आजही शारदाकाकी उंबरठ्यावर उभ्या राहून पोस्टमनची वाट पहात होत्या. नेहमी वेळेवर येणारी मनीऑर्डर आठ दिवस उशीर झाले तरी आली नव्हती. अरूण, शारदाकाकींचा एकुलता एक मुलगा मुंबईत कापड गिरणीत कामाला होता. कसातरी स्वतःच्या कुटुंबाचा खर्च भागवून दरमहा आईला दोनशे रुपयांची मनीऑर्डर न चूकता पाठवायचा. दूरूनच पोस्टमनला पाहून शारदाकाकी पुढे आल्या. पोस्टमनने एक अंतर्देशीय पत्र शारदाकाकींच्या हातात दिले. मनीऑर्डरची वाट पहाणा-या शारदाकाकी जरा काळजीच्या सुरात म्हणाल्या, ” जरा वाचून दाखवतोस का रे बाबा.. काय लिवलय ते पोराने ? ”
पोस्टमन पत्र वाचत होता नी शारदाकाकींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. गिरण बंद पडून सहा महिने झाले होते. पगार बंद झाला होता. कर्जाचा बोजा डोक्यावर जड होत होता त्यामुळे आता अरूणला मनीऑर्डर पाठवणं शक्य नव्हतं.
पोस्टमनला तिथेच थांबायला सांगून शारदाकाकी घरात गेल्या आणि काही रक्कम घेऊन बाहेर आल्या व पोस्टमनच्या हातात देत म्हणाल्या, ” ह्या पत्त्यावर पोराला हे पैशे पाठवशील काय , माझ्या मेली एकटीचा खर्च तो काय.. हे वाचवून ठेवलेले हायत.. मी पेज पिऊन पन टनकी -हाईन , माझी चिंता करू नको म्हनावं.. नी जमलं तर गावी ये.. जमीन पडीक -हायलीय..ती कसली तर धा माणसांचं पोट भरील.”
पोस्टमनला काय बोलावे सुचेना. चुरगळलेल्या नोटा व्यवस्थित लावल्या व पत्ता खिशात ठेवून शारदाकाकींना उद्याच मनीऑर्डर करण्याचे आश्वासन देवून निघून गेला. पोस्टमनच्या पाठमोरी आकृती दिसेनासी होईपर्यंत शारदाकाकी वाटेकडे पहात राहील्या. जणू शुन्यातल्या नजरेतून जीवनपट पहात होत्या.
सोमाई
— स्मिता तोंडवळकर
Smita Tondwalkar
लेखाची लिंक : https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/4113876618628722/
प्रोफाईल लिंक : https://www.facebook.com/smita.tondwalkar.58?
Leave a Reply