ज्येष्ठ गायक, अभिनेते रामदास कामत यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९३१ रोजी म्हापसा येथे झाला.
व्यावसायिक मराठी संगीत रंगभूमीवर अभिनेता आणि गायक म्हणून स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण करणारे आपली नाममुद्रा केवळ नाटय़संगीतावरच नव्हे तर भावसंगीत, चित्रपट संगीत आणि लोकसंगीतावरही ज्यांनी तेवढय़ाच समर्थपणे उमटविली व ज्यांची गाणी आज इतक्या वर्षांनंतरही रसिकांच्या स्मरणात आणि ओठावर आहेत ते रामदास कामतहे मूळचे गोव्याचे.
मराठी रंगभूमीवरील संगीत नाटकांच्या सुवर्णयुगाचे साक्षीदार असलेले पंडित रामदास कामत लहानपणीपासून वडिल बंधू उपेंद्र यांच्याकडून संगीताचे धडे गिरवणाऱ्या कामत यांनी नाट्यसंगीताचेही शिक्षण घेतले. पंडित गोविंद बुवा अग्नी, पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित भीमसेन जोशी यांच्याबरोबरच प्रभाकर पेंढारकर आणि भालचंद्र पेंढारकर यांच्या हाताखाली त्यांनी नाट्यसंगीत आणि अभिनयाचे प्रशिक्षण घेतले होते.
कामत मुंबईला येऊन अर्थशास्त्राचे पदवीधर झाले. पण त्यांच्या मनात गाणे कायम रुंजी घालत होते. तरी आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना संगीताला वाहून घेणे शक्य झाले नाही. नोकरी सांभाळूनच ते आकाशवाणीवर गात आणि जमेल तेव्हा संगीत नाटकांत कामे करीत. १९६४साली आलेल्या ‘मत्स्यगंधा’ नाटकाने रामदास कामत यांचे नाव घराघरांत पोहोचले आणि पुढे ते गायक अभिनेते म्हणूनच प्रसिद्धीस आले.
नंतर रामदास कामत यांनी ‘एकच प्याला’, ‘कान्होपात्रा’, ‘धन्य ते गायनी कळा’, ‘मदनाची मंजिरी’, ‘मानापमान’, ‘मीरा मधुरा’, ‘मृच्छकटिक’, ‘शारदा’, ‘संन्याशाचा संसार’, ‘सौभद्र’, ‘स्वरसम्राज्ञी’, ‘होनाजी बाळा’ आदी संगीत नाटकांतून कामे केली. ही सर्व नाटके आणि त्यातील गाणी गाजली. पण त्यातही ‘मत्स्यगंधा’ व ‘ययाति आणि देवयानी’ या नाटकांनी त्यांना सर्वाधिक लोकप्रियता मिळवून दिली. ‘मत्स्यगंधा’ नाटकात त्यांनी ‘पराशर’ तर ‘ययाति आणि देवयानी’ नाटकात ‘कच’ या भूमिका साकारल्या. या दोन्ही नाटकांतील ‘गुंतता हृदय हे कमलदलाच्या पाशी’, ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’, ‘नको विसरु संकेत मीलनाचा’, ‘साद देती हिमशिखरे’ (सर्व मत्स्यगंधा) तसेच ‘तम निशेचा सरला’, ‘प्रेम वरदान स्मरत राहा’ (ययाति आणि देवयानी) ही त्यांची नाटय़पदे गाजली.
Leave a Reply