१९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यातील ठाण्यातील सर्वात जास्त गाजलेले प्रकरण म्हणजे पारसिक बोगद्याचे प्रकरण. पारसिक बोगदा म्हणजे मुंबई व महाराष्ट्राचा अंतर्भाग यांना जोडणारा मार्ग, तो जर उध्वस्त केला तर मुंबईचे इतर भागाशी दळणवळण तुटेल याची सर्वांनाच कल्पना होती. म्हणून त्याचे संरक्षण करण्याची ब्रिटिश राज्यकर्त्यांनी आवश्यक ती सर्व काळजी घेतली होती. ठाण्यातील काही धाडसी तरुणांनी हे संरक्षक कवच तोडून बोगद्यामध्ये बॉम्बस्फोट करण्याचे ठरविले. त्या तरुणांच्या गटाचे नेतृत्व श्री. रमेश चिटणीस यांचेकडे होते. ते विज्ञानाचे विद्यार्थी असल्यामुळे बॉम्ब कसा तयार करावयाचा, त्याचा स्फोट कसा घडवून आणावयाचा याबाबतचे तांत्रिक ज्ञान माहित करुन घेणे त्यांना शक्य झाले. ठाण्यातीलच त्यांचे काही मित्र मोरेश्वर नाचणे, हरी कोळी वगैरे एकत्र करुन त्यांनी स्फोटाची योजना तयार केली. एका काळोख्या रात्री बोगद्यात जावयाचे ठरले. तेथे न्यावयाचे सामान अवजड तर होतेच शिवाय नेताना कोणाला न कळू देण्याची काळजी घेणे आवश्यक होते. त्यावेळी ठाण्यात फक्त २/३ टॅक्सी होत्या. त्यापैकी एकाला विश्वासात घेऊन डिकीत सर्व सामान ठेवून बोगद्याच्या अगदी जवळ ते उतरविले. काही जण टॅक्सीत व काही जण पायी बोगद्यापाशी पोहोचले. टॅक्सीवाला काम झाल्यावर परत निघाला. पण तो माहितगार असूनही घाबरल्यामुळे ठाण्यात आल्याबरोबर पोलिसांना सर्व हकिकत सांगितली. इकडे स्फोटाची सर्व तयारी होत असताना पोलिस तेथे हजर झाले. रमेश चिटणीस यांचेसह सर्वजण पकडले गेले. ठाणे कोर्टात या संबंधीचा खटला चालू असताना रोज खूप गर्दी जमावयाची. त्यात तरुणांचाच भरणा अधिक असावयाचा मुंबईतील प्रसिद्ध वकील श्री. कवळेकर या तरुणांची बाजू कोर्टात मांडत असत. त्यांनी केलेल्या युक्तिवादामुळे या तरुणांवरील आरोप सिद्ध होऊ शकला ना ी. पण तरीही या सर्व तरुणांना श्री. रमेश चिटणीस यांचेसह स्थानबद्ध करण्यात आले. स्वातंत्र्य लढ्यातील ठाण्यातील हे एक महत्वाचे व गाजलेले प्रकरण होते.
श्री. रमेश चिटणीस या तरुणांच्या गटाचे नायक होते.
Leave a Reply