
मुल शाळेत जातं. हळुहळु लिहायला वाचायला शिकतं. पुढे जसजसं मुल वाढत जातं तस तसं त्याला परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांना स्वतःला जे काही समजलं आहे त्यावरून स्वतःच्या शब्दात उत्तर लिहावं लागतं. ……
आणि इथुनच त्याच्यातल्या लेखकाचा जन्म होत असतो..
जेव्हा त्याला किंवा तिला जाणीव होते की आपल्या मनात काहीतरी चाललं आहे आणि मग ती खळबळ कागदावर उतरवली जाते. हे त्या व्यक्तीचं लेखक म्हणून लिहिलेलं पहिलं लेखन. साहजिकच अतीव आनंद होऊन, आपल्या या लेखनाला कुणीतरी मनापासुन स्विकारावं, कुणीतरी पाठीवर शाबासकीची थाप द्यावी अशी अपेक्षा असते.
नवलेखकांचं सुद्धा असंच असतं. त्यांची कलाकृती जनमानसासमोर यावं असंच वाटत असतं ना. पण याचा अर्थ असा नव्हे की ते स्वतःला “साहित्यिक” समजतात.
हा गृप नवीन लेखन करणा-या व्यक्तिंसाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. यातील सर्वच काही “साहित्यिक” या शब्दात सामावले जाऊ शकत नाहीत, हे मलाही मान्य आहे. काहींचं लिखाण तर इतकं अशुद्ध असतं की वाचतानाही त्रास होतो, पण म्हणून ते वाचूच नये का ?
उलट काही वेळेला ते त्रास घेऊन वाचलं तर त्यात काही वेगळेपण आहे हे लक्षात येतं, मग ते लिखाण अशुद्ध असलं तरी आवडतं.
शिवाय “व्यक्ती तितक्या प्रकृती” हे लक्षात घेणंही गरजेच आहे. मला जे आवडलंय ते इतरांनाही आवडेलंच हे शक्य नाही. त्यामुळे प्रत्येकाच्या मतानुसार “साहित्यिक” या शब्दाची व्याख्या बदलत जाईल, जाते. ज्या कुणी लिहिलेलं लिखाण आपल्याला आवडतं , साहजिकच आपलं मन त्या लेखकाला “साहित्यिक” मानायला लागतं. इतर कुणालाही ती व्यक्ती साहित्यिक वाटली नाही तरी आपल्या दृष्टीने ती व्यक्ती “साहित्यिक”च असते.
मग भले ती व्यक्ती नवलेखक का असेना? त्या व्यक्तीचं लेखन प्रसिद्ध झालेलंही का नसेना…
या शिवाय, कोणाचं लेखन आपण वाचायचं, कोणाचं वाचायचं नाही हे आपल्या हातात असतं. आपल्या मनाला जे आवडेल ते आपण वाचतोच, पण कधी कधी हे अमुक एका लेखकाचं आहे , म्हणूनही वाचत असतो.
असं न करता, आपण प्रथम लेखन वाचायला हवं, लेखक/लेखिकेचं नाव नंतर वाचायचं…
याने एक होईल , आपलं कोणाबद्दल काही मत तयार होणार नाही. जर लेख आवडला तर नक्कीच आपण त्या व्यक्तीचं पुढचं लिखाण शोधून वाचतो. या लेखकांचे सगळेच लेख काही वाचावंसं वाटतील असंही नाही. पण कुठेतरी एक ‘टर्निंग पाॅईंट’ येतोच. आणि मग त्या नवलेखकाचा तो टर्निंग पाॅईंट ठरणारा लेख त्या लेखकाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो. आणि तिथून त्या लेखकाची जगन्मान्य लेखक म्हणून वाटचाल सुरू होते.
त्यामुळे , मला वाटतं, – “साहित्यिक कोण ? ”– या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक व्यक्तीच्या त्या लेखकाच्या लेखनाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनावर अवलंबून आहे.
— विवेक माधव
Vivek Madhav
Leave a Reply