” डाकिया डाक लाया ”
असं कुठल्यातरी चित्रपटातील एक गाणं होतं. सायकल वर खाकी युनिफॉर्म घालून नेटाने सायकल हाणीत घरोघरी पत्र वाटणारा तो पोस्टमन मला नेहमी आठवायचा या गाण्यामुळे . खरंच ते दिवस होते पोष्टमन चे वाट पाहण्याचे. त्याच्या सायकल ची घंटी लांबून जरी वाजली तरी आम्ही उत्सुकतेने बाहेर यायचो. अनेक सुख-दुःखाचे क्षण दिले या पोस्टमन / पोष्टाने.
आम्ही लहानपणी खेडेगावात रहात असल्याने पोष्टमन आम्हाला नावानिशी ओळखत होते. मी Income-tax Dept. ची interview देऊन आले होते नुकतीच आणि एक दिवस मी दुसरी कडे कुठे तरी अॅप्लिकेशन पोस्टात पोष्ट करण्या साठी पोष्ट ऑफिस मध्ये गेले होते, तर पोष्टमन काका तिथंच दोन पायावर फरशी वर टपाल सॉरटिंग करत बसले होते. मला म्हणाले अगं तुझं इन्कम-टॅक्स चं काहीतरी आलंय बघ, आणि माझ्या हातात लिफाफा दिला. मी धडधडत्या काळजाने बघितला . त्यात कसला तरी फॉर्म भरून पाठवायचा होता. नंतर कळले की ज्याला appointment मिळणार आहे त्याच्या कडून हा फॉर्म आधी भरून मागवतात म्हणे, पोलीस चौकशी पण होते गुप्तपणे वगैरे. आम्ही या सर्व बाबतीत अनभिज्ञ होतो .नंतर जेव्हा जॉईन व्हायची ऑर्डर आली तेव्हा पोष्टमन काकांनी किती आनंदाने ती ऑर्डर घरी आणून दिली होती. आमच्या आनंदात सहभागी झाले होते.
एकदा मी माहेरी गेले असताना, माझं ऑफिस चं काही तरी urgent हाऊस बिल्डिंग ऍडव्हान्स बद्दलच लेटर आलं, तर आमच्या वडिलांच्या घराला कुलूप होतं, तर पोष्टमन ने विचार केला की माझ्या मोठ्या बहिणीचं नुकतंच नविन घर झालं होतं, तर तिकडे गेले असतील आम्ही सगळे असा विचार करून बिचारे पोष्टमन काका सायकल हाणीत इतक्या लाम्ब तिकडे आले मला शोधीत. इतकं प्रेम , आपुलकी, जिव्हाळा आता कुठं बघायला मिळतो?
आमच्या वडिलांना तर हा विरंगुळाच असायचा आम्हा मुलींची आलेली, किंवा बाहेरगावी शिकायला असलेल्या आमच्या भावाची पत्र वाचायचा. एकेक पत्र ते 7-8 वेळा वाचायचे, आईला वाचून दाखवायचे. आठवण येईल तेव्हा पुन्हा पुन्हा वाचायचे. आमची कितीतरी पत्र त्यांनी जपून ठेवली होती. वडिलांची पत्रं ,त्यातच आईने लिहिलेल्या दोन तीन ओळी वाचताना डोळ्यात आसवांची दाटी झालेली असायची. मीही सर्वांची पत्रं कितीतरी दिवस जपून ठेवली होती. मी डिलिव्हरी साठी माहेरी गेले होते, तेव्हा मुलगा झाल्याची तार वडिलांनी माझ्या सासरी केली होती ,ती मी अजून जपून ठेवलीय.
आता मोबाईल्स/ स्मार्ट फोन्स च्या जमान्यात क्षणा क्षणाला updates मिळतात, पण एक जमाना असा होता की कोणतीही सुख- दुःखाची वार्ता पत्र रूपाने 2-3 दिवसांनी मिळायची. फार तर तार करावी लागे. पण त्या वेळी तार आली तर , कुणाची तरी निधन वार्ता च आहे असं वाटे, म्हणून त्या भानगडीत कोणी पडत नसत.
आम्ही मैत्रिणी, बहिणी, भाऊ सगळे एकमेकांना सुंदर सुंदर पत्र लिहायचो. पत्र आलं की प्रथम कुणी वाचायचं यात चढाओढ लागलेली असे.
आताच्या जमान्यात ती पत्र, त्याचं महत्व, ती पत्राची ओढ याचं काहीच वाटत नसेल, पण तो एक जमाना होता , एक पत्र आलं माया ,प्रेम करणाऱ्या माणसाचं की किती लाख मोलाचा आनंद व्हायचा. हं ssss गेले ते दिन गेले .
© नीता कुलकर्णी, हैद्राबाद
१०-१०-२०२०
— निता कुलकर्णी
Nita Kulkarni
लेखाची लिंक : https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/4116976991652018/
प्रोफाईल लिंक : https://www.facebook.com/nita.kulkarni.927?
Leave a Reply