खरे तर साहित्यिक कोण ह्यावर चर्चा करणेच मनाला पटत नाही.एखाद व्यक्ती जेंव्हा आपल्या भावना लेखनात द्वारे व्यक्त करते ,मग ते लिखाण गद्दयात,किंवा पद्यात असो आणि ह्या त्या व्यक्तीच्या भावना जेंव्हा सामान्य माणसाच्या मनाला भिडतात ,तेच खरं साहित्य !
“आम्हा घरी धन!शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे!यंत्राने करु!!
शब्दची आमुच्या!जीविचे जीवन, शब्दे वाटू धन!जनलोका!!
तुकाराम महाराजांच्या ह्या अभंगात साहित्यिकांचे वर्णन खऱ्या अर्थाने केले आहे. त्याच प्रमाणे निरक्षर असलेल्या बहिणाबाईंच्या समाज मनाला भिडणाऱ्या ,रोजच्या जगण्यातून जाणवणाऱ्या सुख-दु:खाची भावना करुन देणाऱ्या ओव्या म्हणजे साहित्याचा अप्रतीम अविष्कार होय. ज्ञानेश्र्वर,तुकाराम, रामदास ह्या संतांनी ,स्वत: सोसलेल्या यातना,समाजांनी केलेली अवहेलना ह्याचं कुठलंही प्रतीबिंब त्यांच्या साहित्यात दिसत नाही तर समाजाला ज्ञानी कसे होता येईल ह्याचे वर्णन ज्ञानेश्र्वरी, तुकारामांच्यी गाथा, रामदासांच्या दासबोधात होते .हेच खरे साहित्यिक.
नुसते लिखाण करणारे साहित्यिक होत नाहीत ,तर त्या साहित्याला दाद देणारे वाचक हे देखील एक प्रकारे साहित्यिकच होत.
आपल्या कथा,कादंबऱ्यातून, लेखातून ,आपल्या भावना व्यक्त करणारे साहित्यिक हे समाजाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करणारे,समाजाचं प्रतीबिंब दाखवणारे असे साहित्यिक.
अनेक वेळा सामान्य माणूस सुद्धा आपल्या आजूबाजूच्या जिवनाचे अस्तित्व आपल्या विचारातून ,आपल्या लिखाणातून व्यतीत करत असतो ,तो सुद्धा साहित्यिक च होय . अनेक शिक्षक एखादी कविता,किंवा लेखकाचा धडा विद्यार्थ्याला समजावून देतांना त्याचे रसग्रहण करुन सांगतात,मग ते शिक्षक साहित्यिक नव्हे काय?
एक आठवण सांगते.एक इंजिनिअर व्यक्ती सरकारी नोकरीत कामाला होते.अनेक चांगल्या योजना त्यांनी राबवलेल्या होत्या.एका खेडेगावातील पाण्याचा प्रश्र्न त्यांनी त्या गांवात नळ आणून सोडवला होता. नळातून सहज येणारे धो,धो पाणी पाहून गावकऱ्यांना जो आनंद झाला ,त्यांचे वर्णन त्या इंजिनिअर नी एक कादंबरी लिहून त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. आज ते लेखक ह्यात नाहीत.
म्हणजे या पृथ्वी वरील कोणतिही व्यक्ती समाजाचं प्रतिबिंब आपल्या काव्यातून, अभंगातून,किंवा लिखाणातून दाखवत समाजाला मार्गदर्शन करते साहित्यिक ,लेखक म्हणून!मग ती व्यक्ती शिकलेली असो वा निरक्षर!!
— अरुणा साधू
Aruna Sadhu
Leave a Reply