उदगावकर, भालचंद्र माधव

उदगावकर, भालचंद्र माधव

विज्ञानशिक्षण प्रणालीत मूलभूत बदल घडवून आणणारे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ. मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टीआयएफआर)मध्ये मूलकण भौतिकीत संशोधन केले. विद्यापीठीय अभ्यासक्रमात त्यांनी बदल केले. शालेय आणि खालच्या आर्थिक स्तरातील विद्यार्थ्यांचे विज्ञान शिक्षण सुधारण्यासाठी त्यांच्या प्रेरणेने होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राची स्थापना झाली. मुंबई विद्यापीठात भौतिकी विभाग स्थापन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला.

जगात अणुयुद्ध होऊ नये त्यासाठी स्थापन झालेल्या पग्वाश समितीत २० वर्षे काम केले. समितीचे अध्यक्ष जोसेफ रॉटब्लॅट आणि कार्यकारिणी समिती यांना १९९५ सालचा शांततेचा नोबेल पुरस्कार विभागून मिळाला तेव्हा उदगावकर कार्यकारिणीचे सभासद होते. भारत सरकारच्या नियोजन मंडळावर आणि विद्यापीठ अनुदान मंडळावर विज्ञान शिक्षणाचे सल्लागार म्हणूनही काम केले.

प्रा. उदगांवकर यांनी विज्ञानाचा मराठीतून प्रसार करण्याचे ध्येय आजन्म उराशी बाळगले. १९८२ ते १९९१ अशी नऊ वर्षे ते मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते. विज्ञान आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांचा पद्मविभूषण देऊन सन्मान केला. पदार्थविज्ञानाचे अभ्यासक असलेल्या प्रा. उदगांवकर यांनी टाटा मूलभूत संशोधन संस्था आणि भाभा अणुशक्ती केंद्राच्या प्रगतीसाठी आयुष्य वेचले. टीआयएफआरमध्ये त्यांनी मूलकण भौतिकीत संशोधन केले. 

ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. भालचंद्र माधव उदगांवकर यांचे २१ डिसेंबर२०१४ रोजी वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले.

(माहितीस्त्रोत – म.वि.प.चा. विज्ञानतंत्रज्ञान कोष )

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*