गेली ६० वर्षे सिनेमा, नाटक, मालिका, जाहिरातींमधून अथकपणे अभिनयाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या रेखा कामत. वय वर्षे ८० चा टप्पा गाठूनही कार्यमग्न असलेल्या रेखा कामतांसाठी अभिनय म्हणजे लाखामोलाची गोष्ट म्हणता येईल. १९५२ ते २०१२ अशी ६० वर्ष सिनेमा, नाटक व मालिकांच्या माध्यमातून मराठी मनांवर राज्य करणा-या या अभिनेत्रीच्या कारकीर्द सुरुवात झाली ती लहानपणी मेळ्यात काम करण्यापासून. त्यांचं माहेरचं नाव कुमुद सुखटणकर.
कुमुद व तिच्या पाठची कुसुम या दोघींना नाचण्या-गाण्याची प्रचंड आवड होती; दादरमधील इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या मुलींच्या शाळेत शिकत असताना त्यांनी नृत्यगायनाचे धडे गिरवायला सुरुवात केली, गौरीशंकर (कथ्थक) व पार्वतीकुमार (भरतनाटय़म्) अश्या नामवंत गुरू कडून. तर गाण्यासाठी भानुदास मानकामे व घोडके गुरुजींकडून गायनाचे धडे गिरवले; त्यांचा कलासक्त गुणांमुळे वयाच्या १५व्या वर्षीच ‘सचिनशंकर’ यांच्या रामलीला या प्रसिद्ध बॅलेत या दोन बहिणींना पहिला ब्रेक मिळाला.
या नृत्यनाटिकेत त्यांनी अमुक एकच नव्हे तर माकडांपासून राक्षसांपर्यंत पडतील त्या भूमिका समरसून निभावल्या. एकदा योगायोगानं प्रसिध्द अभिनेत्री हंसा वाडकर यांनी रेखा व चित्रा या दोन्ही बहिणींना नृत्यावर थिरकताना बघितलं आणि त्यांचं नाव ‘गजराज’ चित्रच्या राजाभाऊ परांजपे, सुधीर फडके व ग. दि. माडगूळकर या त्रिमूर्तीना सुचविलं. वाडकरांनीच तरफदारी केली म्हटल्यावर साहजिकच ‘गजराज’ चित्रच्या ‘लाखाची गोष्ट’ या आगामी चित्रपटासाठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. सिनेक्षेत्रात पदार्पण करताना ग.दि.मां.नी त्यांना रेखा व चित्रा अशी नावं दिलं. पुढे हीच नाव कायमस्वरूपी रूढ झाली. १९५२ साली त्यांचा ‘लाखाची गोष्ट’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.
‘लाखाची गोष्ट’ करीत असताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडली; या सिनेमाच्या संवादलेखनाची बाजू ग.दि.माडगुळकरां बरोबरच ग. रा. कामत हेदेखील सांभाळीत होते. तिथेच रेखाजींशी जोडी जमली. आणि १९५३ साली म्हणजे वयाच्या १९व्या वर्षीच त्यांच्या विवाह झाला. लग्नानंतर कामत पती-पत्नीचं १२-१३ वर्षांचं सहजीवन पुण्यात व्यतीत झालं. लग्नानंतर रेखा कामत यांनी एंट्री घेतली ती ‘कुबेराचं धन’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेच्या रूपाने.या चित्रपटात त्यांनी डबल रोल साकारला व त्यांची ही भूमिका खुपच गाजली; ‘गृहदेवता’ या चित्रपटाला राष्ट्रीय स्तरावर सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून रौप्य पदकान सन्मानित करण्यात आलं होतं.’बायको माहेरी जाते’ या चित्रपटात सुध्दा रेखा कामत यांनी लक्षवेधी भुमिका साकारली. कालांतरांने मुंबईत स्थायिक झाल्यानंतर रेखा कामतांनी संगीत नाटकांद्वारे रंगभूमीवर पदार्पण केलं.यामध्ये ‘सौभद्र’, ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’ यांच्यापाठोपाठ काही सामाजिक नाटकांचा सुध्दा समावेश आहे. ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘सुंदर मी होणार’, ‘लग्नाची बेडी’, ‘कल्पवृक्ष कन्येसाठी, ‘दिल्या घरी तू सुखी राहा’ अशा अनेक नाटकांमधून त्यांनी कामं केली.
‘दिवा जळू दे सारी रात’ या नाटकाने तर त्यांना अमाप लोकप्रियता मिळवून दिली. मोहन वाघा यांच्या ‘चंद्रलेखा’मधून त्यांनी ‘तरुण तुर्क..’, ‘ऋणानुबंध’, ‘प्रेमाच्या गावा जावे’, ‘गोष्ट जन्मांतरीची’ या नाटकांत ठळक व्यक्तिरेखा साकारल्या. रेखाताईंचं अभिनयाचं वैशिष्टय़ हेच की त्या जिलक्या कौटुंबिक नाटकांमध्ये सहजतेने वावरल्या तितक्याच उत्कटतेने प्रायोगिक नाटकांमध्येही रममाण झाल्या. ‘गंध निशिगंधाचा’ हे त्यांचं शेवटचं नाटक. नाटकां सोबतच छोट्या पडद्यावर सुध्दा रेखा कामतांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली;’प्रपंच’ ‘माणूस’, ‘याला जीवन ऐसे नाव’, ‘सांजसावल्या’ ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट” या मालिकेमधून रेखा कामत यंनी महत्त्वपूर्ण भुमिका साकारल्या.’वास्तुपुरुष’, ‘अगंबाई अरेच्या’ हे रेखा कामतांचे अलिकडच्या काळातले चित्रपट. आपले पती व दोन कन्या,जावई असा त्यांचा परिवार आहे.
अभिनयाच्या प्रदीर्घ कारकिर्दी साठी २००५ साली त्यांना ‘जनकवी पी. सावळाराम पुरस्कार’ , २००७ मध्ये महाराष्ट्र सरकारचा ‘जीवन गौरव पुरस्कार’ ,तर दुरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या २०१२ या वार्षीच्या ‘नवरत्न पुरस्कारांनं’ सन्मानित करण्यात आलेलं आहे.
Leave a Reply