सोलापूर शहर आणि ‘दाते पंचांग’ यांचा ऋणानुबंध जवळजवळ ९५ वर्षाचा. आज पाच लाख इतका खप असलेले ‘दाते पंचांग’ अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहे. ९५ वर्षापूर्वी पंचांगकार्याची मुहूर्तमेढ नाना ऊर्फ लक्ष्मणशास्त्री दाते यांनी रोवली. लक्ष्मणशास्त्री दाते यांनी लावलेल्या वृक्षाने आज विशाल रूप धारण केले आहे.
१९७७ सालापासून मोहनराव दाते या व्यवसायात आहेत. १९९५ साली धुंडीराजशास्त्रींचे निधन झाल्यानंतर ‘दाते पंचांग’ चालविण्याची जबाबदारी मोहनराव दाते यांच्यावर पडली. तेव्हापासून आतापर्यंत मोहनराव ती जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत हे दाते पंचांगाच्या लोकप्रियतेवरून दिसून येतच आहे. त्यांचा जन्म ११ जुलै १९५४ रोजी झाला. पंचांग कार्यात अधिकारवाणीने भाष्य करणारी व्यक्ती म्हणून मोहनराव दाते यांनी नावलौकिक प्रश्नप्त केला आहे.
एक लाख रुपये रोख, प्रशस्तिपत्र, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दिल्ली येथे येत्या ३ जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमात आचार्य श्री विद्यानंदजी आणि बेळगावचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित बाहुबली उपाध्ये यांच्या उपस्थितीत मोहनरावांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. धर्मशास्त्र, मुहूर्तशास्त्र, पत्रिका, गणित आदी विषयातील लोकोपयोगी अभ्यासासाठी आणि या क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल मोहनरावाची या पुरस्कारासाठी केलेली निवड सार्थच मानावी लागेल. यंदाच्या वर्षी २१ जून रोजी ज्योतिषी म. दा. भट गौरव पुरस्कार केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते देऊन त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली होती.
पंचांगक्षेत्रात दाते घराण्याचे असे चार पिढय़ांचे योगदान आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांची वाढत चाललेली लोकप्रियता लक्षात घेऊन वेबसाइटच्या माध्यमाद्वारेही पंचाग सर्वदूर पोहोचविण्याचे कार्य पंचागकर्ते दाते करीत आहेत. भारत सरकारचे ‘राष्ट्रीय पंचांग’ तपासण्यासाठी दाते यांच्याकडे येत असते. हे लक्षात घेता दाते पंचांगकर्ते यांचा या क्षेत्रातील अधिकार किती मोठा आहे याची कल्पना यावी. लहानपणापासून घरातील संस्कारांबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात वाढलेले मोहनराव दाते सोलापूरच्या समर्थ बँकेचे संस्थापक अध्यक्ष होते.
Leave a Reply