ज्या काळात स्त्रीयांनी कलेच्या क्षेत्रात विशेषत: नाटक व चित्रपटांमध्ये म्हणजे अगदी बोलपटांमध्ये सुध्दा अर्थात १९३०च्या दशकात, पण अश्यावेळी काही महिला कलाकारांनी या क्षेत्रात कारकीर्द घडवण्याचे धाडस दाखवले त्यापैकीच एक महत्त्वाचे नाव म्हणजे अभिनेत्री लीला चिटणीस यांचे. लीला चिटणीस यांचा जन्म कर्नाटकातील धारवाड येथे ९ सप्टेंबर १९०९ झाला होता. त्यांचे मूळचे नाव लीला नगरकर. नागपूर विद्यापीठाची पदवी संपादन केल्यानंतर त्याच वर्षी “उसना नवरा” या नाट्यमन्वंतरच्या नाटकात मालतीच्या भूमिकेने त्यांनी रंगभूमीवर प्रवेश केला. त्यानंतर “आंधळ्याची शाळा” मध्येही त्यांनी बिंबाची भूमिका साकारली होती. लीला चिटणीस यांचे वडील हे पुरोगामी विचारांचे, उच्च विद्याविभूषित व ब्रम्हो समाजाचे पुरस्कर्ते होते. समाजाच्या विरोधाला व बंधनांना न जुमानता लिला नगरकर यांनी डॉ.चिटणीस या गृहस्थांसोबत प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला आणि अश्या प्रकारे लिला नगरकर या लिला चिटणीस झाल्या.
लिला चिटणीस यांच्या कारकीर्दीच्या दृष्टीने ज्यामुळे इतिहास घडला तो टप्पा म्हणजे, “लक्स”या विख्यात साबणाच्या जाहिरातीत झळकून या ब्रॅंडसाठीच्या पहिल्या भारतीय मॉडेल ठरल्या.
रुपेरी पडद्यावर लीला चिटणीस यांनी रोमॅन्टिक तर कधी बुजर्या व बावळट भूमिका साकारल्या. त्यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले १९३५ च्या “सत्यनारायण” या चित्रपटातून ! त्यापाठोपाठ म्हणजे १९३० च्या उत्तरार्धात लिला चिटणीस यांच्या कलाक्षेत्राची कमान १९८०च्या उत्तरार्धा पर्यंत अगदी अखंडरित्या चढती राहिली.प्रभात चित्र, “रणजीत मुव्हीटोन”, “बॉम्बे टॉकीज” सारख्या अनेक नामांकीत फिल्म कंपनीच्या निर्मिती असलेल्या चित्रपटांसाठी लिला चिटणीस यांनी अभिनेत्री म्हणुन काम केले. या काळात लिला चिटणीस यांनी अनेक चित्रपटातून नायिका, सहनानिका तर कधी चरित्र व्यक्तीरेखा साकारल्या . “धुवाँधार”, “छाया”, “वहाँ ”, “ इंसाफ ”, “राजा गोपीचंद”, “जेलर”, “छोटे सरकार”, “संत तुलसीदास”, “कंगन”, “छोटीसी दुनीया”, “घर की रानी”, “रेखा”, “बंधन”, “आज़ाद”, “अर्धांगी”, “कांचन”, “घर घर की कहानी”, “सौदामिनी”, “हरिदर्शन”, “माँ ”, “नया दौर”, “पोस्टबॉक्स ९९९”, “मैं नशेमे हूँ ”, “काला बाज़ार”, “दुल्हन एक रात की”, “हम हिंदुस्तानी”, “गंगा जमुना”, “धर्मपुत्र”, “जीवन मृत्यू”, “भाई-भाई”, “बडी दीदी”, “औरत”, “वक्त”, “सत्यम् शिवम् सुंदरम्”, “दिल तुझको दिया” हे लिला चिटणीस यांच्या कारकीर्दीतील मुख्य चित्रपट; त्या काळात, लीला चिटणीस आपल्या चित्रपटातली गाणी स्वत:च गायच्या आणि त्या गाण्यावर त्या अशा काही धमाल नृत्य करायच्या की लोक त्यांचा तो नाच पाहून अक्षरश: घायाळ व्हायचे. “झूला” चित्रपटातल्या “हिंडोले कैसे झूलू…” व “झूलो के संग…” ही दोन गाणी म्हणजे मूर्तीमंत उदहारण होय.
अशोककुमार यांचा अभिनयातील आत्मविश्वास वाढविण्यात लीला चिटणीस यांचा फार मोठा हातभार आहे. नायिकेच्या भूमिकेत यशस्वी होत असतानाच त्यांनी “शहीद” मध्ये दिलीपकुमारच्या आईची भूमिका स्वीकारत आपल्या धाडसी वृत्तीची झलक दाखविली. दिलीप-राज-देव आनंद या रुपेरी पडद्यावर सर्वात यशस्वी त्रिकुटाची लीला चिटणीस पडद्यावरची यशस्वी आई ठरली. वात्सल्यसिंधू आईचे एक उदात्त, पण प्रसन्न व्यक्तिमत्त्व म्हणून लीला चिटणीस या रुपेरी पडद्यावरील एक अजरामर कलाकार म्हणून कायमच स्मरणात राहतील.
अनंत काणेकरांचे फार्स हे नाटक रंगभूमीवर आणण्याचे श्रेयही लिला चिटणीस यांना जाते. त्यांचे दुसरे पती ग्वालानी ह्यांच्या सहकार्याने एक चित्रपटसंस्था काढून “कंचन” आणि “किसीसे ना कहना” ह्या चित्रपटांच्या कथा, तसेच प्रमुख भूमिका, दिग्दर्शन आणि निर्मितीची बाजू देखील त्यांनी सांभाळली.
त्याचबरोबर “एक रात्र आणि अर्धा दिवस” या नाटकात देखील लिला चिटणीस यांनी भुमिका साकारली आहे
लीला चिटणीस यांनी “चंदेरी दुनियेत” हे आत्मचरित्र देखील लिहिले आहे.
लिला चिटणीस यांचा आयुष्यातील उत्तरार्ध अमेरिकेत त्यांचा मुलांकडे व्यतित झला होता. १४ जुलै २००३ या दिवशी वृध्दापकाळाने वयाच्या ९३व्या वर्षी त्यांचे निधन झाले
(लेखन व संशोधन – सागर मालडकर)
लिला चिटणीस यांच्यावरील मराठीसृष्टीवरील लेख.
मराठी अभिनेत्री लीला चिटणीस (17-Jul-2017)
जेष्ठ हिंदी-मराठी अभिनेत्री लीला चिटणीस (9-Sep-2017)
जेष्ठ हिंदी-मराठी अभिनेत्री लीला चिटणीस (9-Sep-2018)
Leave a Reply