जन्म:
मृत्यू: २४ ऑक्टोबर, कराड
नाट्यनिर्माता म्हणून सत्तर ते ऐंशीच्या दशकात जे रंगकर्मी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उदयाला आले आणि आपला छोटासा का होईना पण गडद ठसा उमटवून गेले, त्यात जयसिंग चव्हाण यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. मूळचे ते कराडचेच. साजूर हे त्यांचे गाव. गरिबी पाचवीलाच पुजलेली असल्यामुळे ते गाव सोडून नोकरी आणि शिक्षणासाठी मुंबईला आले. बेस्टमध्ये जनसंपर्क विभागात नोकरी करताना त्यांचा संबंध प्रख्यात साहित्यिक श्री. ना. पेंडसे यांच्याशी आला आणि चव्हाणांच्या वृत्तीतले नाटकवेड उफाळून वर आले.
पेंडसे यांचे ‘संभूसांच्या चाळीत’ हे नाटक त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर सादर करायचे ठरवले. हे नाटक चांगलेच गाजले आणि चव्हाणांच्या ‘नटेश्वर’ या संस्थेकडे साऱ्यांचे लक्ष वेधले गेले. त्यानंतर चव्हाणांनी ‘असं झालं आणि उजाडलं’, ‘अखेरचा राणा’ ही नाटके सादर केली. त्यांच्या नाट्यकारकीदीर्तील महत्त्वाचा टप्पा म्हणजे ‘सखाराम बाइंडर’ हे नाटक. आपले मित्र कमलाकर सारंग यांना आवडलेले हे नाटक ‘नटेश्वर’तफेर् रंगभूमीवर आणायची तयारी त्यांनी दाखवलीच; पण या नाटकावर सर्व बाजूंनी हल्ले होत असताना कचही खाल्ली नाही. ‘सखाराम बाइंडर’बरोबरच जयसिंग चव्हाण हे नावही त्याचा निर्माता म्हणून नाट्येतिहासात नोंदले गेले. त्यानंतर त्यांनी ‘जंगली कबुतर’, ‘बेबी’, ‘चक्रव्यूह’, ‘युवर ऑनर’, ‘सहज जिंकी मना’, ‘सूर्यास्त’, ‘मॅडम’ अशी अनेक नाटके उत्तमरीत्या सादर केली. नाटकासारख्या आतबट्ट्याच्या व्यवसायातही त्यांची सचोटी आणि प्रामाणिकपणा ढळला नाही. यश आले, तसेच अपयशही आले; पण म्हणून ते कधीही सवंग नाट्यनिर्मितीकडे वळले नाहीत. दरम्यानच्या काळात त्यांनी पर्यटन व्यवसायातही आपले पाय रोवले. गावचा ओढा कायम असल्याने साजरेश्वर ग्रामविकास मंडळाची स्थापना करून त्याद्वारे त्यांनी पाणीपुरवठा योजना, तरुणांसाठी व्यायामशाळा, सर्वसामान्यांसाठी घरकुल योजना असे उपक्रम यशस्वीपणे राबवले.
नाट्यनिर्माता या ओळखीबरोबरच त्यांनी अ. भा. मराठी नाट्यपरिषदेच्या माध्यमातून कार्यकर्ता ही आपली दुसरी ओळखही दृढ केली. १९९२पासून पुढील १० वर्षे ते नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह होते. या काळात नाट्यसंकुलाची पूर्तता व्हावी म्हणून त्यांनी खूप धडपड केली. कराड येथे झालेल्या ८४व्या नाट्यसंमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. पुढे प्रकृति अस्वास्थामुळे त्यांना सक्तीची विश्रांती घ्यावी लागल्यामुळे ते नाट्यव्यवहारापासून पूर्णपणे बाजूला झाले. आता तर ही सळसळ कायमची थांबली आहे.
Leave a Reply