प्रसाद सावकार

मराठी संगीत रंगभूमीवरील प्रख्यात गायक-नट प्रसाद सावकार यांचा जन्म १४ डिसेंबर १९२८ रोजी बडोदे येथे झाला.

गोंयची भूमी ही कला- संस्कृतीचं माहेरघर म्हणून ओळखली जाते. संगीत नाटक व नाट्यसंगीत हा तर गोव्याचा प्राण! रघुवीर सावकार, गोपीनाथ सावकार, प्रसाद सावकार असे संगीत रंगभूमीवर ‘सावकारी’ करणारे तालेवार घराणे या भूमीत निर्माण झाले, ते याचमुळे.

प्रसाद सावकार यांना नाट्य परिषदेने जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केल्याने या घराण्याच्या नाट्यसेवेचा यथोचित गौरव झाला आहे. वडील रघुवीर सावकार आणि काका गोपीनाथ सावकार यांच्या नाटक कंपन्या असल्याने बालपणापासूनच प्रसाद सावकारांना नाटकाचे बाळकडू मिळाले. ‘सं. संशयकल्लोळ’ हे सावकारांच्या कंपनीचे पेटंट नाटक. त्यात सावकारांनी सगळ्याच भूमिका केल्या आहेत.

गेले अर्धशतक ते नाट्यसृष्टीत सक्रिय आहेत. या वाटचालीत त्यांनी जुन्या-नव्या संगीत नाटकांबरोबरच गद्य नाटकांतूनही कामे केली. ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘मंदारमाला’, ‘सुवर्णतुला’, ‘जय जय गौरीशंकर’, ‘कटय़ार काळजात घुसली’ आदी नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजल्या. ऐन उमेदीत एकाच वेळी तीन-तीन वेगवेगळ्या नाटकांचे प्रयोग ते करत असत. दिसणे, गाणे आणि अभिनय ही गायक नटाला आवश्यक तिन्ही अंगे त्यांच्यापाशी होती. ‘मंदारमाला’मध्ये पं. राम मराठे यांच्यासारख्या दिग्गज कलावंताबरोबर त्यांची गाण्याची जुगलबंदी होत असे. गोड आवाज आणि स्वर लावण्याच्या पद्धतीमुळे प्रसाद सावकार आणि त्यांच्यातली ही जुगलबंदी रंगत असे. सततच्या प्रयोगांमुळे आणि गाण्यांच्या शिकवण्यांमुळे त्यांच्या आवाजावर पुढे विपरीत परिणाम झाला आणि त्यांचे गाणे थांबले. या अकल्पित आघातामुळे ते दु:खीकष्टी झाले तरी त्यांनी हार मानली नाही. ज्या ‘कटय़ार काळजात घुसली’मध्ये त्यांनी गायक सदाशिवची भूमिका गाजवली होती, त्याच ‘कटय़ार’मध्ये त्यांनी संगीताचा कान असलेल्या, पण गळा नसलेल्या बांकेबिहारीची भूमिका करून त्यावरही आपली छाप उमटविली.

‘पंडितराज जगन्नाथ’मध्ये त्यांना सुरुवातीला एकच गाणे होते. पण त्यांच्या गाण्यावर फिदा झालेल्या रसिकांनी त्यांच्यासाठी आणखी एखादे गाणे नाटकात घालण्याची मागणी केल्यानंतर ‘जय गंगे भागीरथी’ हे गाणे त्यात घालण्यात आले आणि ते चांगलेच गाजले.

त्यांना नृत्याचेही अंग होते. ‘अमृतमोहिनी’मध्ये ते उत्तम नृत्य करीत. एखाद्या गंभीर भूमिकेतही त्यांच्या मिश्कील स्वभावामुळे ते हसे पिकवीत. गोष्टीवेल्हाळपणामुळे त्यांच्याकडे किस्स्यांचा खजिनाही भरपूर; त्यामुळे त्यांना मित्रपरिवारही खूप लाभला. आवाज गेल्याने त्यांनी काही काळ नाट्यसंन्यास घेतला आणि ते गोव्यात वास्तव्याला गेले. अलीकडेच नाट्यसंपदेच्या ‘अवघा रंग एकचि झाला’ या नाटकात त्यांनी प्रभाकर पणशीकरांच्या आग्रहाखातर कीर्तनकार बुवांची भूमिका साकारली. वयाची ऐंशी पार केलेला हा रंगकर्मी ज्या तडफेने या भूमिकेत उभा राहिला, त्याचे रसिकांना भारी कौतुक वाटले. कुणाच्या अध्यामध्यात न पडण्याच्या वृत्तीमुळे आणि आनंदी राहण्याच्या व दुसऱ्यांना आनंद देण्याच्या स्वभावामुळे ते जिथे जातील तिथे गप्पांची मैफल जमवतात. अशा रंगकर्मीचा होणारा हा सन्मान म्हणजे एका आनंदयात्रीच्या नाट्यप्रवासाला दिलेली दादच म्हणायला हवी.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*