विषय फार छान आहे.. विचार करायला लावणारा आहे. (लिहिणाऱ्या) प्रत्येक सुज्ञ माणसाला पुन्हा एकदा ते स्वतःशीच पडताळून पाहायला लावणारा आहे.
कोण साहित्यिक ?
कुणाला म्हणणार साहित्यिक?
अर्थात जो साहित्य लिहितो तो साहित्यिक, ज्याच्यामुळे साहित्यनिर्मिती होते तो साहित्यिक अशी आपण ढोबळमानाने व्याख्या करू शकतो.
पण या साहित्यनिर्मितीचे नक्की कोणते निकष असावेत हे कोण ठरवणार ? त्या साहित्यकृतीचे निर्मितीमूल्य उत्कृष्ट आहे की नाही हे कोण ठरवणार ? कारण प्रत्येकाची बुद्धी वेगळी, विचारक्षमता वेगळी, दृष्टी वेगळी, आवड निवड वेगळी आणि त्यामुळेच जो तो आपापल्या कसोटीवर ते लिखाण पारखून घेणार. आणि मग निकाल देणार. पण खरंच इतकं सोपं असतं का निकाल देणं ?
साहित्यक्षेत्रात जी मंडळी आज ज्येष्ठ श्रेष्ठ प्रथितयश आहेत ती सुद्धा कधीतरी नवखी होतीच की. या समुहात सुद्धा बरेच जण अनुभवी आहेत ज्यांचे साहित्य विश्वात स्वतःचे असे स्थान आहे. त्याचप्रमाणे अननुभवी, नवोदित सुद्धा आहेत जी आपले लिखाण लोकांनी वाचावे, आपल्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी. आपलेही साहित्यविश्वात एखादे स्वतः लिहिलेलं पुस्तक असावे अशा प्रकारची अनेक छोटी छोटी स्वप्ने उराशी बाळगून आहेत. पण मग अशा वेळी साहित्यिक कोण हा प्रश्न उरतोच.
कथा, कादंबरी, कविता, चारोळ्या, हायकू, प्रवासवर्णन, स्फुटलेखन, भाषणे, वात्रटिका, विनोद यासारखे साहित्यात बरेचसे प्रकार आहेत. त्या त्या प्रकारात स्वतःचा दबदबा असणारे लेखक सुद्धा आहेत. पण माझ्या दृष्टीने साहित्यिक या शब्दाची व्याख्या मात्र फार साधी सरळ सोपी आहे.
#साहित्यिक_कोण ?
● आपल्या मनातल्या दाटून आलेल्या भावना स्वतःच्या शैलीत, शब्दात मांडणारा आणि मनाने मुक्त होणारा तो साहित्यिक
●आपल्या चेहेऱ्यावरचा आनंद वाचकांच्या चेहेऱ्यावर हलकेच उमटवणारा आणि आपल्या डोळ्यातील दुःखाने वाचकांच्या डोळ्याच्या कडा ओलावतील असं लेखन करणारा तो साहित्यिक.
● आपल्या लेखनाच्या आवेगाने त्यातल्या भावनांतून स्थळ, काळ, परिस्थितीचे भान हरपून वाचणाऱ्याला बेभान व्हायला अगतिक करणारा तो साहित्यिक
●अज्ञानरुपी अंधारातून चालणाऱ्या प्रवाशांना आपल्या ज्ञानाने वाट दाखवून, खाचखळग्यातून बाहेर काढून वाचकाला समृद्ध करणारा तो साहित्यिक
●माणसाच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वाचकांच्या चेहेऱ्यावर आपल्या शब्दांतून काही क्षण हास्य फुलवणारा तो साहित्यिक.
●एखाद्याच्या नैराश्याने पिचलेल्या, खचलेल्या मनाला आपल्या शब्दांतून उभारी देणारा, जगण्याची नवी दिशा देणारा, कोणत्याही संकटांना सामोरे जाण्याचे मानसिक बळ देणारा, कोणीतरी आपल्या पाठीशी आहे असा विश्वास ज्यांच्याबद्दल वाटावा तो साहित्यिक.
●असेना का लिहिलेली एखादीच ओळ, पण ती ओळ वाचून लोकांना ती आपल्याच आयुष्याचा एक भाग आहे असे वाटायला लावणारा तो साहित्यिक
●एक फोटो लाख शब्द सांगून जातो हे खरं आहेच. पण त्याचबरोबर वाचकाला वाटावे की जणू आपण ती जागा प्रत्यक्षात आपल्याच मनःचक्षूंनी पाहतो आहोत अशा प्रकारे आपल्या ओघवत्या शैलीत एखाद्या ठिकाणची फार सुरेख मुशाफिरी घडवून आणणारा अवलिया तो साहित्यिक.
एकूण काय तर आजच्या या बेभरवशाच्या आयुष्यात ज्याच्यावर विश्वास ठेवावा असे वाटायला लावणारा आणि लोकांचे जगणे सुसह्य, आनंदी करण्यासाठी आपल्या शब्दांच्या जादूने मोहित करणारा कलंदर म्हणजे साहित्यिक.
आपल्या ‘आम्ही साहित्यिक’ समूहात प्रत्येक जण मनाने प्रगल्भ आहे. वाद विवाद प्रत्येक ठिकाणी होतच असतात, ते माणसाच्या जिवंत मेंदूचे लक्षण आहे. पण त्यातून नकारात्मक दृष्टिकोनापेक्षा सकारात्मक ऊर्जा कशी मिळेल यासाठी येथे मार्ग काढला जातो आणि प्रत्येक वाद अगदी काही काळात संपवला जातो हे उल्लेखनीय आहे आणि हेच या समूहाचे यश आहे. ‘आम्ही साहित्यिक’ हा समूह प्रत्येकाला आपला वाटतो तो यासाठीच.
–
#अक्षरछंदी | सचिन सावंत
Sachin Sawant
Leave a Reply