“ऐसी अक्षरे रसिके”
विषय तर फारच विचार करण्यासारखा आहे,”साहित्यिक कोण”?
“‘राजहंसाचे चालणे।भूतली जालिया शहाणे।म्हणून काय कोणें।चालवेची ना।”
ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला आलेल्या या ओव्या लिहिणार्यांना दिलासा द्यायला पुरेशा आहेत इतरही दाखले आहेत म्हणून आम्ही आम्हाला वाटेल ते,मनात येईल ते लिहिणार आणि “आम्ही साहित्यिक”म्हणून फुशारक्या मारणार का?हे विचार करण्या सारखं आहे.
शब्द हे दुधारी शस्त्र झालंय.आजच्या सोशल मीडियाच्या जगात वावरताना तर लिहिणारांनी याचा खूप गंभीरपणे विचार करून आपले मत लिहायला हवे,मग ते साधी प्रतिक्रिया असो वा लेख!
प्राचीन काळ बघितला तर वेद,उपनिषदे,रामायण,महाभारत,भगवद्गीता
दासबीध,ज्ञानेश्वरी अशा असंख्य ग्रंथातून जीवनाचे तत्व साध्या गोष्टीतून लिहिले आहे हे खरे साहित्य!आणि ते खरे साहित्यिक!
स्वातंत्र्य पूर्व काळात निर्भीडपणे विचार व्यक्त करून लिहिणारे ते खरे साहित्यिक!केसरी,छावा, मराठा सारख्या वृत्तपत्रातून लिहिणारे खरे साहित्यिक! बोचरे मार्मिक लिखाण असो वा व्यंगचित्र!त्यातील मोजक्या 2 ओळी देखील उत्कृष्ट साहित्यच ना? मग तशाच कथा,कविता,ललित लेख लिहिणारे खरे साहित्यिक नव्हे का?
पण आजचा काळ फार वेगळा आहे.लिखाणाचे माध्यम बदलले आहे,भाषा बदलली आहे आणि जाणकार वाचक ही बदलले आहेत.
म्हणून साहित्यिकांची व्याख्या ही बदलायला हवी.
मराठी भाषा समृद्ध आहे,प्राचीन आहे,जुन्यातलं चांगलं टिकवून नव्यातलं सौन्दर्य वाढवण्यासाठी शब्दातील बदल चालतीलही पण त्यामुळे एखादा वर्ग दुखावून चालणार नाही! होय,आज जात धर्म,संप्रदायिकता नको तेवढी वाढलीय,ते कमी करण्यासाठी तसेच लिखाण आपल्याकडून होत नसेल तर कमीतकमी तेढ,गैरसमज वाढून समाज विघातक हालचाली वाढणार नाहीत याची काळजी घेऊन केलेले लिखाण करण्याची जबाबदारी लेखकावर आहे.ते शिवधनुष्य पेलणारा तो साहित्यिक।
छोटे छोटे रोजच्या जीवनातले प्रसंग, प्रवासातले गंमतीशीर अनुभव,एखाद्या गाण्याचं,सिनेमाचं परीक्षण असे कितीतरी लिखाण आपणही खूप आवडीने वाचतो.हे पण साहित्यिकच की.आणि त्यांना तितक्याच आपुलकीने दाद देणारे,छान शी प्रतिक्रिया योग्य शब्दात देणारे ही साहित्यिक च !या उलट शब्द:छल करून,तिरकस अर्थ काढून ,आरोप-प्रत्यारोप करून सामाजिक अस्थिरता निर्माण करणारांना लेखणीची किंमत कळत नसेल तर साहित्यिक कस म्हणावे?
थोडक्यात सगळ्यांना रुचेल,मनाला आनंद देईल,उभारी देईल,काहीतरी बोध घेता येईल असे सृजनशील लिखाण करणारा तो साहित्यिक!
खरे प्रतिभासंपन्न,व्यासंगी लिखाणात आणि आचरणातही नम्र,लीन असतात.वास्तववादी लिखाण तर करायचे पण मृदू,सौम्य शब्दातून ते साधणारे हवे.’जे जे उत्तम,उदात्त उन्नत ,महन्मधुर ते ते लिहिणारा तो साहित्यिक!आपल्या साहित्यातून समाजात विधायक बदल घडवून आणील तो साहित्यिक!आणि यात अर्थातच शब्दांच्या अप्रतिम रचना ,भाषा सौन्दर्य असेल तर ते लिखाण सगळ्यांनाच आवडेल.तो साहित्यिक !मग हे साहित्य आणि साहित्यिक पिढ्यानपिढ्या आदर्श बनून राहतील आणि अजरामर होतील यात शंकाच नाही! कारण “अमृतातेही पैजा जिंके “असे आमचे साहित्य आणि साहित्यिक!
अशा सर्वांना सादर प्रणाम!!
— मेघा कुलकर्णी
Megha Kulkarni
Leave a Reply