काही कलाकारांचा जन्म हा ठराविक भूमिका करण्यासाठीच झालेला असतो. त्याशिवाय ती व्यक्तिरेखा परिपूर्ण होत नाही असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. आपल्याकडे पौराणिक चित्रपटांची निर्मिती ही मुकपटापासूनच सुरु झाली होती. हा प्रवाह बोलपटांमध्येही होत राहिला आणि आजही कायम आहे. त्यातील अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरले, काही उल्लेखनीय ठरले तर काही पौराणिक चित्रपटांनी यशाचे उच्चांक नोंदवले, त्यातलाच एक उल्लेखनीय चित्रपट म्हणजे ”जय संतोषी मॉं”. १९७५ रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाची कथा ही प्रत्येक प्रेक्षकाच्या मनाला भिडणारी अशी होती. त्याचं प्रमुख कारण म्हणजे कलाकारांचा दिलखेचक अभिनय, देव आणि भक्त यांचं नातं आणि भक्ताची प्रतिमा साकारणार्या अभिनेत्री इंदूमती पैंगिणकर. या सर्व गोष्टींमुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान लोकप्रिय ठरला.
खरंतर अभिनेत्री इंदूमती पैंगिणकर यांनी १९६२ पासून या क्षेत्रात प्रवेश केला. बालपणीच म्हणजे शाळा त्यानंतर महाविद्यालयातून, मेळ्यांमधून संस्कृत, मराठी, हिंदी, कन्नड नाटकांमधून भूमिका केल्या. अर्थशास्त्र व इतिहास हे विषय घेऊन एम.ए. चं शिक्षण पूर्ण केल्यानंतर अॅक्यूपंक्चर आणि ब्युटिशियन या विषयांचं अध्ययन त्यांनी केलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेचंच त्यांचा विवाह शशिकांत पैंगिणकर यांच्याशी झाला. लग्नानंतर गोव्यातल्या पैंगिण गावातून त्यांनी मुंबईत स्थलांतर केले. इंदूमती पैंगिणकर या मूळ गोव्याच्या असल्याने मुंबईतल्या ”गोमंतक मराठा समाजाशी” अनेक कारणांनी त्यांचा संबंध येत असे. याच संस्थेनी ”वर्तुळाचे दुसरे टोक” हे नाटक नंदकुमार रावते यांच्या दिग्दर्शनाखाली महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत सादर केलं होतं. त्यामधल्या त्यांच्या भूमिकेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कारही मिळाला होता.
पुढे गोवा हिंदू असोसिएशनने इंदूमती पैंगिणकरांना ‘महाराणी येसूबाईंची’ भूमिका साकारण्याची संधी दिली. व्यावसायिक रंगभूमीवर त्यांचं पडलेलं ते पहिलं पाऊल होय. त्यानंतर त्यांना अनेक हिंदी नाटकात सुद्धा भूमिका मिळू लागल्या. या अनुभवाच्या बळावर त्यांचा हिंदी सिनेसृष्टीत प्रवेश झाला. ”कानन कौशल” या नावाने त्यांनी चित्रपटांसाठी अभिनय केला. पण ”जय संतोषी मॉं”च्या भव्य यशानं त्याचं हे नाव काही काळ तरी बाजूला पडलं आणि त्या प्रेक्षकांमध्ये ”संतोषी माता” याच नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. त्यानंतरही अनेक पौराणिक चित्रपट त्यांच्या वाट्याला आले पण म्हणाव्या तशा त्यांच्या इतर व्यक्तिरेखा फारशा गाजल्या नाहीत. हिंदी चित्रपटांसोबतच मराठी, गुजराती आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये विविध भूमिका त्यांनी साकारल्या. गुजराती चित्रपटात त्यांनी भूमिका केलेल्या जवळजवळ सर्वच भूमिकांना मान-सन्मान आणि पुरस्कारही मिळाले. उल्लेख करावा असे त्यांचे महत्वपूर्ण मराठी चित्रपट म्हणजे पाहुणी, भाबडी, मान-अपमान, एकटी, कार्तिकी, मामा-भाचे, लक्ष्मणरेखा, चंद्र आहे साक्षीला, श्रद्धा. यासोबतच १८ ते २० हिंदी मराठी नाटकांमधून महत्वाच्या भूमिका त्यांनी केल्या. १९६२ ते १९९२ अशी तीस वर्षांची कारकीर्द रंगभूमी तसेच रुपेरी पडद्यावर व्यतीत केल्यानंतर काही काळ लोकप्रभेत ”रुपसाधना” या मथळ्याने सौंदर्य या विषयावर लेखही लिहिले. त्यांच्या या निर्मितीला उत्कृष्ट वाङमय निर्मितीचा पुरस्कारही मिळाला. तर ”वधूचा साजशृंगार” हे त्यांचं पुस्तकही प्रकाशित झालं.
भावपूर्ण आणि लाघवी चेहरा, बोलके डोळे, उंच तसंच शिडशिडीत बांधा असंच काहीसं वर्णन इंदूमती पैंगिणकर यांच्या व्यक्तिमत्वाचं करता येईल. अभिनयासोबतच लेखिका म्हणून त्यांनी मिळवलेली ओळख ही सुद्धा त्यांचा महत्वाचा पैलू असल्याचं सांगते.
Leave a Reply