भारतीय संस्कृती आपल्या प्राचीन ग्रंथापासूनच सुरू झालेली आहे. आपले चार वेद म्हणजे ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद हे आपले प्राचीन साहित्य. आपल्या चाली रिती रिवाज या धर्मग्रंथावरच प्रस्थापीत आहेत. चार वेद, रामायण, महाभारत (महर्षी वाल्मीकी आणि महर्षी वेदव्यास ) हे साहित्य, विश्वातले अत्यंत प्राचीन साहित्य मानले जाते. हे अजरामर आहे आणि त्यांचे रचयते ही तेवढेच महर्षी होते. त्यानंतर संतवाणी, संतांचे वाङमय, ज्ञानेश्वरी, गीता, महान लेखक व कविंनी लिहिलेले व रचित केलेली काव्ये, नाटक, कथा, कादंबरी, पोवाडे, लावणी इत्यादींची गणना साहित्यात केली आहे. ज्यानी हे लिहिले, रचले ते साहित्यकार.
आता साहित्यिक कोण?
पूर्विची साहित्याची व्याख्या आणि आताची यात जमीन आसमानाचा फरक आहे. आता लेखन कोणत्या प्रतिचे आहे, त्याची मांडणी कशी आहे, कोणत्या भाषेतून आहे, कशा तऱ्हेचे आहे, लोकांची आवड निवड, रुची संपदा ह्यावरून त्या साहित्याची श्रेणी ठरत असावी. लोकांना किती आवडले त्यावर त्याची योग्यता व दर्जा ठरतो. आता आवडतं म्हणजे जो कोण ते साहित्य वाचेल, ते समजून घेईल, त्याचे आकलन करून त्यावर आपला अभिप्राय देईल ते. अभिप्राय हा कौतुकास्पद ही असू शकतो किंवा टिका ही होऊ शकते.
नुसते लाईक करणारे अथवा छान, सुंदर, अप्रतिम अशी कॉम्मेंट्स देणारे ह्यांनी पोस्ट वाचली का, ही सुध्दा शंका येते ! जे कोण स्वतः लिहीत ही नाहीत ह्यांना साहित्यिक म्हणणे हे चूकीचे. आपले स्वतःचे स्वानुभव लिहिणारा किंवा दोन चार मासिकात छापून आले की तो लेखक झाला असे मुळीच नाही. तर आपली वैचारिक कल्पनाशक्ती, समाजातल्या घडामोडी, सभोवतालचा परिसर अवलोकुन त्यावर विचार विनमय करुन लेखन करतो तो लेखक.
एक उदाहरण घेऊया. आज टि.वी चॅनलवर वेगवेगळ्या सिरीयल लागतात. त्यातले लेखन सर्वांनाच आवडते का? ज्यांना आवडतं ते बघतात, नाही आवडले तर सोडून देतात. साहित्य वाचून त्यावर टीका करून किंवा कौतुक करुन आपला अभिप्राय अचूक देणारा, साहित्याची जाण असलेला सुध्दा साहित्यिक म्हणावा लागेल.
वाचक नसेल तर साहित्याची श्रेणी कशी ठरेल? लेखन, मग ते लेख, चरित्र, कथा, कविता काही असू दे, ते त्या माणसातच अंगभूत असते. लेखक, कवी यांच्याकरता शाळा कोचिंग क्लासेस आहेत का? ती एक शैली असते. सगळ्यांनाच ते जमत नसतं. लेखन करणारा शिक्षीतच असावा असे नाही. तो ज्ञानी, अनुभवी व त्याची वैचारिक पातळी ही सखोल असते. समाजातील, निसर्गातील गोष्टी बघून त्यावर विचार चिंतन करून आपसूकच त्याचे शब्द उमटून येतात तो साहित्यिक. बहिणाबाई,चोखामेळा,सेना न्हावी, गोरा कुंभार हे सारे साहित्यिकच नाही का?
साहित्यात भाषा खूप महत्वाची असते. भाषेचा दर्जा म्हणजे लेखकाचे भाषेवर किती प्रभुत्व आहे त्यावरून त्याच्या लेखणीची भाषा ठरते. पण भाषा कशी ही असली किंवा कोणत्याही प्रकारची असली तरी लेखकाला काय सांगायचे आहे व त्याचा आशय काय आहे हे वाचकाला कळते. जर नवोदित लिहिणाऱ्याची भाषा अथवा काव्यातील यमक बरोबर होत नसेल तर त्या लिहिणाऱ्याला ही ते कळत असतं. अशा वेळी त्याने आपले लेखन मुळीच बंद करू नये. उलट चांगले दर्जेदार साहित्य भरपूर वाचावे. अवांतर चांगले साहित्य वाचत जावे. जेवढे जेवढे चांगले वाचनात येईल तसतसा त्याच्या लेखणीचा दर्जा वाढेल. जे उत्तम लिहितात किंवा नामवंत साहित्यिक आहेत त्यांच्या नजरेत हे लिखाण आले तर योग्य प्रकारे त्यांना मार्गदर्शन करावे. एक हाडाचा शिक्षक जसा केव्हाही, कुठेही, कधीही विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नाचे उतर त्या मुलाला त्याची समजूत होई पर्यन्त सांगतो तोच मूलांचा आदर्श शिक्षक असतो. तसे सर्व जाणकारांनी करावे असे मला वाटते. कोणी सांगावे, आता नवोदित असलेला पुढे महान लेखक, कवी, साहित्यिक होऊ शकतो. वाल्याचा ‘महर्षी वाल्मिकी’ झाला पण सगळेच होत नसतात हे ही तितकेच खरे.
माझच उदाहरण घ्या. मी कोणी लेखिका नाही. मला माझ्या मुलीने माझी वाचनाची व लेखनाची आवड म्हणून मला ह्या साहित्यिक ग्रुप मध्ये भरती केले. सूरुवातीला मी फक्त दुसऱ्यांचे वाचत होेते. लाईक कॉम्मेंट्स सुध्दा देत नव्हते. म्हणजे घाबरत होते. पण जसे जसे वाचत राहिले ज्ञानात भर पडली व नंतर लाईक आणि कॉम्मेंट्स सुध्दा देऊ लागले. फेस बुकच्या माध्यमातुन बऱ्याच ग्रुप मध्ये जोडले गेले. त्यांच्या होणाऱ्या स्पर्धेत भाग घेऊ लागले. त्या त्या आयोजक व परिक्षकांनी मार्गदर्शन केले. तसेच बऱ्याच मित्र मैत्रिणिंनीे सुध्दा मदत केली. ज्ञान हे नेहमी दुसऱ्याला देण्याने वाढते. श्रेष्ठ गुरुला आपला चेला आपल्याहुन श्रेष्ठ व्हावा असे वाटते पण सर्वांना तसे वाटत नाही ही दुर्दैवाची गोष्ट. असो.
या महाचर्चेत माझ्या मते साहित्य लिहिणारा व ते वाचणारा, त्याचे नीट वाचन करून,समजून आपला प्रतिसाद देणारा, दोघे ही साहित्यिकच.
© शोभा वागळे, मुंबई
Shobha Wagle
Leave a Reply