं. पण खरं सांगू, तुझ्या स्मृती आहेत अगदी मनाच्या पेटीत ठेवलेल्या… जसं तुला जुनी लोकं वर्षानुवर्षे जपून ठेवायची तसंच ! तशी तुझी ओळख लहानपणापासूनची पण महत्व वयाबरोबर कळत गेलं. चाळीत तर कोणाच्या घरी तू आलास तर तुझ्यातील भावनेबरोबर सारेजण सागराची लाट व्हायचे. गोड बातमीने सगळ्यांची तोंड गोड करून जायचास, तर तुझी बहीण तार-बाई हिच्या आगमनाने एक अशुभाची चाहूल लागायची आणि घरच्या हंबरड्याने चाळ हेलावून जायची. तसाच तुझा तो मनीऑर्डर भाऊ… स्वतःला फार श्रीमंत समजायचा आणि ज्याच्या घरी येईल त्यांना तो क्षणात मोठा करून जायचा.
गावी राहणारे आई बाबा तर तुझ्यावर जीव ओवाळून टाकायचे. कारण त्यांच्या लेकराची खुशाली तूच सांगत होतास. अजून एक गमतीची गोष्ट… चोरून केलेल्या प्रेमाचा साक्षीदारही तूच होतास. त्यामुळे पहिल्या चुंबनाचा मान तुलाच मिळायचा आणि लाजेने तुझी घडी लाल व्हायची. या साऱ्या गोष्टीत आम्हाला तुझी आठवण जास्त कधी यायची माहित आहे ? त्या शाळेच्या वयात वार्षिक परीक्षा संपून निकालाची वेळ यायची तेव्हा. आम्ही चातकासारखी वाट पाहायचो आणि पोस्टमन काकांच्या मागून फिरायचो. जेव्हा निकाल हाती यायचा तेव्हा मारलेल्या उडीला आभाळ सुद्धा स्पर्श करायचं ! नोकरी लागल्याचा निरोप आणलास की तुझी अगदी देवापुढे ठेवून पूजा व्हायची, तेव्हा तुला धन्य वाटलं असेल ना !
पण हळूहळू हे सगळं कमी होत गेलं कारण संपर्काची वेगवेगळी साधने आली. वेगवान जीवनाच्या भोवऱ्यात माणूस अडकला. त्या मृगजळात भरकटू लागला आणि तुझ्यापासून लांब होत गेला. कसं वाटलं असेल ना तुला ? पण खरं सांगू तुझ्यातुन ओलावणारा ओलावा आता मिळेनासा झालाय … उरलाय तो यंत्राचा होणारा कोरडा स्पर्श आणि हाय-हॅलोचा एक साचेबंद स्वर.
तुझी खुप आठवण येते…एक सखा म्हणून, नातलग, मार्गदर्शक तसेच मायेने विचारपूस करणारा, सुखातल्या क्षणांना गोड करणारा आणि दुःखात सांत्वनाची फुंकर घालून धीर देणारा तूच. एक जिव्हाळ्याचं नातं होतं आपलं ! खरंच… ये ना पुन्हा भेटायला… आपण पुन्हा एकत्र येऊ, विझत चाललेल्या भावनांना पुनरुज्जीवित करू आणि “येरे येरे पावसा”च्या चालीवर तुलाही म्हणावेसे वाटते “येरे येरे पत्रा, माझ्या जिवलग मित्रा”. खरच… येरे, तुझी खूप गरज आहे. या झोपलेल्या समाजाला, मन मारून जगणार्या लोकांना. ये खरच ये… एकदा अगदी मनापासून तुझी वाट पाहतेय.
तुला सामावणाऱ्या लाल मावशीला, तुला भेटवणाऱ्या पोस्टमन काकांना माझा नमस्कार सांग.
कळावे, लोभ असावा.
तुझी चाहती,
अमिता.
काय सांगू कशी जमली
या लाल पेटीशी मैत्री
तिच्यामध्ये सामावलेली
समिश्र भावनांची जंत्री
कस वाटत असेल तिला
आज घडीला बदलताना
बदललेल्या माणसांच्या
भावना समजून घेताना
पण खर सांगू
२५पैशाच्या कार्डाची
सर नाही कशाला
डिजिटलच्या दूनियेत
माणूस मुकलाय ओलाव्याला
साधने बदलली माणसं बदलली
E Mail, चॅटिंग आले कितीही
पत्राची जागा मात्र कधीच कोणी घेणार नाही
— अमिता राणे
Amita Bagwe Rane
लेखाची लिंक : https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/4120863124596738/
प्रोफाईल लिंक : https://www.facebook.com/amita.b.rane
Leave a Reply