राम सुतार हे ब्राँझ धातूपासून, दगडापासून आणि मार्बलपासून पुतळे घडविण्यात ते तज्ज्ञ आहेत. त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९२५ रोजी धुळे जिल्ह्यातील गोंदूर येथे झाला. देशभरातील अनेक शिल्पकार राम सुतार यांना गुरुस्थानी मानतात. राम वंजी सुतार हे त्यांचे पूर्ण नाव. मूळचे धुळ्याचे असलेले शिल्पकार राम सुतार यांचे वडील वनजी लाकडी वस्तू व कृषी अवजारे बनवायचे. राम यांना वडिलांकडूनच कलाकुसरीच्या वस्तू साकारण्याचे कौशल्य मिळाले.
१९५२ ते ५८ च्या दरम्यान अजिंठा-वेरुळ येथील शिल्पांच्या डागडुजीचे आणि नंतर पंचवार्षिक योजनांचे लाभ सांगणारी लघुशिल्पे बनविण्याचे काम राम सुतार यांनी सरकारी नोकरीत राहून केले.
राम सुतार यांनी संसद भवनाच्या आवारातील मौलाना आझाद (१८ फूट), इंदिरा गांधी (१७ फूट), राजीव गांधी (१२ फूट), गोविंदवल्लभ पंत (१० फूट) आणि जगजीवनराम (९ फूट) असे अनेक पुतळे घडविले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या शिल्पांसह अनेक शिल्पांची निर्मिती त्यांनी केली आहे.
फ्रान्स, इटली, अर्जेंटिना, रशिया, इंग्लंड या ठिकाणीही त्यांनी साकारलेली शिल्पं उभी आहेत. रवीन्द्रनाथ टागोर यांचा टोकिओतील पुतळा राम सुतार यांनी निर्मिलेला आहेत. गांधीजींचे त्यांच्या स्टुडिओत घडलेले अनेक अर्धपुतळे भारत सरकारने परदेशांना भेट म्हणून दिलेले आहेत.
नेत्यांच्या जीवनातील प्रसंगांचे दर्शन घडविणारी भित्तिशिल्पे हेही सुतार यांचे वैशिष्टय़. दिल्लीत राजीव गांधी यांचे योगदान सांगणारे भित्तिशिल्प तसेच जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या तीन पिढय़ांची कारकीर्द एकत्रित मांडणारे मोठे भित्तिशिल्प राम सुतारांच्या कल्पनेतून साकारले आहे. चंबळ नदीवरील गांधीसागर धरणानजीकचे ‘चंबळा आणि तिला बिलगलेली दोन बालके’ (बालके हे या धरणाचे लाभ मिळणाऱ्या मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांचे प्रतीक) असे ४५ फुटी शिल्प, हा त्यांच्या कलेतील ‘भारतीयते’चा आदर्श ठरला.
राम सुतार यांनीच गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा साकारला आहे. त्याची उंची १८२ मीटर इतकी आहे. याशिवाय मुंबईत बसविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३७.२ मीटर उंचीचा पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा २१२ मीटर उंचीचा पुतळाही ते साकारत आहेत. तसेच, सध्या अयोध्येतील राम मूर्ती बनविण्याचे काम राम सुतार करत आहेत. अयोध्येतील रामाची मूर्ती ही जगात सर्वाधिक उंच असणार आहे.
पद्मश्री, पद्मभूषणने राम सुतार यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून देण्यात येणारा २०१६ या वर्षासाठीचा टागोर पुरस्कार मिळाला आहे.
ते दिल्लीजवळ उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये स्थायिक झाले आहेत. राम सुतार यांनी १९६० पासून आपला स्वतंत्रपणे स्टुडिओ थाटला. सध्या नोएडात त्यांचा सेक्टर 63 येथे स्टुडिओ असून येथेच ते काही वर्षांपासून अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचे पुतळे, मूर्ती साकारत आहेत. त्यांच्या शिल्पकलेचा वारसा मुलगा अनिल, नातू समीर व नात सोनाली हे चालवित आहेत.
Leave a Reply