प्रिय पत्रा
कसा आहेस रे? किती दिवसांत नव्हे वर्षांतच आपला काही संवादच नाही. कुठे असतोस हल्ली? आता तुला लिहून झाल्यावर पत्ता लिहावा लागेल म्हणून शोधत होते तुझा पत्ता. त्या निमित्ताने जुनं काय काय बघितलं गेलं. पत्त्यांच्या डायऱ्या. तुला माहितेय हल्ली कोणी असे पत्ते वगैरे लिहून ठेवतंच नाही. आमची निळी डायरी आठवतेय? शाईच्या रंगाची. आत किती पत्ते. माझ्या आईनं टिपलेले तिच्या सुंदर आणि सुवाच्य अक्षरात. अरे तुला माहितेय का? हल्ली कोणी हाती काही लिहितंच नाही बघ. मग होतात चुका शुद्धलेखनाच्या. अगदी भल्या भल्यांच्या. आता मराठीत कधी ह्रस्व कि असतो होय रे आणि हृस्व तु पण. हल्ली कित्येकदा येतो भेटीस. बरं असं म्हटलं की ऑटो करेक्ट झालं असेल ग,असं म्हणतात. तुला कळते का रे ही नवीन भाषा? इंटरनेटची वेगळी. फेसबुकची वेगळी. किती आणि काय काय सांगायचं आहेच तुला. पण तुझा पत्ता कुठे आणि कसा मिळेल रे मला?
पत्रा, मागे किती चैन होती नाही रे तुझी? कोण कोण लोकं लिहितं नाहीत तुला? काय तो तुझा तोरा! काय ती ऐट! आता बदललं नाही सगळं. तुला आठवतात का रे ते दिवस? तुझ्या तरुणपणाचा काळ तो…अहाहा!! किती रम्य होता नाही? कोणी कोणी म्हणे रक्तानं लिहितं. बाई गं. कसं नाही एकेकाचं धारिष्ट्य. ऐकावं ते नवलंच. आठवतं का रे तुला तुझं बालपण? चिठ्ठी चिठ्ठी खेळायचात म्हणे. छोट्याशा कागदावर लिहिलेली. बरेचदा शाळेत. वहीचा मागचा कागद टरकावून. दोन तीन ओळींची असे नाही. बालपण असं छोटंच असतं नाही. कधी होतं सुरु आणि कधी संपतं…कळतंच नाही. सरूनच जात एकदम. तुझं पण असंच झालं असेल, नाही का?
पण काही म्हण पत्रा, खरा मस्त काळ होता तुझ्या तारुण्याचाच… किती साजरा.मस्त. स्वच्छंदी. मनमौजी दिवस होते ते तुझे. आठवतं असतील नाही तुला? ते गुलाबी, मऊशार, रेशमी कागद. कागद कसले. प्रेयसीचे हातच जणू. किती तलम. मुलायम. आणि किती अलवार. त्यावर कळेल न कळेल असं उडवलेलं उंची अत्तरं. खसचं असे का रे? कधी गुलाबाच्या पाकळ्या. कधी सुकलेला चाफा. पण अजून दरवळणारा. काय आणि किती. एकूण भारी ऐश केलीस बेट्या तरुणपणात. मग तुला ते असं हृदयाशी गच्च कवटाळून धरणं. कधी उशीखाली दडवणं. कधी तुझी पारायणं करणं. कधी ते पत्रांतूनच भेटणं. कुठं, कुठं गेलं रे ते सगळं. ए गड्या, एक तू काय दिसेनासा झालास आणि बघ नां काय, काय आणि किती एकदम सूटूनच गेलं रे हातातून. त्या कविता. त्या आणाभाका. त्या शपथा. ती आर्जवं. ती प्रीतीची कहाणी. ती कोणी कोणाला लिहिलेली गाणी. ती वाऱ्यावरची विराणी…..ठेवलं आहेस ना रे जपून सगळं? अजूनही…. ठेवलंच असशील.
ए वेड्या. असं डोळ्यांत पाणी रे कशाला आणतोस. तुझी मुलंबाळं, नातवंडं नाव नेताहेत रे तुझं पुढं. तसं चांगलं काम करताहेत तीही. अरे आणि किती जलद. लिहिलं की पाठवलं. लगेच ह्या हृदयीचे त्या हृदयी… भावना पोचतेच रे. आणि इतकं काही बदललं नाही रे. प्रेम अजून तसंच आहे. अधीर. गहिरं. सर्वसाक्षी. अजूनही करतात लोकं. उधळून जाणारं प्रेम. तुझं नावं काढतं. कधी तुलाच साक्ष ठेवून. कधी ज्यांनी तुला अमर केलं त्यांना आदर्श मानत. आजही आहेतंच अनेक अमृता. आणि त्यांचा इमरोज. तू नसलास म्हणून काय रे झालं, पत्रा? तुझ्या नातवंडांच्या मदतीने पोचवलंच जातं बरंच काही. शेवटी दिल, दोस्ती आणि दुनियादारी कोणाला चुकलेय, सोन्या. तेव्हा आता उगाच इतक्या सुंदर दिवशी डोळ्यांतून झरायचं नाही. डोळयांनी तर बोलायचं असतं जे पत्रांतून थेट लिहिता येतं नाही.
चल, बघता बघता किती लांबलं हे माझं पत्र पण…पत्ता पण मिळाला बघ तुझा. म्हटलं नव्हतं तुला बदलतं काहीच नाही. एक काळ सोडून…..तेव्हा उलट टपाली एक मोठ्ठ पत्र लिही. वाट बघतेय बरं का?
तुझी
प्राची
— प्राची बापट
Prachi Bapat
लेखाची लिंक : https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/4114400498576334/
प्रोफाईल लिंक : https://www.facebook.com/prachi.bapat2?
Leave a Reply