२१ ऑगस्ट १९२६ साली पेण येथे जन्मलेल्या जयमालाबाईंचं माहेरचं नाव प्रमिला जाधव होतं. त्यांचे वडील नारायणराव जाधव हे मुंबईत वास्तव्यास होते.पण मुंबईच्या गोदीला आग लागल्यानंतर अनेक कुटुंबांनी मुंबई सोडून अन्यत्र स्थलांतर केले, त्यावेळी जाधव यांनीही आपल्या कुटुंबासह बेळगावात स्थलांतर केले. मास्तर कृष्णराव , गोविंदराव टेंबे आणि गानसरस्वती मोगूबाई कुर्डीकर यांच्याकडे त्यांनी गायकीचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले. त्यांनीदेखील जयमालाबाईंना अनेक चिजा व बंदिशी शिकवल्या. काही मैफलींत जयमालाजींनी मोगूबाईंना तंबोरा साथही केली. १९४२ पासून जयमालाबाईंनी संगीत रंगभूमीवर भूमिका करायला सुरूवात केली. ‘देशांतर’ या नाटकात पहिल्यांदा भूमिका केली. गंगाधरपंत लोंढे यांच्या राजाराम संगीत मंडळीच्या नाटकांतून व गंधर्व नाटक मंडळीच्या विविध संगीत नाटकांमधून जयमालाबाईंनी भूमिका केल्या.” सौभद्र “,” स्वयंवर “,” संशयकल्लोळ “,” एकच प्याला “,” शाकुंतल “,” मृच्छकटिक ” , “शारदा” , ” कान्होपात्रा ” , ” विद्याहरण ” , ” द्रौपदी ” ; अशा विविध संगीत नाटकांतून जयमालाबाईंनी भूमिका साकारल्या. आपल्या कलेच्या कारकीर्दीत ४६ नाटकांतून ५२ भूमिका त्यांनी साकारल्या तर १६ संगीत नाटकांचे संगीत दिग्दर्शन केले.
‘ रामजोशी ‘ या चित्रपटातून आपल्या अभिनयकौशल्याने सगळय़ांची मने जिंकून घेतली. जयमालाबाईंनी बालगंधर्वांसमवेतही काम केले व त्यांचा कलेचा वारसा अगदी शेवटपर्यंत जपला . नाटकांच्या दौर्यादरम्यान त्यांचा परिचय जयराम शिलेदार यांच्याशी झाला, व त्याचे पर्यावसन विवाहात झाले. लग्नानंतरच्या काळात गायिका व निर्माती असा दुहेरी प्रवास सुरु झाला व त्यांनी ‘ मराठी रंगभूमी ’ ही संस्था स्थापन करून बाळ कोल्हटकर यांच्या ‘मुंबईची माणसे’ , ‘एखाद्याचे नशीब’ , ‘मला निवडून द्या’ , ‘बाजीराव मस्तानी’ , अशा नाटकांची त्यांनी निर्मिती केली. तसंच जुनी संगीत नाटकेही त्यांनी रंगभूमीवर आणली. १९८७ या वर्षादरम्यान बालगंधर्व यांच्या जन्मशताब्दीनिमित्त जयमाला शिलेदारंनी संगीत नाटकाचे १२५ प्रयोग सादर केले होते . जयमालाबाईंनी गायिका व अभिनेत्री म्हणून संगीत रंगभूमीवर आपले अढळ स्थान निर्माण केले होते. पती जयराम शिलेदारा यांच्या निधनानंतरही जयमालाबाईंनी रंगभूमीसाठी अनेक उपक्रम सुरू ठेवले ; पुढच्या पिढीतील कलावंत घडवण्यासाठी त्यांनी ‘गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्य सेवा ट्रस्ट’ ही संस्था सुरू केली. त्यांच्या या संस्थेनं आज रंगभूमीला अनेक उत्तम गायक दिले आहेत.
Leave a Reply