आपल्या भाषेवर प्रेम करणारा, ती जतन करणारा आणि ती सुस्थितीत पुढच्या पिढीपर्यंत पोहचवणारा प्रत्येकजण थोडयाफार फरकाने साहित्यिक आहे असे माझं वैयक्तिक मत आहे. आज जिथे भारतीयांच्या मनात आपल्या मातृभाषेविषयी दुय्य्म भावना निर्माण होत आहे तिथे आपण आपली भाषा जतन करायला काय करतो हे खूप महत्वाचे आहे.
साहित्यिक म्हणजे केवळ साहित्य निर्माण करणारी व्यक्ती नसून उपलब्ध साहित्य मनापासून अभ्यासणारी व्यक्ती असे मला वाटले. उत्तम साहित्यिक हा केवळ उत्तम लेखक- कवी नसून तो उत्तम अभ्यासक आणि वाचक देखील असायला हवा. तरच अभ्यासातून, अनुभवातून निर्माण झालेले साहित्य हे वाचकांना बोधपर होईल आणि भावेलही. आपल्या भाषेमधल्या आणि इतर भाषांमधल्या साहित्यावर, आपण न लिहिलेल्या साहित्यावरही ईर्षा न करता भरभरून प्रेम करणारा खरा साहित्यिक म्हणता येईल. याचच मूर्तिमंत उदाहरण पाहायचे असेल तर ” निवास शांतिनिकेतन” हे आपल्या लाडक्या पु. ल देशपांडेंचं पुस्तक.
प्रत्येक लेखकाची एक वेगळी लिखाणाची शैली असते. महाराष्ट्राला तर संत साहित्यापसूनचा वारसा आहे. त्यामुळे अमुक एकच लिहिणारा साहित्यिक असे आपण म्हणू शकत नाही ; किंवा प्रत्येक लिहिणाऱ्या व्यक्तीला तिच्या लेखनासाठी प्रमाण द्यायला दिग्गज असतीलच असे नाही; तरीही आपापल्या परीने भाषा अभ्यासून व्याकरण, शुद्धलेखन, छंद , मुक्तछंद याला बगल न देता काही मांडण्याचा प्रयत्न करणाऱ्याला आपण साहित्यिक नकीच म्हणू शकतो.
मानवी भावभावनांना अक्षररुपी मूर्तरूप ज्याला द्यद्यला जमले तो साहित्यिक.
मधुरंग
— मधुरा कुलकर्णी
Madhura Kulkarni
Leave a Reply