माझे स्वर्गीय सासरे ह्यांना
मुंबई
दिनांक – १०-१०-२०२०
कै. ती. श्री. काकांना
शि.सा.नमस्कार..
काय लिहावे कळत नाही.तुम्हाला मी पाहिले नाही.आमच्या लग्नाच्या आधीच तुम्ही स्वर्गवासी झालात त्यामुळे मी सुन व तुम्ही सासरे म्हणून ,तुमचा सहवास मला लाभला नाही.पण वन्संकडून, ह्यांच्या कडून तुमच्याबद्दल खूप ऐकलं आहे.हे खूप तुमच्या आठवणी सांगायचे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर ह्या गावांत तुमचं सगळं आयुष्य गेलं.तिथल्या एम्प्रेस मिलमधे तुम्ही ड्राप्समन होतात असं ह्यांनी सांगितलं होतं.मी टेक्सटाइल डिझाईन चा कोर्स केला तेंव्हा वन्स म्हणाल्या होत्या की “काकांना फार कौतुक वाटलं असतं.” घराण्याचे गुण पुढच्या पिढीत येतात म्हणतात… खरंच आहे कारण हे(अरूण साधू) छान चित्र काढायचे.आता तुमची नात चित्रकार आहे.तेच शिक्षण तिने घेतलं आहे.शिक्षणाचे महत्त्व तुम्हाला खूप वाटायचे, त्यामुळेच आपल्या तुटपुंज्या पगारात तुम्ही तुमच्या पुतण्याला इंजिनिअर केलंंत. पुन्हा ह्याचं श्रेय न घेता पुतण्या इंजिनिअर झाला. म्हणून भरुन पावला होतात तुम्ही.
काका तुम्ही ,पत्नी निधनानंतर सगळ्या मुलांना एकट्याने कसे सांभाळले असेल…हा विचार मनांत येतो.पत्नी वियोगाचं दु:ख सहन करत असतांना तुमची दोन मुलं अचानक गेल्याची कथा ह्यांनी मला सांगितली होती.नंतर वन्संच लग्न झाल्यावर मुलांना एकट्याने कसे सांभाळावे… शिवाय मिलमधील नोकरी,संसाराचा गाडा तुमच्या एकट्यावरच होता.मग मुलांना मामाकडे ठेवले.बापाचं प्रेम..शिवाय आईविना पोरं ह्याची खंत तुम्हाला सतत जाणवायची.भाऊजी तर अगदी तान्हे होते. त्यामुळे ह्यांना ‘केसरी ‘त नोकरी लागल्यावर, “सगळ्यांनी एकत्र राहू ” असा तुमचा आग्रह होता.अर्थात हे मला तुमची पत्र वाचून समजलं. खरंच आज सगळे असते तर आपले साधू कुटुंब केव्हडे मोठे असते. मनातला हा विचार मनातच राहायला. कुणाजवळ मन मोकळं करावं म्हणून तुम्ही ह्यांना पत्र पाठवून मनातील भावना व्यक्त करायचे. नोकरी लागल्यावर ह्यांनी बहीणीला दिवाळीची भेट म्हणून साडी पाठवली होती.त्याचा तुम्हाला केवढा आनंद झाला होता…आपण हे करु शकलो नाही म्हणून वाईट वाटत होते तुम्हाला , पण मुलगा आपले कर्तव्य पार पाडतो याचा आनंद तुम्हाला झाला होता. आजही ती पत्र आपल्या घरी जपून ठेवली आहेत.वाचतांना अश्रु अनावर होतात.
काका, तुम्हाला आपलं कुटुंब एकत्र राहावं असं वाटत होतं. पण नियतीच्या मनांत वेगळंच होतं तुमच्या अचानक जाण्याने सगळंच थांबलं. योगायोग असा की, तुमच्या निधनाची तारीख आणि दोन्ही मुलांंच्या जन्माची तारीख एकच…१७ जून…. त्यामुळे दोघेही भाऊ स्वत:चा जन्मदिवस साजरा करायचे नाही. ही तुमची इच्छा तुम्ही स्वर्गात पूर्ण केली. म्हणून दोन्ही मुलं मुलगी ह्यांना बोलावून घेतलं कां? काका,तुम्ही तुमच्या मुलांच्या सोबत एकत्र आहात. पण मी तुमची सुन, तुमची नातवंडं , पतवंड एकटी आहोत. तुमच्या सगळ्यांच्या आठवणी मनांत जपत आहोत. स्वर्गातून आमच्यावर आशिर्वाद असूद्या.
तुम्ही न पाहिलेली तुमची सुन
तुमच्या अरुणची पत्नी
अरुणा साधू.(मुंबई)
— अरुणा साधू
Aruna Sadhu
लेखाची लिंक : https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/4117147681634949/
प्रोफाईल लिंक : https://www.facebook.com/aruna.sadhu.313?
Leave a Reply