प्रत्येक कलावंत हा तोंडाने नाही तर त्याच्या कलेतून बोलत असतो. त्याच्या तत्वांना, भावनांना, व आयुष्यभर जोपासलेल्या स्वप्नांना तो कलेच्या सौंदर्यामध्ये घोळवत असतो, मुर्तरूप देत असतो, त्यांना एका अर्थाने जीवंतच करत असतो. खळबळलेला समुद्र जसं आपल्या मनातलं वादळ व्यक्त करण्यासाठी लाटांचा आधार घेतो, त्याप्रमाणे कलावंत आपल्या कलेतून ही तळमळ रसिकांसमोर मांडत असतो. पायामधील पैंजण ज्याप्रमाणे हळुवार वाजुन पावलं कुठे चालली आहेत याची जाणीव करून देतात, त्याप्रमाणे कलाकाराच्या मनाचा थांगपत्ता हा त्याच्या कलेच्या अविष्कारामधून केवळ दर्दी रसिकांनाच लागु शकतो. त्याच्या आदर्श आयुष्याच्या संकल्पना इतरांपेक्षा फार वेगळ्या नसल्या तरीही त्याची जगण्याची शैली व इतरांशी संवाद साधण्याची पध्दत वेगळी असल्यामुळे काही जणांना त्याचा स्वभाव भावतो, तर काही जणांना खटकतो. त्याला चारचौघांसारखे सामान्य व चाकोरीबध्द आयुष्य जगायला लावण्याचा, चांगले शिक्षण किंवा नोकरी मिळवून देण्याचा त्याच्या आयुष्यामधील स्वच्छंदीपणावर अंकुश ठेवण्याचा कितीही प्रयत्ना केला तरीही त्याचा फायदा होत नाही. कारण सामान्य जगण्याच्या चौकटी धुडकावून स्वतःच्या मनाला रूचेल अशी जगण्याची नवी मुक्त चौकत बनवणे, व आयुष्यामधल्या विवीध वाटा चोखंदळून आपल्या भावनांना व विचारांना इतरांपर्यंत पोहोचवण्याची कला शोधणे, व त्या कलेतील सुक्ष्म बारकावे शोधून त्या कलेवर पुर्ण प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न करणे हे प्रत्येक सच्या कलाकाराच्या आयुष्यातील एक अनिवार्य वळण असते.
बगळ्यांमध्ये राजहंस होण्याचे जसे फायदे असतात तसे तोटेही असतात. सतिश मोडखळकर हे लहानपणापासून चित्रकलेमध्ये निपुण असुनसुध्दा त्यांना या कलेसाठी मिळावं तेवढं प्रोत्साहन मिळालं नाही. तासन् तास गणपतींच्या कारखान्यात उभे राहून् गणपती कसे बनवतात हे न्याहाळून त्याप्रमाणे घरी सराव करणे, उत्कृष्ठ व रेखीव अशी रांगोळी काढणे, दिवाळीच्या वेळी घरच्या घरीच सुंदर आकाशकंदिल बनवणे या सर्वांमधून त्यांच्यामधील सुप्त कलाकार घडत गेला. तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, व अगदी राज्यस्तरिय शालेय चित्रकला स्पर्धांमध्येही त्यांनी अनेक बक्षीसे मिळविली होती. प्रचंड निरीक्षणक्षमता, रेषांवर असामान्य प्रभुत्व, व चित्रांना जिवंतपणा देवून त्यांना रंगविण्यासाठी लागणारा छायाप्रकाशाचा खेळ कागदावर उतरवण्याची क्षमता ही सर्व वैशिष्ट्ये लहानपणापासून त्यांच्यात ओतप्रोत भरलेली होती. निसर्गाने त्याचि विविध रुपे, रंग, आकार, व ॠतुमानानुसार बदलणारे त्याचे गहिरे स्वरूप प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवण्याच सुख जरी सर्वांना दिलं असलं तरी अशा मन मोहून टाकणार्या त्याच्या लीलांना कागदावर उतरवण्याचा अधिकार मात्र काही निवडक कलाकारांनाच दिला आहे. त्यापैकी एक म्हणजे सतिश मोडखळकर हे आहेत. निसर्गचित्र हे त्यांचं आवडतं क्षेत्र असलं तरी संकल्पचित्र, व्यक्तिचित्र, आशय मांडणार चित्र, या सर्वच प्रकारांमध्ये त्यांचा हातखंडा आहे. त्यांनी रेखाटलेल प्रत्येक चित्र म्हणजे विविध रसांचा, व त्यांच्या भावभावनांचा वाहता झरा असतो. संवेदनशील रसिकांसाठी मेजवानीच असते. फोटोग्राफी सतिश सर छंद म्हणून करत असले तरी प्रत्येक फोटोमधून लोकांना खुप काही देण्याचा त्यांचा प्रयास असतो. सतिश सरांच प्रत्येक चित्र हे अतिशय बोलकं असतं. त्यात अचुकतेचा व सौंदर्याचा अविष्कार टाकण्याबरोबरच त्य ा चित्राने आपल्या भावनांच्या व त्या चित्रातून अभिप्रेत असलेल्या संदेशाच्या गुंतागुंतीला न्याय द्यावा अशी त्यांची मनापासुन इच्छा असते. तसेच त्या चित्रांमधून मांडण्यात आलेल्या प्रगल्भ विचारांनासुद्धा त्या चित्रासारखीच रेखीवता व कलात्मकता प्राप्त व्हावी हा त्यांचा प्रयत्न असतो.
प्रवास
लहानपणीच सतिश सरांनी चित्रकलेमध्ये स्वतःची कारकीर्द घडवण्याचा पक्का निर्धार केला होता. आर. एन भट हायस्कूल ची इंटरमिजिएट परिक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केल्यानंतर त्यांनी प्रभादेवीला एका अॅड एजन्सी मध्ये 2 वर्षांसाठी काम केल. त्यानंतर ग्रिटींग कार्ड डिझायनर म्हणून एके ठिकाणी काम केलं. व शेवटी डोंबिवलीत त्यांनी स्वतःचा व्यवसाय थाटला. अनेक सुबक शुभेच्छापत्रे बनवून ती रिलायेबल, आय कॉन, ओरिजीनल आर्ट वर्क यांसारख्या मोठ्या कंपन्यांना व बड्या व्यावसायिकांना विकली. परंतु हे कामदेखील एका चाकोरीपुरते मर्यादीत असल्यामुळे त्यांच्यामधील स्वच्छंदी, व कलेच्या विशाल व समृध्द आभाळात मुक्तपणे विहारण्यास आसुसलेला प्रतीभावंत चित्रकार त्यांना स्वस्थ बसु देईना. 5 ते 6 वर्षे शुभेच्छापत्रे बनविण्याचे व सजविण्याचे काम करित असताना त्यांनी स्प्रे पेंटिंगसारखी अनेक कौशल्यपुर्ण तंत्रे एकदम सफाईदारपणे आत्मसात केली. परंतु या कामात त्यांचे मन रमेना. शेवटी त्यांनी कायमस्वरूपी अलिबागमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.
सृजन क्लासेस चं पेरलेल बीज आज सरांच्या प्रामाणिक मेहेनतीमुळे व शिकवीण्याच्या रसदार पध्दतींमुळे आज चांगलच रूजलय व आज लहान मुलांचे उन्हाळी क्लासेस घेण्यापासून ते एलिमेंटरी, इंटरमिजीएट, आर्किटेक्चर प्रवेश परीक्षा, इंजिनीअरींग ड्रॉइंग, बॅचलर ऑफ फाईन आर्ट साठी असलेली जे. जे. ची प्रवेश परीक्षा, एन. आय. डी.[NATIONAL INSTITUTE OF DESIGNING], बी. एफ. ए., एन. आय. एफ. टी. [NATIONAL INSTITUTE OF FASHION TECHNOLOGY] यांसारख्या कलात्मकतेचा व कल्पनाशक्तीचा कस लावणार्या प्रवेशपरीक्षांची व आभ्यासक्रमांची येथे कसून तयारी करून घेतली जाते. सतिश सरांचे लहान व किशोरवयीन मुलांना हाताळण्याचे कसबच न्यारे आहे. अतिशय हसत खेळत व सर्वांशी मित्रत्वाच नातं निर्माण करून त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना कलेच्या विविध वाटा चोखंदळण्यास प्रवृत्त केले आहे व चित्रकलेची गोडी लहान मुलांच्यात रूजविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. चित्र हे हाताने नाही तर भावनांनी काढायचे, त्यात सुंदर आठवणींचे व अनुभवांचे रंग भरायचे, त्या चित्राला निराशांच्या नव्हे तर आशावादाच्या छटांनी सजवायचे तरच ते जीवंत होते या त्यांच्या चित्रकलेबद्दलच्या सुंदर संकल्पना आहेत. मनाला भिडणारे आशयपूर्ण विचार, व प्रमाणबध्दता यांचा सुवर्णमध्य गाठला तर चित्राला आपोआपच सौंदर्य प्राप्त होते हे सतिश सरांची व त्यांच्या काही गुणी विद्यार्थ्यांची चित्रे पाहिली की लगेच ध्यानात येते. चित्रकलेचा सर्वात प्रेरणादायी व अनुभवी कोणी शिक्षक असेल तर तो निसर्ग. त्यामुळे सृजन क्लासेसच्या वारंवार आसपासच्या निसर्गरम्य टेकड्यांवर, व धबधब्यांवर सहली निघतात. निसर्गाशी गुजगोष्टी करीत, त्याच्या मनमोहक रूपांना कागदावर स्वतःला रूचेल अशा पध्दतीने साकारणे हा या सहलींमागचा मुख्य हेतु असतो. चित्रकलेसाठी मनाची बेधुंद अवस्था नितांत गरजेची असु ही कला कोणत्याही कडक नियमांच्या पहार्यात शिकवता येत नाही हे सर जाणतात. याउलट जर ती खेळीमेळीने, रोचक शैलीने, व प्रत्येकामधील व्यक्तिस्वातंत्र्य जपून शिकवली तर ती समोरच्याला अधिक भावते, परिपूर्ण बनविते, हे सूत्र त्यांनी आजवरच्या प्रवासात नेहमीच जपले आहे.
Leave a Reply