लीना राजीव

खरं तर हा प्रश्नच विचारावासा वाटणं ,किंवा समजून घ्यावा वाटणं हेच जरा अनपेक्षित आहे. मानसिकता ही असते कि ,भावनांचं व्यक्त होणं हे एकतर तुम्ही संवादा मार्फत घडवू शकता कींवा लिहून … प्रत्येकाचं लेखन कौशल्य हे उत्कृष्ट असेलच असं नाही … बोली भाषा आणि लेखी भाषा यांतही फरक पडू शकतो.. बहीणा बाईं जेवढं गारुड घालतात ती भाषा किंवा मीरेची भजनं ही उत्कटतेची उदाहरणं पण त्यांनी कुठे अभ्यास करुन विचार पुर्वक लिहीलं होतं …?

तुम्हाला जे भावतं इतरां पर्यंत पोचवावंस वाटतं ते जितकं सहज असेल तितकं ते साहित्य रुचतं ही, वाचकांच्या मनाला भिडतं ही … व्यक्त होण्याची परीमाणं असूच शकत नाहीत …

एखाद्याच्या मनाचा थांग घेता येणं हे जेंव्हा जमतं ते खरं साहित्य … भाषा महत्वाची नाही ,उकार आकार महत्वाचे नाहीत असं नाही पण वाचतांना ते त्या घटना ते प्रसंग जगता आले पाहीजेत .. शब्दालंकारांनी देखणी असलेली साहित्यकृती कधीतरी खूप भावूनही जाते पण तो आवेग तो उद्वेग शोषत जाण्याचं सामर्थ्य असावंच सगळ्यांकडे हे होत नाही …तीच एखादी सहज सोपी कलाकृती मोहवून टाकते भारुन टाकते …मग साहित्यिक कोण …?ज्याचं लेखन आकलना पलीकडचं आहे तो कि सहज सोपं लिहीतो तो …?

नाही देता येणार याचं उत्तर ..ज्याला जे भावतं ते तो वाचतो …तुम्ही वाचकांना एका ठराविक साचे बद्धपणांत गुंतवून ,बांधून ठेवू शकत नाही .. तो त्याचा प्रश्न असतो सर्वस्वी कोणतं साहित्य वाचायचं कोणतं नाही ..

समुद्राचा ,त्याच्या खोलीचा अंदाज येईतो पर्यंत तो अनाकलनिय ,अवास्तव वाटत असतो आभासाचे किती तरी तरंग उठवत असतो पण एकदा अंदाज आला कि त्यातली निरामयता ,अलौकीकता ,अद्भुतता गूढ वाटत नाही .. तसंच वाड्मयाच्या डोहात उडी घेणारा हा समृद्ध होतांनाच परीपक्व होऊन येतो संभ्रमावस्था रहात नाही … मग त्याचं व्यक्त होणं हे समजून घेणारा ,उमजणारा हवाच …

तो वाचक किती प्रगल्भ आहे यांवर अवलंबून रहातं …

वैयक्तिक मत माझं तरी असं आहे कि ,ज्याला वाचक समजला तो खरा साहित्यिक .. बाकी सारं गौण ठरतं तुम्ही कसं लिहीता ,कोणत्या भाषेत लिहीता ,काय लिहीता …मर्म ज्याला हे समजलंय तोच खरा साहित्यिक …

© लीना राजीव
Leena Rajiv

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*