लहान वयात पंडित हे बिरुद मिरवणाऱ्या संजीव अभ्यंकर यांना मध्य प्रदेश शासनाने ‘कुमार गंधर्व पुरस्कार’ देण्याचे जाहीर केल्याने त्यांच्या देशभरच्या रसिकांना आनंद वाटणे स्वाभाविक आहे. वयाच्या ११व्या वर्षी आपल्या गायनाने रसिकांना अचंबित करणारा हा कलाकार तेव्हापासून आजपर्यंत आपली कला सतत सादर करीतआहे.
मेवाती घराण्याचे नाव उज्ज्वल करणारे पंडित जसराज यांनी गेल्या ५० वर्षांच्या काळात आपल्या कर्तृत्वाने एक नवी वाट रुळवली. या घराण्याचे म्हणून रसिक मंडळ तयार होण्यास जसराज यांचे गायन कारणीभूत आहे, यात शंकाच नाही. अगदी लहान वयात, म्हणजे आठव्या वर्षी पं. जसराज यांच्याकडून तालीम मिळण्याचे भाग्य संजीव अभ्यंकर यांना लाभले.
वाणिज्य शाखेची पदवी घेत असतानाही त्यांच्या मनात ‘फुल टाइम’ गाणे करण्याचीच इच्छा होती. अशी इच्छा पूर्ण होण्यासाठी पालकांचे फार मोठे सहकार्य असावे लागते. संजीव यांच्याबाबतीत एक मोठा फायदा असा होता, की त्यांच्या मातोश्री श्रीमती शोभा या स्वत: उत्तम कलावंत. त्यामुळे पूर्ण वेळ गाणे करायचे, हा निर्णय फार लवकर झाला. पु. ल. देशपांडेंसारख्या मर्मज्ञ रसिकाने त्या वयात त्यांना दिलेली दाद त्यांचे भविष्य ठरविण्यास कारणीभूत होणेही स्वाभाविक होते. पं. जसराज जीवनगौरव पुरस्कार, सूररत्न यांसारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
गायनकलेमध्ये असलेले गुरूचे स्थान आजच्या तंत्रयुगातही तेवढेच राहिले आहे, कारण गाणे शिकणे म्हणजे केवळ रागाचे आरोह-अवरोह शिकणे नव्हे! राग मांडायचा म्हणजे काय, त्यात ‘मजकूर’ भरायचा म्हणजे काय, इतर कलावंतांच्या गायनापेक्षा आपले गाणे वेगळे असते म्हणजे काय, हे शिकण्यासाठी संगणक किंवा ध्वनिमुद्रिका यांचा कोणताच उपयोग नसतो.
स्वराचे भान येणे ही जी गोष्ट आहे, ती गुरूच्या समोर बसल्याशिवाय कळणेच शक्य नसते. संजीव अभ्यंकर यांना त्यांच्या गुरूकडून मिळालेली तालीम ही अशी होती. संगीताच्या क्षेत्रात कोणताही शिष्य फक्त गुरूचेच गाणे गात राहिला, तर त्याला फारसे महत्त्व मिळत नाही. कारण संगीत ही प्रवाही कला आहे. गुरूकडून मिळालेल्या विद्येमध्ये स्वत:च्या प्रतिभेने भर घालणारे शिष्य जसे गुरूचे नाव पुढे नेत असतात, तसेच संगीतकलाही प्रवाही करीत असतात.
पं. अभ्यंकर यांनी नेमके हेच केले, त्यामुळे त्यांचे गाणे मेवाती घराण्याचे असले, तरी त्याला त्यांच्या स्वप्रतिभेचाही स्पर्श झालेला असतो. त्यांनी स्वत: तयार केलेल्या बंदिशी हे त्याचे प्रतीक आहे.
देशातील जवळजवळ प्रत्येक संगीत परिषदेत आपले गायन सादर करण्याची संधी त्यांना मिळाली, याचे कारणही हेच आहे. अभिजात शास्त्रीय संगीताबरोबर पाश्र्वगायन, भावसंगीत आणि भक्तिसंगीताच्या प्रांतातही त्यांनी स्वत:ची नाममुद्रा उमटवली आहे. मध्य प्रदेश शासनाचा ‘कुमार गंधर्व पुरस्कार’ मिळाल्याने त्यांच्या गायनाला एका कलावंताने आशीर्वाद दिला आहे, असेच म्हणायला हवे!
Leave a Reply