काव्यसंग्राहक – संपादक, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, पुराणवस्तू संग्राहक असलेले दिनकर गंगाधर केळकर हे नाव ‘राजा दिनकर केळकर म्युझियम’ या संस्थेमुळे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असेच.
त्यांचा जन्म १० जानेवारी, १८९६ रोजी झाला. त्यांचे संपूर्ण शिक्षण बेळगाव व पुणे येथे झाले. ते वास्तव्याला पुण्यातच होते.
१९१५ पासून ‘अज्ञातवासी’ या टोपणनावाने ते काव्यलेखन करत असत.
श्री महाराष्ट्र शारदा मंदिर, पुणे या संस्थेचे ते संस्थापक होते. शारदामंदिर तर्फे केळकरांनी महाराष्ट्र शारदा ः भाग १ या ग्रंथाचे संपादन केले. परशुरामपंत, तात्यासाहेब गोडबोले, चिपळूणकर, केशवकुमार ते कवी अनिल यांच्यापर्यंत कवींच्या निवडक कविता त्यात समाविष्ट आहेत. भा. रा. तांबे यांची कविता, झेंडूची फुले, ह. स. गोखले यांच्या ‘काहीतरी’ काव्यसंग्रहातील कवितांचेही ते संग्राहक होते. अज्ञातवासींची कविता ‘अज्ञातवास’, ‘अज्ञातवासींची कविता ः भाग १, भाग २’ या काव्य संग्रहात समाविष्ट केल्या आहेत. निसर्ग, प्रेमविषयक, वात्सल्याने भारावलेल्या, जीवनचितनपर, गुढात्मक अशी त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. पराकोटीच्या इतिहास प्रेमातून त्यांनी पुराणवस्तुंचा संग्रह जमविला व आपल्या दिवंगत पुत्राच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘राजा केळकर’ ह्या पुराण वस्तुसंग्रहालायाची निर्मिती केली. यासाठी दिनकर केळकरांनी व त्यांच्या पत्नीनी सतत भ्रमंती करून, आर्थिक झीज सोसून या ऐतिहासिक सुंदर अशा कलावस्तुंचा संग्रह केला. हा पुराण वस्तुंचा अमोल ठेवा त्यांनी १९७९ साली राज्यशासनाच्या ताब्यात दिला. हे त्यांचे दातृत्वही असाधारणच होते.
Leave a Reply