साहित्य पंढरीचे आम्हीं वारकरी
टाळ चिपळ्या हाती नसती
असे टाक बोरू वही
साहित्यपंढरीचे आम्ही वारकरी!
आम्हीं वारकरी!!
वारकऱ्यांचा जसा तो एक विठ्ठल सावळा!…तसाच आम्हा साहित्य दिंडीतल्या वारकऱ्यांचा ‘वाचक’ हाच विठ्ठल तोच माधवही सावळा!!
विठ्ठल जसा अनेक रूपांत कधी गुरू कधी आई कधी बाप तर कधी मित्र सखा असा भक्तांस दिसतो…तसाच अनेक रूपांत असतो हा वाचकरुपी परमेश्वर साहित्यिकासाठी!..
त्या विठ्ठलाची रूपे तरी किती…तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा…कधी मनःचक्षूंसमोर विटेवरी उभा विठ्ठल येतो कधी कुणाच्या नजरेस तो माधव श्याम सावळा दिसतो
तसेच वाचक अनेक रुपी आहे….शहरी भागातील मिंग्लीश आवडणारा…वर्तमान पत्री शुद्ध भाषा बोलणारा …कधीच न झोपणाऱ्या महानगरातील वाचक ज्याला त्याच्या ओळखीचं जग साहित्यात पाहायला आवडतं… काही ग्रामीण भागातील वाचक…आर्थिक,सामाजिक,भाषिक स्तर वेगळा असलेला …बोली भाषेवर अपार प्रेम असलेला तीच भाषा साहित्यकृतीत शोधणारा त्याचं जग त्याचं त्यातलं अस्तित्व शोधणारा…कुणी वाचक जुन्या पिढीचा पाईक त्या जुन्या लिखाणाला आजही शोधणारा…अनेक अनेक रूपांत वाचक असतात…कुणाला प्रेम कविता कथा आवडतात कुणाला त्या अजिबात आवडत नाहीत….कुणाला भीतीदायक भुताखेतांच्या व तत्सम गोष्टी आवडतात तर कुणाला डिटेक्टिव्ह stories… कुणी म्हणतो चंद्र सूर्य आणि त्यांच्या कविता पाहायला ऐकायला वेळ कुणाकडे आहे? इथे पोटाची आग विझवण्यात शरीर गुंतलं आहे..आमची व्यथा मांडली तर ती वाचू…थोडक्यात व्यक्ती तितक्या प्रकृती!!..
हर एक प्रकारचं लिखाण करणाऱ्याला त्याचा त्याचा खास वाचकवर्ग मिळेलच नव्हे तो मिळतोच!…तेव्हा साहित्यिक म्हणवून घेण्यास खूप वाव आहे बरं माऊली!!पांडुरंग..पांडुरंग!!
पण मग हर एक लिहिणाऱ्याला व्यक्तीला साहित्यिक म्हणावं का?…
माझ्या मते वाचकांना घडीभर #उत्तम प्रकारची #दर्जेदार करमणूक/बौद्धिक खाद्य/मनोरंजन/कल्पनाविलास काल्पनिक सफरी/वा ज्यास जशी गरज तसा रस्ता वा मार्गदर्शन वा रंजन जर कुणी करत असेल तर त्याला साहित्यिकच म्हणायला हवे….वाचकवर्गाची वाचनाची, त्यांच्या बुद्धीची, मानसिक, भावनिक,सामाजिक,सांस्कृतिक,शास्त्रीय,ऐतिहासिक तसेच इतरही विविध विषयांवरील अभ्यासाची भूक भागवण्याचे मोलाचे कार्य त्याच्याहातून घडत आहे!
परंतु काही नियम, अलिखित असले तरी पाळणं गरजेचेच आहे,माऊली!….
जसे की, #वाचक_सशक्त_सक्षम_आणि_दर्जेदार_करण्यासही हा #लेखक_कवी थोडक्यात साहित्यिक #जबाबदार राहणार असेल तर आणि #तरच_तो_साहित्यिक हे बिरुद लावण्यास योग्य असावा!…दोन अक्षरे जोडून शब्द आणि कुठले तरी दोनचार शब्द जोडून वाक्य लिहून कविता होत नसते हे प्रत्येक चारोळीकारानेही स्वतःहून लक्षात ठेवले पाहिजे!
आपले स्वलिखित आपण पोस्ट करण्याआधी #नीट #वाचून #तपासून पाहून मगच पोस्ट करणे हे ही ह्या जवाबदरीतील एक महत्वाचे कामच आहे…अन्यथा अशा लेख कविता कथा त्यांतील व्याकरण/शुद्धलेखनातील चुकांपायी त्रुटी असलेले अपूर्ण व निकृष्ट दर्जाचेच ठरतात आणि त्यांचा वाचकांपर्यंत पोचण्याचा मूळ उद्देश असफल होईल.
भलेही बोली भाषेतला लेख,कथा वा कविता असो त्यात व्याकरण शुद्धलेखन चुका असू नयेत, चपखल शब्दांचाच वापर व्हावा…चुकीचे वा ज्याबद्दल खात्री नाही अशा शब्दांचा वापर टाळावा भाषिक लहेजा मग सुरवातीपासून शेवटपर्यंत कायम ठेवावा इत्यादी छोट्या मोठ्या नियमांचे पालन करणे हे प्रत्येक लेखकाचे आद्य कर्तव्य आहेच!
युरोपात रेनेसान्स(1500-1600) हा एक शतकाचा (100वर्षे)काळ साहित्यिक चळवळी व प्रगतिकरता खूप मोलाचा मानला जातो…त्यावेळेस एक वेळ अशी आली जेव्हा इंग्लडच्या साहित्यिकांवर फ्रेंच साहित्यिकांचा त्यांच्या साहित्याचा प्रभाव वाढला…त्यावेळी फ्रेंच साहित्य हे फार अभिरुची संपन्न, उच्च दर्जाचे असे होते…परंतु विचारहीन नक्कल करू गेलेल्या इंग्लिश साहित्यिकांमुळे त्यांच्या साहित्यातील केवळ निकृष्ट दर्जाचेच नक्कल केली गेली…चुका किंवा कमतरता ह्यांचीच पुन्हा उजळणी इंग्लिश साहित्यिकांनी केली आणि त्यामुळे त्यांची साहित्यिक प्रगती खुंटली…हे होण्याचे एकमेव कारण म्हणजे सुमार दर्जाचे लेखक ज्यांची बौद्धिक आणि कलाक्षेत्रातील झेपच कमी होती त्यामुळे फक्त नक्कल करण्यावरच भर दिला गेला आणि ती ही त्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार सुमार आणि कमी दर्जाचीच केली गेली!….
ह्यातून आपण काय घ्यावे?…माऊली?
तर आपले नाणे खणखणीत आहे ना हे चांगले तपासून बघावे….एकदाच नव्हे तर वारंवार हा स्वतःला जोखण्याचा नियम अंगी बाणवावा.
म्हणजे नक्कल जरी केली तरी उत्तम दर्जाची करण्यासाठी झटले जाईल.
फार पुरातन काळी देव-दानव ह्यांच्या गोष्टी बहुतांशवेळा पद्य रूपांत लिहिल्या जायच्या कदाचित नैतिक अनैतिक गोष्टी उद्धृत करून पुढच्या पिढीला नैतिकतेच्या मार्गावर चालण्यासाठी त्या मार्गदर्शक ठरत असाव्यात.आपल्या हिंदुस्थानात रामायण महाभारत अशी खंडकाव्ये,ऋग्वेदादी चारी वेद इतकंच नव्हे तर कालानुरूप ज्या ज्या क्षेत्रात अभ्यास,शोध संशोधन झाले तेही टिपले, लिहिले गेले आहे चरक संहिता,सुकृत संहिता आपल्याला वैदक शास्त्राबद्दल ज्ञान देतात,पुढील काळात कालिदासासारखे महान कवी…
शाकुंतल सारखी अभिजात कलाकृतीही आहेत,अपल्या सगळ्यांना माहीत असणारे विमान बनवायचे तंत्रज्ञानही लिहिले गेले आहे तसेच कामसूत्रही!…परंतु ढोबळ मानाने प्राचीन काळी नैतिकतेवर आदर्शवादावर भर दिसतो.कसे वागावे ह्याचे चित्रण त्यातून प्रतीत होते…कालानुरूप लेखनकला अधिकाधिक व्यापक स्वरूपात जनसामान्यांपर्यंत तळागाळातील लोकांपर्यंत पोचली ती पोचावी म्हणून प्रयत्न केले गेले.सर्वांना वाचनाचा आनंद घेता यावा म्हणून ज्ञानेश्वर माउलींनी ज्ञानेश्वरी ची निर्मिती केली…अशारितीने हळूहळू सर्व समाज जेव्हा वाचकांच्या भूमिकेत येऊ लागला तेव्हा त्यांच्या समाजाचे, त्यांच्या जीवनशैलीचे पडसाद लेखनात उमटणे हा स्वाभाविक बदल होता….म्हणूनच आता लेखन हे आदर्शवाद नैतिकता एवढीच मूल्ये न जपता….सगळ्या प्रांतात मुशाफिरी करते!त्यामुळे चालू घडामोडी, काही विशिष्ट सामाजिक स्तरासाठी लेखन,काही शास्त्रीय उपशास्त्रीय दृष्टिकोन, असे अनेक विषय आणि क्षेत्र लेखकाला आपल्या लेखणीची चुणूक दाखवायला उपलब्ध असतात…त्यामुळे जे लिहू ते समाजभान ठेऊन लिहिले तर उत्तम प्रतिसाद मिळतो.आपले प्रभुत्व कशात कोणत्या विषयात कोणत्या भाषेवर आहे हे मात्र आत्मपरीक्षण करून समजून घेतले पाहिजे.
भारतातील बॅंकिंमचंद्र चटोपाध्याय हे इंग्रजी मध्ये कादंबरी लिहिणारे पाहिले भारतीय कादंबरीकार…आणि त्यांची “Rajmohan’s wife”ही भारतातील पहिली इंग्लिश कादंबरी!…हे सांगण्याचे उद्दिष्ट हे की बँकिंचंद्रांनी पुढील सर्व कादंबऱ्या त्यांच्या मातृभाषेतच लिहिल्या….का लिहिल्या असाव्यात बरं? कदाचित त्यांना स्वतःलाच त्यातल्या त्रुटी जाणवल्या असतील वा वाचकवर्गाच्या आवडीनुसार त्यांनी हा बदल केला असेल पण ह्याचा अर्थ असा की जबरदस्तीने केवळ ही भाषा किंवा विषय प्रसिद्धीचे वलय असलेला म्हणून लिहिले तर ते वाचकांच्या मनात फारसे उतरत नाही हे प्रत्येक सुजाण लेखकाने समजले पाहिजे..आपली कुवत, आपला आवाका पाहूनच त्यानुसार लिहिण्यासाठी साहित्यप्रकार निवडला पाहिजे..अशा काही गोष्टी सक्तीने मनापासून विचार करून जो वाचकांना दर्जेदार लेखन देईल तो नक्कीच साहित्यिक!
जाता जाता हे ही सांगावेसे वाटते की….भाषेचे पावित्र्य,त्याचे मूल्य,त्यातील रसाळपण ,ओघवती शैली, भाषेचे सौन्दर्य अबाधित ठेवणे, एवढेच नव्हे तर पुढील पिढीकडे सुपूर्द करण्याची धुरा देखील साहित्यिकांच्याच खांद्यावर आहे हे विसरून जाऊ नये!…आपण जे लिहितो तो त्या त्या वेळच्या सामाजिक, सांस्कृतिक, प्रादेशिक, प्रांतिक घडामोडींचा आरसा असतो त्यांचे काही वर्षांनी मूल्य अधिक वाढत जाते पूर्वीच्या घडामोडी, राहणीमान,सामाजिक स्थिती- स्थित्यंतरे इत्यादी गोष्टी ह्या लेखनामुळेच समजू शकतात…त्यामुळे साहित्यिक म्हणवून घेणे सोपे नव्हे माऊली!!….एक आणखी छोटा मुद्दा सांगितला पाहिजे तो म्हणजे प्रत्येक साहित्यिकाने सुजाण वाचक जरूर असावे..आपल्या सोबत दिंडीत चालणाऱ्या साहित्यिकांचे लेखनही दिलखुलास, मन संकुचित पूर्वग्रहदूषित न ठेवता वाचावे त्यावर चर्चा कराव्या. विचारांच्या देवाणघेवाणीने साहित्यमूल्य वाढण्यास,अधिक सकस निर्मितीस झाली तर मदतच होईल!!…..जर साहित्यिक म्हणवून घ्यायचे असेल तर ह्या पायऱ्या सांभाळून चढणे महत्वाचे!…
मग हरेक लेखक कवी कथाकर झालंच की साहित्यिक!
बोला पुंडलिक वरदा ……
— माधवी सटवे
Madhavi Satve
Leave a Reply