फाळके, धुंडिराज गोविंद उर्फ दादासाहेब फाळके

जन्म- ३० एप्रिल, १८७०; त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र
मृत्यू- १६ फेब्रुवारी, १९४४; नाशिक, महाराष्ट्र

भारतातला क्रमांक एकचा उद्योग म्हणजेच चित्रपट निर्मितीचा – या चित्रपट उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली गेली १९१३ रोजी “राजा हरिशचंद्र” या पहिल्या मुक पटापासून. खर्‍या अर्थानं हा भारताचा पहिला चित्रपट होय. या पहिल्या चित्रपटाचे निर्माते, आणि जनक म्हणून ओळखले जाणारे “धुंडिराज गोविंद फाळके” उर्फ दादासाहेब फाळके.

दादासाहेब फाळकेंचा जन्म नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे ३० एप्रिल १८७० रोजी झाला. मुंबईच्या मराठा हायस्कूलमधून मॅट्रिक पर्यंतचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं आणि १८८५ मध्ये जे.जे. स्कूल ऑफ अर्टस् मध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि वर्षभरातच फर्स्ट ग्रेडची परीक्षा ते उत्तीर्ण झाले. त्यानंतर बडोदा येथे प्राध्यापक गज्जर यांच्या कलाभवनात “ड्रॉईंग”, “पेंटिंग”, ”मॉडेलिंग” तसंच फोटोग्राफीचं शिक्षण घेतलं. हे शिक्षण पूर्ण झाल्यावर फोटोग्राफी, हाफस्टोन ब्लॉक तयार करणे. इत्यादी सारखे छंद त्यांनी जोपासले. तसंच छायाचित्रकार आणि नेपथ्यकार म्हणूनही काम केलं. त्यांना मिळत असलेल्या शिष्यवृत्तीच्या पैशातून, त्यांनी फोटोग्राफी साठी स्टील कॅमेरा खरेदी केला, गज्जरांचा कलाभवन स्टुडिओ काही काळ चालवल्यानंतर फाळकेंनी गोध्रा येथे छायाचित्रणाचा स्वतंत्र उद्योग सुरु उद्योग सुरु केला. त्यानंतर १९०२ पासून भारत सरकारच्या पुरातत्व विभागात ३ वर्षं नोकरी केली. प्राचीन भूमिगत रेखाटनं करण्यासाठी त्यांनी प्रवास केला. वंगभंगाच्या चळवळीत सहभाग घेतल्यामुळे त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला त्यानंतर लोणावळा येथे “फळकेज आर्ट अॅण्ड प्रिंटींग वर्क्स या नावाने छापखान्याचा व्यवसाय सुरु केला, पण शेठ पुरुषोत्तम विश्राम मावजी यांनी व्यवसायात भांडवल दिल्याने व्यवसायाचे नाव “लक्ष्मी आर्ट प्रिंटींग वर्क्स” असे बदलले; भागीदारांशी झालेल्या मतभेदांमुळे एका पै चा ही हिस्सा न मागता फाळके यांनी “लक्ष्मी आर्ट” सोडले. त्यानंतर अनेक जादुचे प्रयोग खेळ दाखवून प्रोफेसर केळफा या नावानी दादासाहेब सर्वांचं मनोरंजन करत. पण मन उद्योगी, प्रयोशील, कलाकारी असल्यानं चौकटी बाहेरची निर्मिती करुन दाखवण्याचा फाळकेंचा ध्यास होता.

१९११ मध्ये येशुच्या जन्मावर आधारित “लाईफ ऑफ ख्राईस्ट” या चित्रपटापासून प्रेरणा घेत भारतात ही चित्रपट बनवण्याचा त्यांनी निश्चय केला. चित्रपट विषयक तांत्रिक ज्ञान मिळवण्यासाठी ते लंडन गेले. तिथुन त्यांनी कॅमेरा, कच्ची फिल्म सारखं साहित्य खेरेदी केलं आणि १ एप्रिल १९१२ मध्ये “फाळके फिल्म्स” ची स्थापना केली.

मे महिन्यात चित्रपटासाठीची सर्व सामग्री आणि तंत्र गोळा झाल्यावर जून-जुलै महिन्यात “रोपट्याची वाढ” या लघुपटाचा त्यांनी यशस्वी प्रयोग ही केला; “राजा हरिश्चंद्र” यांच्यावर आधारित मुकपटाची निर्मिती करण्याचं शिवधनुष्य दादासाहेबांनी यशस्वीरित्या पेललं; खर्‍या अर्थानं हे सिनेसृष्टीत पडलेलं पहिलं पाऊल होतं; “राजा हरिश्चंद्र” या मुकपटाचं लेखन, संवाद, दिग्दर्शन हे दादासाहेब फाळकेंचच होतं. या पहिल्याच चित्रपटाने अनेक विक्रम प्रस्थापित केले.

त्यानंतर फाळकेंनी “मोहिनी भस्मासूर”, “सत्यवान सावित्री”, “लंकादहन” सारख्या आशयपूर्ण चित्रपटांची निर्मिती केली. पुढे पाच भागीदारांसोबत “हिंदुस्थान सिनेमा कंपनी” स्थापन करुन एकदंर ४७ चित्रपटांची निर्मिती केली. “गंगावतरण” हा फाळकेंनी निर्मिती केलेला पहिला बोलपट, या व्यतिरिक्त दादासाहेब फाळके यांनी त्यांच्या कारकिर्दीत ३० लघुपटांची निर्मिती केली. भारतीय चित्रपट व्यवसायाच्या रौप्य महोत्सवात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. चित्रपट व्यावसायिकांतर्फे त्यांचा पैशांनी भरलेल्या थैलीनं गौरव केला गेला. असे भारतीय चित्रपटाचे आद्य जनक दादासाहेब फाळके यांचं निधन १६ फेब्रुवारी १९४४ रोजी नाशिक येथे झालं.

दादासाहेब फाळके यांनी चित्रपटासाठी दिलेल्या योगदानासाठी त्यांच्या नावाचा पुरस्कार १९७० पासून म्हणजेच फाळकेंच्या जन्मशताब्दी वर्षांपासून देण्यात येतो. हा पुरस्कार भारतीय सिने सृष्टीत ला सरकार तर्फे दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार होय.

दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर आधारीत हरीश्चंद्राची “फॅक्टरी” हा चित्रपट २०१० साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर खर्‍या अर्थानं सामान्य माणसाला त्यांची बर्‍यापैकी माहिती झाली.

दादासाहेब फाळके यांचे मराठीसृष्टीवरील लेख.

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके (16-Feb-2017)

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके (30-Apr-2017)

## Dadasaheb Phalke

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*