लक्ष्मणराव किर्लोस्कर

Kirloskar, Laxmanrao

लक्ष्मणराव किर्लोस्कर हे महाराष्ट्रातील प्रसिध्द उद्योगपती व कारखानदार, किर्लोस्कर उद्योगसमुहाचे मुख्य प्रवर्तक. त्यांचा जन्म २६ जून १८६९ रोजी झाला. महाराष्ट्राचे हेन्रीफोर्ड या नावाने गौरवण्यात आले आहे.

आज जगाचा वेग वाढवण्यास कारणीभूत ठरलेल्या विमानाच्या शोधाचे जनक राईट बंधू आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाची मुहूर्तमेढ रोवणारे लक्ष्मणराव किर्लोस्कर  या दोघांचाही जन्म एकाच काळातील आणि दोघांनीही प्रारंभी सायकलचेच दुकान चालवले. गेल्या शंभर वर्षांत हवेत उडण्याच्या माणसाच्या स्वप्नाचा एक प्रचंड मोठा उद्योग झाला आणि किर्लोस्करांनी लावलेल्या छोटय़ाशा रोपटय़ाचे वटवृक्षात रूपांतर झाले.

१० मार्च १९१० रोजी सांगली जिल्ह्यातील कुंडल रोड या खेडेगावात किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड या उद्योगाला सुरुवात झाली. याच गावाचे नामकरण नंतर किर्लोस्करवाडी असे झाले. पण त्या जागेत सुरू झालेल्या एका उद्योगाला तेथील सगळय़ांच्या घामाने आणि लक्ष्मणरावांच्या कल्पकतेने झळाळी आली.

स्वातंत्र्यचळवळीचा एक भाग म्हणून स्वदेशीचा पुरस्कार करणाऱ्यांनी आपापल्या परीने चळवळीत योगदान दिले होते. लक्ष्मणरावांनी इंग्लंडमध्ये स्थापन होत असलेल्या औद्यौगिक वसाहतींबद्दल वाचले होते. तसा प्रयत्न देशात करण्याचा त्यांचा मानस, औंध संस्थानचे राजे श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी रेल्वेस्थानकाजवळ असलेली जागा देणगी म्हणून दिल्याने आकाराला आला. सुनियोजित पद्धतीने किर्लोस्करांनी कारखान्याची उभारणी केली. त्या काळात सगळय़ांना वेगळे वाटेल, असे अनेक उपक्रम त्यांनी सुरू केले. त्यांनी या भागात निवासाची उत्तम व्यवस्था निर्माण केली. कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी माध्यमिक शाळाही सुरू केली. खेळांची उत्तम व्यवस्था हेही या गावाचे एक वैशिष्टय़ ठरले. क्रिकेट क्लब, गोल्फ क्लब, टेनिस कोर्ट, पोहण्याचा तलाव अशा अनेक सुविधा या भागात होत्या. किर्लोस्करांच्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना तेथे राहणे सुखकर व्हावे, याकडे लक्ष्मणरावांचा कटाक्ष असे. स्वतंत्र पोस्ट कार्यालय हेही या गावाचे वेगळेपण ठरले होते.

त्या काळातील क्रमांक दोनचा औद्योगिक परिसर (पहिला क्रमांक जमशेदपूरचा.) म्हणून किर्लोस्करवाडीला मिळालेला मान हा या सगळ्या कल्पनांचाच गौरव  आहे. कारखाना सुरू करण्याची मराठी माणसाची तयारी नसते, मराठी माणूस नोकरी करण्यात जास्त रस घेतो, हे समज खोटे ठरावेत, असे काम लक्ष्मणराव किर्लोस्करांनी करून दाखवले. कोणत्याही स्थितीत कारखान्यातील उत्पादनाचा दर्जा घसरता कामा नये, यासाठी लक्ष्मणरावांची धडपड असे.

लक्ष्मणरावांनी बेळगावात सायकल दुरुस्तीचे दुकान सुरू केले, तरी त्यांची स्वप्ने फार मोठी होती. लहानपणापासून परिसरात दिसत असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी त्यांच्यासाठी फार महत्त्वाच्या होत्या. शेतकऱ्यांसाठी नवी उपकरणे तयार करणे हे त्यांचे ध्येय होते. किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडने शेतकऱ्यांसाठी जी उपकरणे बनवली, त्याला शेतकऱ्यांनी अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद दिला. किर्लोस्करांनी तयार केलेला लोखंडी नांगर प्रत्येक शेतकऱ्यासाठी मोलाचा ठरला आणि भारतातील शेतकऱ्यांच्या तोंडी किर्लोस्कर हे नाव तात्काळ रुळले. किर्लोस्कर पंप हे तर देशातील शेतांवर हमखास दिसणारे यंत्र असे. शेतकऱ्यांचे जगणे सुखकर व्हावे, हा लक्ष्मणरावांचा ध्यास होता.

एखादा उद्योग सुरू झाला तरी तो पुढे सुरू राहणे आणि त्याचा विकास होणे यासाठी पुढची पिढी कर्तबगार असावी लागते. लक्ष्मणराव त्याबाबत नशीबवान ठरले. शंतनुरावांनी आपल्या कर्तृत्वाने हा उद्योग मोठा केला आणि देशातील कानाकोपऱ्यात त्याची उत्पादने पोहोचवली. केवळ उद्योगापुरते किर्लोस्कर हे नाव अग्रेसर राहिले नाही, तर ‘किर्लोस्कर’, ‘मनोहर’ आणि ‘स्त्री’ यांसारखी नियतकालिके हीही त्यांची एक वेगळी ओळख ठरली. मराठी पत्रकारितेमध्ये या नियतकालिकांचे योगदान फार मोलाचे आहे. साऱ्या देशात उद्योगांना प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या बिनीच्या उद्योगपतींमध्ये लक्ष्मणरावांचे आणि त्यांच्या किर्लोस्कर उद्योगसमूहाचे नाव अग्रेसर राहिले आहे.

त्यांचा मृत्यु २६ सप्टेंबर १९५६ ला झाला.

(संदर्भ : महाजालातील संदर्भस्थळे, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स आणि पुढारी या वृत्तपत्रांतील विविध माहिती)

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*