कथा, कविता, कादंबरी, ललित लेख, निबंध, नाटक या सर्व गद्य व पद्य लिखाणाला साहित्य असे म्हणता येऊ शकते. मानवी प्रतिभेचा लिखित अविष्कार म्हणजे साहित्य. कथा कादंबरी लेख कविता ललित निबंध अशा विविध प्रकारांनी जो व्यक्त होऊ पाहतो तो साहित्यिक .
या साहित्याची उपासना करणारा तो साहित्यिक. मग तो कोणत्याही भाषेत त्याची साहित्य रचना करत असेल. तो कथा लिहित असेल तो कविता लिहित असेल. तसेच तो एखादी कादंबरी लिहित असेल. कदाचित त्याच्या लिखाणाला जनमानसाची मान्यता असेल किंवा नसेल पण मान्यता नसेल तर व्यक्त होऊ नये का? साहित्यिक म्हणून लिखाण करणे आणि त्या लिखाणाला जनमानसाची मान्यता प्राप्त होणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
जी व्यक्ती सतत साहित्याच्या प्रांतात मुशाफिरी करत असेल ती साहित्यिकच आहे. मग ती विविध भाषेतील साहित्याचे आदान प्रदान करत असेल म्हणजे अनुवादक किंवा भाषांतरकार असेल तर ती साहित्यिकच आहे. अनुवादकाचे किंवा भाषांतरकारांचे काम हे खूप कठीण आहे. ज्या साहित्यिकांची मूळ रचना असेल त्याचा परकाया प्रवेश करून ते लिखाण समजून घेऊन ते आपल्या भाषेत त्या भावार्थसहित आणणे हे फार किचकट स्वरुपाचे काम आहे.
काव्यलेखनाचे आणखी वेगळे असते. ज्याक्षणी कवितेची ऊर्मी येते त्या क्षणी ती लिहिली नाही तर कधी कधी कविता अदृश्य होऊन जाते. त्यामुळे ही एक वेगळ्या प्रकारची उपासना आहे.
तसेच कादंबरी लेखन किंवा नाट्य लेखन हाही एक किचकट प्रकार आहे की ज्यासाठी तुमच्यामध्ये खूप ऊर्जा असणे आवश्यक आहे. तासंतास बैठक मारून कादंबरीची प्रकरणीच्या प्रकरणी लिहिणे किंवा नाटकाचे प्रवेशांवर प्रवेश लिहिले हे सोपे काम नव्हे त्यामुळे या साहित्य प्रकारांची निर्मिती करणाऱ्यांना साहित्यिक म्हणावेच लागेल.
तसेच चांगला वाचकही कालांतराने उत्तम साहित्यिक होऊ शकतो. कारण वाचनामुळे जी प्रगल्भता निर्माण होते ती उत्तम साहित्य निर्मिती करु शकते.
काही साहित्यिकांना वाचकवर्ग लाभतो व हळूहळू ते मोठे व श्रेष्ठ साहित्यिक बनत जातात. याचा अर्थ असा नव्हे की ज्यांच्या लिखाणाला वाचकवर्गात कमी प्रतिसाद मिळतो ते साहित्यिक नव्हेत का?
काल जे साहित्य आक्षेपार्ह होते ते आज कदाचित काळाच्या पुढे वाटते. काल जे कालानुरुप असते ते आज कालबाह्य ठरु शकते. त्यामुळे काल आज आणि उद्या कोणत्याही प्रकारचे लेखन करणारे हे त्या त्या काळातले साहित्यिकच असतात.
जेव्हा एखाद्या भाषेत होणारी साहित्य निर्मिती वाढू लागते किंवा साहित्यिकांची संख्या वाढू लागते तेव्हा त्या भाषेत बोलणार्या लोकांची संस्कृति प्रगत आणि अतिप्रगत होऊ लागलेली असते. मराठी भाषा ही आता या टप्प्याजवळ येऊन पोचली आहे.
तेव्हा आपल्या या मराठी भाषेत साहित्य निर्मिती करणाऱ्या तमाम साहित्यिकांना माझा सलाम.
— मधुरा चव्हाण
Madhura Chavan
Leave a Reply