अच्युत पालव यांचे शिक्षण जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून झाले. रघुनाथ कृष्णकांत ऊर्फ र. कृ. जोशी यांच्याकडे अच्युत पालव यांनी सुलेखनाचे धडे घेतले. त्यांचा जन्म २७ जानेवारी १९६० रोजी झाला. १९८३ साली अच्युत पालव यांनी उल्का शिष्यवृत्तीसाठी मोडी लिपीचा पंधराव्या ते सतराव्या शतकांतील इतिहास, तसेच मोडी लिपीची विविध वळणे व अक्षररुपे यांवर कलात्मक दृष्ट्या संशोधन करुन प्रबंध लिहिला. मोडी व आजची देवनागरी यांच्या दृश्य समन्वयातून ‘धृतनागरी’ तयार केली. तिला ‘मुक्त लिपी’ असे नाव दिले. या लिपीचा त्यांनी सुलेखनातून कलात्मक आविष्कार घडवून ह्या प्रयोगाची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख करुन दिली. शैक्षणिक व संशोधन दृष्ट्या त्यांचे हे काम मोलाचे आहे. त्यांच्या सुलेखनात मोडी लिपीतून आलेला देवनागरी गोडवा हे त्यांच्या लोकप्रियतेचे प्रमुख कारण आहे.
महाराष्ट्र शासनाच्या रौप्य महोत्सवानिमित्त प्रकाशित झालेल्या आपला महाराष्ट्र व मार्ग प्रकाशनाच्या महाराष्ट्र या पुस्तकांत मुक्त लिपीच्या सुलेखनाचे नमुने आढळतात. ज्ञानेश्वर, रामदास, तुकाराम ह्या संतांच्या काव्यरचनांना सुलेखनाच्या माध्यमातून त्यांनी देखणे रुप दिले. तसेच ओम-अल्ला सारख्या सुलेखन-प्रदशर्नांतून सामाजिक बांधीलकी प्रकट केली.
जर्मनीतील ‘क्लिंगस्पोर’ या प्रख्यात सुलेखन संग्रहालयात आपली अक्षरचित्रे मांडणारे ते एकमेव भारतीय सुलेखनकार होत.
पॅरिसमधील एका भव्य व्यावसायिक संकुलाची सजावटीत जगभरातील सात सुलेखनकाराच्या बरोबर अच्युत पालव यांनी संस्कृत सुभाषितांच्या माध्यमातून देवनागरी लिपीला पॅरिसमध्ये पोहोचवली आहे.
Leave a Reply