राम कदमांचे बालपण फार कष्टात व वणवण करण्यात गेले. संत गाडगेबाबांच्या सहवासात राहण्याचा त्यांना योग आला. प्रथम मिरजेत बॅन्डमध्ये ते क्लॅरोनेट वाजवीत. ते ऐकून लोक खूश होऊन नोटांच्या माळा त्यांच्या गळ्यात घालीत असत. संगीतरत्न अब्दुल करीम खॉंसाहेब यांच्याबरोबर मिरजेत काही वर्षे राहून, त्यांनी निष्ठेने शास्त्रीय संगीताची माहिती करून घेतली.
पुढे प्रभातमध्ये ऑफिसबॉयचे काम करत, एकवेळचे जेवण घेऊन त्यांनी उमेदवारी केली. पठ्ठे बापूरावांची भेट झाल्यावर लावणी जाणून घेतली, नंतर सुधीर फडके यांचेकडे संगीत साहाय्यक म्हणून काम केले. ‘मीठ भाकर’ हा भालजींचा चित्रपट त्यांनी प्रथम स्वतंत्र संगीतकार म्हणून दिला. ९ वर्षे प्रभातमध्ये काम करून ते बाहेर पडले. प्रभातबद्दल त्यांच्या मनात फार कृतज्ञता होती. पुढे काही वर्षे त्यांनी पुणे आकाशवाणी केंद्रावर नोकरी केली.
१९५७ मध्ये ‘सांगत्ये ऐका’ ह्या अनंत मानेंच्या चित्रपटातील ‘बुगडी माझी सांडली गं’ (ह्या गेली कैक वर्षे मराठी माणसाला भुरळ पाडणार्या) लावणीची निर्मिती झाली. ‘सांगत्ये एका’ च्या अभूतपूर्व यशात राम कदम यांच्या संगीताचा सर्वाधिक मोठा वाटा होता असे म्हणणे अतिशयोक्त ठरणार नाही. १९५१ च्या ‘गावगुंड’ पासून १९७३ च्या ‘पिंजरा’ पर्यंत अक्षरश: शेकडो गीतांना त्यांनी स्वरबद्ध केले. त्यांची असंख्य गाणी आजही महाराष्ट्र ‘वेड्यासारखा’ ऐकतो. अनेक चित्रपटांना त्यांच्या संगीतामुळे लोकप्रियता व प्रसिद्धी मिळाली. अनेक मानसन्मान व गौरवांना ते पात्र ठरले.
सर्व वाद्यांची त्यांना चांगली समज होती. लावणी हे त्यांचे बलस्थान होते, पण कोणत्याही ढंगाच्या गीतप्रकाराला रामभाऊ बिनतोड संगीत देत. गाणे हातात आल्यावर तत्क्षणी चाल बांधण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. रेकॉर्डिंग स्टुडिओत गेल्यानंतर कितीही तास, काहीही न खातापिता ते सलग १५ ते १६ गाण्यांची रेकॉर्डिंग्ज करीत असत, हे विशेष. ‘पिंजरा’ चित्रपटासाठी काम चालू असताना शांतारामबापू सर्व गाणी चाल पसंत पडेपर्यंत ऐकत. रामभाऊंना अनेक चाली देण्यास सांगत. त्यांतील ‘दे रे कान्हा’ या गाण्यासाठी रामभाऊंनी तब्बल ३९ चाली लावल्या होत्या. यावरून त्यांचे कष्ट व परिपूर्णतेचा ध्यास यांची कल्पना येते.
सुमारे ६० वर्षे चित्रपट सृष्टीत कार्यरत राहिलेले ज्येष्ठ व श्रेष्ठ संगीतकार म्हणून आजही राम कदम यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांनी स्वत: गायलेली गाणी म्हणजे ‘धनगराची मेंढरं’ , ‘बाजीराव नाना, ‘दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली’ इत्यादी होत.
‘नर्तकी’, ‘कथा अकलेच्या कांद्याची’ सारख्या १८ नाटकांनाही त्यांनी संगीत दिले. सुमारे ११५ गायक-गायिकांकडून त्यांनी गाणी म्हणून घेतली हा एक प्रकारचा विक्रमच होय. त्यांनी गड जेजुरी जेरुरी, पवळा असे काही चित्रपट काढले.
राम कदम, अनंत माने व जगदीश खेबुडकर यांनी ‘केला इशारा जाता जाता’ नंतर तमाशापटांचे युग सुरू केले. अनेक प्रकारच्या लोकसंगीतांपासून ते सुगम संगीतापर्यंत सर्वच प्रांतांत ते लीलया वावरत होते. सांसारिक ओढग्रस्तीतही त्यांच्यातील माणूसपण कायम होते. राजकारण व स्वार्थ न समजणारे, साध्या मनाचे, कुणालाही न दुखवणारे, सर्व सहकलाकारांवर अतिशय माया करणारे रामभाऊ कलाकार म्हणून खूप मृदू अंत:करणाचे होते. पुण्यातील संजीवन हॉस्पीटलमध्ये १९ ऑक्टोबर, १९९७ रोजी त्यांना देवाज्ञा झाली.
राम कदम यांच्या चरित्रात्मक ‘छिन्नी हातोड्याचा घाव’ ह्या पुस्तकात लेखक श्री. मधू पोतदार म्हणतात, ‘रामाभाऊ हे अस्सल मराठमोळे आणि श्रेष्ठ संगीतकार आहेत.’ मराठी लावणीचे लावण्य खुलवून रामभाऊंनी तिला एका उंचीवर नेऊन ठेवलं. जुन्या झिलला उजाळा दिला, नवं रूप दिलं. मायबाप रसिकांनी दिलेली ‘लावणी सम्राट’ ही बिरुदावली त्यांनी अभिमानाने मिरवली.
राम कदम यांच्यावरील मराठीसृष्टीवरील लेख.
संगीतकार राम कदम (20-Feb-2017)
संगीतकार राम कदम (28-Aug-2017)
संगीतकार राम कदम (21-Feb-2018)
राम कदम यांना १९ फेब्रुवारी १९९७ रोजी देवाज्ञा झाली. १९ ऑक्टोबर १९९७ रोजी नव्हे.
(संदर्भ: मधू पोतदार लिखित ‘संगीतकार राम कदम’ हे पुस्तक )
राम कदम यांना १९ फेब्रुवारी १९९७ रोजी देवाज्ञा झाली. १९ ऑक्टोबर १९९७ रोजी नव्हे.
(संदर्भ: मधू पोतदार लिखित ‘संगीतकार राम कदम’ हे पुस्तक पाहावे )