अमरावती.
दि ९-१०-२०२०
आदरणीय पोस्टमन काका,
किती दिवस झाले आपली भेट नाही. खरं म्हणजे चुकलंच , दिवस नाहीत कितीतरी वर्षे झालीत आपल्याला बघितलंच नाही. खरं म्हणजे मला तुम्ही जसेच्या तसे आठवता. ती डोक्यावरची खाकी टोपी , खाकी ड्रेस, खांद्याला लटकवलेली पिशवी, चष्मा आणि हातात असलेली काही कागदपत्रे आणि तुमची ती सायकल. तुम्ही नेहमीच घाईत असायचे. तुमची वेळही ठरलेली असायची. तुम्हाला पायऱ्या चढायचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही कुणीतरी ओट्यावरच त्यावेळी रेंगाळायचं. काहीना काही कागदपत्रे तुम्ही बहुदा रोज द्यायचे. तुम्ही आणलेल्या पत्रांनी कधी रडलो, कधी हसलो, कधी उड्या मारल्या.
त्यावेळी मनाची स्थितीच आपण आमच्या नात्यातल्या काकांपैकीच एक वाटायचे. कधी कधी आईने तुम्हाला जबरदस्तीने दिलेला चहा तर तुम्ही ओसरीवर बसुन पाणी पितांना आमच्याशी मारलेल्या गप्पा आठवतात. अर्थात तुम्ही दिलेलं, ते छोटसं , लाल कव्हरच चॉकलेट ही अजून आठवते बर का मला! एखाद्या पत्रातील काही मजकूर वाचून आई बोलायला लागली तर तुम्ही हक्कानी म्हणायचे, जावु द्या नं वहिनी, आपण लोकांचं चांगलं केलं आहे ना मग आपलं ही चांगलंच होणार.. लोक कसेही वागु द्या. “तो” आहे आपल्या पाठीशी.
रोज तुमची वाट पाहणं आमचा छंदच झाला हळुहळु.
त्या दिवशी मी तुमची खूपच वाट बघत होते आणि अचानक बातमी आली पोस्टमन काका वारले अपघातात सायकल वरून पडून. कुणीतरी गाडीवाल्यानं धडक दिली व तुम्ही जागीच कोसळले. रक्तबंबाळ झाले व आम्हाला सोडून गेले. त्यादिवशी आम्ही सर्व लहान मुलं तुमच्या घराच्या भोवती असलेल्या गोंगाटात सामील झालो. गर्दीला ढकलून पुढे जाऊन तुम्हाला बघायचं होतं .तुम्हाला कालचा कागद दाखवायचा होता. जवळ जाऊन नेहमीसारखं कमरेला धरायचं होतं. पण ते जमलंच नाही.
का काका का असे अचानक निघुन गेलात? तुमच्या आठवणीनी सतत डोळे आजही भरून येतात .तो कागद आजही जपून ठेवला आहे. कुणाला आणि कसा दाखवु? माझ्या पोस्टमन काकांनाच तो दाखवायचा होता न मला! आजही काका मला जेव्हा जेव्हा तुमची आठवण येते तेव्हा कपाटाच्या अगदी खाली ठेवलेला तो कागद काढते त्यात तुम्ही दिसता मला. फक्त तुम्ही. कारण डोळ्यातल्या आसवांनी लिहीलेले सगळे शब्द पुसून टाकले फक्त तो कागद म्हणजे तुमची आठवण आहे माझ्यासाठी. आत्ताच काही दिवसांपूर्वी तो कागद माझ्यासमोर होता. डोळे पाण्याने भरलेले होते. नजर शून्यात होती .मन आठवणीत रमले होते तितक्यात मुलगा आला म्हणाला, काय वाचते ग. त्यानं माझ्या हातातला कागद घेतला व म्हणाला, कोरा आहे ,जुना झाला आहे फाटला आणि हयावर तर काहीच लिहिलेले दिसत नाही .मी डोळे पुसले आणि मुलाला म्हणाले, तुला नाही दिसत पण मला पूर्ण दिसते आहे आणि वाचताही येते आहे.पण डोळ्यातल्या आसवांनी जणु असहकारच पुकारला होता.सारखी वाहत होती..व मी माझ्या लिहीलेल्या तुमच्यावरच्या ओळी जुळवत होते..स्पर्धेसाठी त्यावेळी लिहीलेल्या.
नका म्हणु पोस्टमन त्यांना,
काका,मामा म्हणु चला,
दु:ख आणि आनंदाचा,
असतो त्यांचेकडे ठेवा..
असे मी तुमच्याशी नाते जोडायला जात होते आणि तुम्ही अनंतात विलीन झालात. सर्व नात्यांच्या पलीकडे निघुन गेलात.अजुनही खुप आठवण येते मला तुमची काका..
तुमचीच….
— सुलभा गोगरकर
Sulabha Gogarkar
लेखाची लिंक : https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/4113832158633168/
प्रोफाईल लिंक : https://www.facebook.com/sulabha.gogarkar?
Leave a Reply