तिर्थरुप बाबास,
चेपूचा सा. नमस्कार..
बाबा, आज तुम्ही हयात नाही,
मातीआड लोटले. पण आठवणींची साठवण खोल-खोल मनात दडून बसलेली आहे. तेवीस वर्षाचा काळ लोटला तरी आजही तुम्ही नसण्याचा खालीपणा जाणवतो. स्वत:च्या आई-बाबाला न पाहिलेले तुम्ही. मोठ्या भावाला सांभाळणे जड झाले आणि तुम्हाला घरातून काढून टाकले. हे आईने मला सांगितले होते. तुमच्या भटकंतीने तुम्हाला नवीन जीवन दिले, नोकरी लागली, लग्न केले आणि आम्ही तीन भावंडे झालो. छान चालले होते सर्व तुमचे आमच्याकडे पूरेपूर लक्ष होते. काय लागते ते सर्व पुरवायचे. तुमचे भाऊ ज्यांनी घरातून हाकलून लावले, ते देखील तुमच्या नोकरी लागल्याने व पैशाच्या मोहापायी जवळ आले.
पण नियतीचे फासे बघा ! तुम्हाला दारुच्या व्यसनाने जखडले. चांगला माणूस म्हणून तुम्हचे सर्व गुणगान करत होते. कारण तुम्ही कुणाला त्रास दिला नाही. तरीदेखील कळत नकळत तुमच्या पिण्याने तुमच्याच कुटूंबाला नाहक त्रास झाला. ते व्यसनंच असं होते की, घरी एक पैसा येत नव्हता. पण माझ्या मायमाऊलीने गरीबीच्या चटक्याचे तेही दिवस काढले. तुम्हाला आमचे दु:ख कधी दिसत नव्हते का बाबा ? दिसत असेलही कदाचित पण…तुमचं व्यसन तुम्हाला गिळत होते. घराकडे दुर्लक्ष, घर कसं चालते आहे याचीही जाणीव तुम्हाला नव्हती. अंगावर वर्षोनवर्ष त्याच कपड्यांनी दिवसं ..बायको-पोरं काढत आहे. कपड्यांचं जाऊ द्या हो पण घरात खायलाही काही नसायचं कधी कधी..उसनवारी करुन आई लोणचे-भात आम्हाला वाढतं होती. हे लिहतांनाही डोळे पाणावतात.. परिस्थितीशी झगडून आज आम्ही स्थिरावले आहोत. याची जाण नेहमीच राहील.
आठवतं मला मी नववीत असतांनाच अचानक तुमची तब्येत खराब झाली. आधीच तुम्हाला फीटचा त्रास वरुन पिल्याने तुमचे लिव्हर खराब झाले, रक्ताचं पाणी झालं. तुम्ही आम्हाला सोडून कायमचे अग्नीत विलीन झाले. ते चित्र आजही डोळ्यासमोर ताजंच वाटते. मी जेव्हा दवाखान्यात तुम्हाला भेटायला आली तर, तुमचा माझ्याकडे उठणारा हात व डोळ्यातून निघणारे पाणी सांगून गेले. ‘ मला माफ करा, तुमच्यासाठी काहीही करु शकलो नाही.’ तेव्हा मला खऱ्या अर्थाने एका बापाची लाचारी दिसली. ज्याने जबाबदारी तर घेतली पण पूर्ण करण्यास असमर्थ ठरला. तशी मी तुमचा खूप राग करायची. मला पिणारे सहन होत नव्हते, आजही होत नाही. पण तो राग तेव्हापुरताच होता.
तुमचं मला चेपू म्हणनं, नाकाला प्रेमाने ओढणं, मेरा बच्चा म्हणनंं..पण मी रागात तुम्हाला बाजूला ढकलणं. सर्व आठवते बाबा. तुमचं आवडतं गाणं जे तुम्ही नेहमी म्हणायचे, ‘ आदमी मुसाफिर है, आता है जाता है. आते जाते रास्ते में ..वो यादे छोड जाता है ‘ ..खरयं हो ! तुम्ही कायमचे मुसाफिर झाले. तुम्ही गेल्यानंतर आमची काही वर्ष जी परवड झाली ती शब्दात सांगणे कठीण. जिथे गरज बापाची तिथे न दिसणारा बाप जाणवू लागला. मग ती शाळेची कामं असो, बॅंकेची, की इतर ..पदोपदी संघर्ष आम्हाला शिकवत होता. तो काळही आम्ही काढला. आज स्थिर जरी असलो तरी तुमचं नसणं. कुठेतरी खाली-खाली, शोधूनही न मिळणारा बाप न् मायेची थाप रडवून सोडते. तुम्ही असते तर काही गोष्टी मनाविरुद्ध करणंही भाग पडले नसते. तुम्ही असते तर ! पण तुम्ही आहे आसपास बनून आमची आस. डोळे शोधतील तुमची नेहमीच वाट !!
खूप आहे मांडण्यासारखं पण आता शब्द मुके व्हायला आले, बस्
तुमची चेपू
— माधुरी लेनगुरे
Madhuri Lengure
लेखाची लिंक : https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/4113341095348941/
प्रोफाईल लिंक : https://www.facebook.com/madhuri.lengure.9?
Leave a Reply