लेखक का लिहितो ? कवी कविता का करतो? ज्याला जे सुचत ते व्यक्त करावं असं वाटतं म्हणूनच ना? मनात उमलणाऱ्या भावना आणि कल्पना इतरांना कळाव्यात आणि आपल्या याच भावना आणि कल्पना विश्वात इतरांनी सुद्धा रममाण व्हावे अशी प्रत्येकाची अपेक्षा असावी असं माझे स्वतः चे तरी मत आहे. काही जण बाल वयातच लिखाणाला सुरुवात करतात तर काही जण शिक्षणाने व अनुभवाने समृध्द होत असताना किंवा झाल्यावर लिखाणाला सुरुवात करतात. माझेच उदाहरण द्यायचे झाल्यास मी माझ्या वयाची पास्तिशी ओलांडल्यावर लेख किंवा माझी प्रवासवर्णने लिहायला सुरुवात केली. सुमारे दहा वर्षांपूर्वी पाहिलेले अप्रतिम सृष्टी आणि निसर्ग सौंदर्य आणि ते पाहत असताना आलेले बरे वाईट अनुभव दहा वर्ष काय 25 वर्ष होऊन जातील तरीही विसरता येणार नाहीत. मी माझा पहिला प्रवासवर्णन पर लेख लिहल्या नंतर सगळ्यात पाहिले माझ्या आईला वाचायला पाठवला. त्या लेखावर आईने प्रतिक्रिया दिली की , बाळा मला वाचनाची आवड खूप आहे पण लिहता येत नाही तुझा लेख वाचताना आज आनंद होतोय तुझे कोणी कौतुक करो न करो माझ्यासाठी तरी तुझे लिखाण सुरू ठेव, तुला जे सुचेल आणि लिहावस वाटेल ते लिहून काढ. आईचा आशीर्वाद होता की माझ्या एका वाचकाने केलेलं कौतुक पण केवळ तिच्या एकटीच्या प्रतिक्रिये मुळे मला पुन्हा लिहावेसे वाटले एवढं मात्र खरं. मी पाहिलं तर माझ्या आईने व्हॉटसअप ग्रुपवर माझा लेख शेअर केलेला दिसला. त्याचसोबत इतर नातेवाईकांना देखील पाठवला आणि त्यांचे आलेले रिप्लाय मला सांगितले.
एखाद्या नवोदित लेखकाला किंवा कवीला स्वतःची ओळख निर्माण करायची असते. आपल कौतुक व्हावं आणि आपले साहित्य वाचले जाऊन त्याबद्दल खूप चर्चा व्हावी ही अपेक्षा असते. माझ्या बाबांच्या तोंडातून नेहमी एक म्हण ऐकत आलोय पायलीभर भात घ्या आणि मला पाटील म्हणा. हल्ली समाजमध्यामंवर पोस्ट केलेल्या साहित्यावर वाद विवाद आणि ज्या चर्चा सुरू असतात ते पाहून प्रत्येक लिहणाऱ्याने मी जे लिहले ते निमूटपणे वाचा आणि मला साहित्यिक म्हणा अशी अपेक्षा ठेवून असल्यासारखे वाटतात. पैसा प्रसिद्धी की व्यवसाय म्हणून साहित्यिक व्हायचं की आवड छंद आणि भावना व कल्पना व्यक्त करण्यासाठी साहित्यिक व्हायचं हे ज्याचे त्याने ठरवावे कारण आपण कितीही ठरवलं तरी मायबाप रसिक वाचक जेव्हा तुम्हाला डोक्यावर घेतील तेव्हाच तुम्ही खरे साहित्यिक झालेले असाल.
माझ्या लेखांवर सगळ्यांनी लाईक करावे आणि प्रतिक्रिया द्यावी या भोळ्या भाबड्या आशेचे जेव्हा निराशेत रूपांतर होते त्यावेळी प्रत्येकाने लिखाण सोडून द्यावे का? लोकांना तोच तोच पणा नकोय माहिती नसलेले आणि कल्पना न केलेले कधीही न ऐकलेले साहित्य वाचायला आवडते. शब्दांची जाणून बुजून केलेली गुंफण अलंकारांची अती रेलचेल आणि उपमांचा अतिरेक असलेले लिखाण केले म्हणजे आपल्या हातून उत्तम साहित्य निर्मिती केली गेलीय अशी भावना लेखकाची होत असेल तर अशा लेखकांना खरोखर साहित्यिक म्हणावे का?
— प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
कोन, भिवंडी, ठाणे
Pratham Ramdas Mhatre
Leave a Reply