एका गरीब कुटुंबात कोल्हापुरात जन्मलेल्या गणपत पाटील यांचे वडील बालपणीच निवर्तल्यामुळे बालवयापासूनच गणपत पाटलांना मोलमजुरी करून, फुले व खाद्यपदार्थ विकून कुटुंबाच्या उदरनिर्वाह करता आर्थिक हातभार लावावा लागला. पण अशा परिस्थितीत देखील कोल्हापुरात त्या काळी चालणार्या रामायणाच्या खेळांत ते हौशीने अभिनय करीत. रामायणाच्या खेळांमध्ये त्यांनी बर्याचदा सीतेची भूमिका वठवली.दरम्यानच्या काळात राजा गोसावी यांच्याशी गणपत पाटलांची ओळख झाली. त्यांच्या ओळखीतून पाटलांचा मास्टर विनायकांच्या शालिनी सिनेटोनमध्ये प्रफुल्ल पिक्चर्समार्फत चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. चित्रपटसृष्टीतील सुरुवातीच्या दिवसांमध्ये त्यांनी ‘सुतारकाम’, ‘रंगभूषा साहाय्यक’ म्हणून कामे केली.“बाल ध्रुव” या चित्रपटासाठी गणपत पाटील यांनी पहिल्यांदाच बालकलाकार म्हणून भुमिका साकारली होती.
पाटील, गणपत
मास्टर विनायकांच्या निधनानंतर ते मुंबईतून कोल्हापुरला परतले.त्यासुमारास गणपत पाटील यांना राजा परांजपेंच्या“बलिदान” व “राम गबाले” यांच्या “वंदे मातरम्” चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी मिळाली. या भूमिकांमुळे त्यांची अभिनय कारकीर्दीची कमान फुलत गेली; व त्यानंतर भालजी पेंढारकरांच्या “मीठभाकर” या चित्रपटात त्यांना खलनायकाची भूमिका मिळाली.
चित्रपटांबरोबरीनेच पाटील नाटकांतही अभिनय केला.जयशंकर दानवे यांच्या “ऐका हो ऐका” या ग्रामीण ढंगातील तमाशाप्रधान नाटकात सोंगाड्याची म्हणजेच ’नाच्या’ची भूमिका त्यांनी लीलया साकारली. गणपत पाटील यांच्या जबरदस्त अभिनयामुळे ही भूमिका खुपच लोकप्रिय झाली.“जाळीमंदी पिकली करवंदं” या नाटकातही त्यांनी सोंगाड्याचीच व्यक्तिरेखा साकारली होती. पाटलांच्या परिपूर्ण अभिनयाच्या “नाच्या”च्या भूमिकांची लोकप्रियता लक्षात घेऊन कृष्णा पाटलांनी “वाघ्या मुरळी” चित्रपटात त्यांना तशीच भूमिका देऊ केली. या चित्रपटानंतर गणपत पाटलांच्या अभिनयला नाच्याची भूमिका हे समीकरण मराठी तमाशापटांमाध्ये रुढ झाले.“सख्या सजणा” हा त्यांचा अगदीच वेगळा चित्रपट होता. गणपत पाटील यांनी हा सोंगाड्या अक्षरशः जिवंत केला, आणि या भूमिकेशी ते इतके समरस होऊन गेले, की त्यांच्या लकबीवरून अनेकजणांनी ‘वेगळाच संशय’ व्यक्त केला होता.
गणपत पाटील यांनी ज्या नाटकांमध्ये भूमिका साकारल्या त्यामध्ये “कॉलेजकुमारी”,“स्टेट काँग्रेस”, “बेबंदशाही”, “आगर्याहून सुटका”, “झुंझारराव”,“मानापमान”,“संशयकल्लोळ”,“कोकणची नवरी”,“ऐका हो ऐका”,“सोळावं वरीस धोक्याचं”,“नर्तकी”,“राया मी डाव जिंकला”,“लावणी भुलली अभंगाला”,“आता लग्नाला चला”,“आल्या नाचत मेनका रंभा” यांचा समावेश होता.पाटील यांनी “राम राम पाव्हणं”,“पाटलाचा पोर”,“छत्रपती शिवाजी”,“मायेचा पाझर”,“आकाशगंगा”,“नायकिणीचा किल्ला”,“शिकलेली बायको”,“थोरातांची कमळा”,“पाठलाग”,“सवाल माझा ऐका”,“केला इशारा जाता जाता”,“मल्हारी मार्तंड”,“रायगडचा राजबंदी”,“बाई मी भोळी”,“धन्य ते संताजी धनाजी”,“एक गाव बारा भानगडी”,“गणगौळण”,“अशी रंगली रात”,“गणानं घुंगरू हरवल”,“लाखात अशी देखणी”,“सोंगाड्या”,“पुढारी”,“सून माझी सावित्री”,“सुगंधी कट्टा”,“नेताजी पालकर”,“दोन बायका फजिती ऐका”,“इरसाल कार्टी”,“थांब थांब जाऊ नको लांब”,“लावण्यवती” अश्या चित्रपटांमधून आपल्या वैविध्यपूर्ण अभिनयाची छाप रसिकांच्या मनावर सोडली.“नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे” हा त्यांचा अभिनय कारकीर्दीतील शेवटचा चित्रपट होता.
गणपत पाटील यांना सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी राज्य शासनाचे अनेक पुरस्कारा लाभले.२००६ साली त्यांना अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा “चित्रभूषण पुरस्कार” आणि ‘झी मराठी’ वाहिनीने “झी जीवन गौरव पुरस्कार” प्रदान करुन सन्मानित केले होते.
२३ मार्च २००८ या दिवशी म्हणजे वयाच्या ८९ व्या वर्षी गणपत पाटील यांचे वृद्धापकाळाने कोल्हापुरात निधन झाले.
( लेखन व संशोधन – सागर मालाडकर )
Leave a Reply