निलेश दत्ताराम बामणे हे ठाण्यामधील प्रतिभावंत व हौशी लेखक व कवी असून नुकतेच त्यांच्या ‘कवितेचा कवी’ व ‘प्रतिभा’ या दोन कवीतासंग्रहांनी, अगदी थाटात मराठी कविताविश्वामध्ये आगमन केले. ठाण्याच्या सिध्दी फ्रेन्डस पब्लिकेशनतर्फे प्रकाशित झालेले हे कवितासंग्रह अनुक्रमे 2009 व 2010 मध्ये प्रकाशित झाले व त्यांना मराठी रसिकांकडुन उदंड प्रतिसाद लाभला.
कवितांप्रमाणेच कथालेखनामध्येही त्यांची उत्तुंग प्रतिभा आपले निरनिराळे अविष्कार, व लोकांना खिळवून ठेविण्याची अनोखी कला दाखवत असतेच, परंतु व्यापक अर्थाने त्यांना इतरांच्या नजरेत, व अखिल महाराष्ट्राच्या साहित्यपटलावर आणण्यात त्यांच्या कवितांचा वाटा खचितच मोठा आहे. बामणे हे लहान असल्यापासुनच कवीमनाचे असल्यामुळे पटकन एखादा विचार किंवा भावना मनात आली तर ती व्यक्त करण्यासाठी त्यांना माणसांपेक्षा कागदाची व लेखणीचीच गरज अधिक भासायची. त्यांनी अनेक नामांकित वृत्तपत्रांमधून, मुक्त पत्रकार तसेच मराठी मासिकांमधून लेखक म्हणूनही काम केले आहे. सध्या ते माझे व्यासपीठ नावाच्या प्रथितयश मासिकाचे सहसंपादक म्हणून आपल्या लेखणीची जादु वाचकांच्या आठवणींच्या पानांवर उमटवित आहेत. त्यांचा जन्म 10 मे, 1979 मध्ये ठाणे येथे झाला तर सध्या ते गोरेगाव येथे वास्तव्यास आहेत. बामणे यांचा लेखन हा श्वास असला तरी शिक्षणाने ते कॉमर्स क्षेत्रामधील विद्यार्थी होते. त्यांनी कॉम्प्युटर बेसिक व डी. टी. पी. चा कोर्स देखील केला गेले.
Leave a Reply