पं. तुळशीदास बोरकर

हार्मोनियम वादक

जेष्ठ हार्मोनियमवादक पं. तुळशीदास बोरकर यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९३४ रोजी गोव्यातील बोरी येथे झाला.

पं.तुळशीदास बोरकर उर्फ बोरकर गुरुजी संवादिनी (हार्मोनियम) वादन क्षेत्रातील ऋषितुल्य नाव. आज घडीला संवादिनी अर्थात पेटीवर प्रभुत्व असणारी जी काही मान्यवर मंडळी आहेत त्यातील हे अग्रगण्य नाव होते. प्रतिकूल परिस्थितीतून काम करत गुरुजींनी स्वताला घडवलं होते. त्यामागे त्यांचा रियाज तर होताच पण संवादिनी प्रतीचं प्रेम अधिक होते.

पं.तुळशीदास बोरकर यांची मोठी बहीण, उत्तम कलागुण असलेली अभिनेत्री होती. त्यांना छोटा गंधर्वानी ‘कलाविकास’ मध्ये बोलावून घेतलं. ते त्यांच्या बरोबर तालमींना जात असत. कंपनीचे ऑर्गनवादक विष्णुपंत वष्ट यांनी विचारलं, ‘‘काय रे तुला हार्मोनियम शिकायची आहे का?’’ आणि त्यांनीच हार्मोनियम शिकवायला सुरुवात केली. त्यानंतर पुढच्याच आठवडय़ात त्यांचा नागपूरला दौरा होता. तिथे जबरदस्त थंडी होती. एक दिवस वष्ट गुरुजींनी पहाटे चार वाजता त्यांना उठवलं आणि म्हणाले, ‘‘चल शिकायला बस.’’ त्यांचीच लहानशी पेटी होती. त्यावर सात शुद्ध स्वर कसे वाजवायचे ते शिकवलं. तेव्हा सलग चार तास त्यांनी रियाज केला. मग नऊ वाजता म्हणाले, ‘‘ऊठ. चहा वगैरे घेऊन दहा वाजता परत ये.’’ त्यानंतर पुन्हा चार-पाच तास शिकायला बसले. म्हणजे त्या पहिल्याच दिवशी त्यांनी १२ ते १४ तास रियाज करून घेतला.

काही वर्षानी ‘कलाविकास’ बंद पडली. या कंपनीचे पाच-सहा मालक होते. छोटा गंधर्व, केशवराव कुंटे, शंकर आपटे, हंसराज कोरडे, नागेश जोशी, दिगंबर भुमकर. त्यापैकी दोन-तीन जणांनी मिळून १९४९-५० दरम्यान ‘श्री.कलाविकास’ ही नवीन संस्था सुरू केली. त्यात छोटा गंधर्व आणि नागेश जोशी नव्हते. ‘देवमाणूस’ हे संगीत नाटक करायचं होतं. कुंटे यांनी या कंपनीसाठी गानू मास्तरांना ऑर्गनवादक म्हणून घेतलं. पंधरा दिवस झाले तरी त्यांच्या हातात ती गाणी बसेनात. मग कुंटे म्हणाले, ‘‘तुळशीदास तू ही गाणी ऐकलीयेस. बघ जरा, बस साथीला.’’ पं.तुळशीदास बोरकर म्हणाले ‘‘मला दोन्ही हातांनी वाजवता येत नाही.’’ ते म्हणाले, ‘‘चालेल, एका हाताने वाजव.’’ ते एका हाताने ती गाणी वाजवली. त्याबरोबर त्यांनी ओळखलं की हा मुलगा हे काम निभावू शकेल. मग त्यांनी ऑर्गनची बाजू पं.तुळशीदास बोरकर यांच्या वर ढकलली. या नाटकाच्या साथीसाठी २५ रुपये महिना पगार मिळाला होता. तेव्हापासून ते जो ऑर्गन वाजवू लागले तो कायमचा. त्यानंतर साधारण १९५२ साली छोटा गंधर्वानी पं.तुळशीदास बोरकर gov ‘यांच्या कडून ‘संगीत सौभद्र’ची १२-१३ गाणी बसवून घेतली. गोपीनाथ सावकारांची संस्था होती. मग दर आठवडय़ाला ते पुण्याहून मुंबईला यायचे.

पुण्यात छोटा गंधर्वाचं आणि पं.तुळशीदास बोरकर यांचं घर जवळच होतं. ते दर रविवारी त्यांच्याकडे तालमीसाठी जाऊन बसत असे. त्यांचा रियाज चालू असायचा. छोटा गंधर्वानी त्यांना रागदारी संगीत शिकवले. पण छोटा गंधर्व नाटकात गायलेले असल्यामुळे शास्त्रीय संगीत जगतात त्यांचं फारसं नाव नव्हतं. वास्तविक पाहता छोटा गंधर्व हा अतिशय हुशार माणूस. ते शास्त्रीय संगीत शिकले होते. पण शास्त्रीय संगीत गाणारी मंडळी संगीत नाटकातल्या गायक-नटांना दुय्यम मानत असत. त्यामुळे छोटा गंधर्वाचं शास्त्रीय संगीत गायक म्हणून फारसं नाव झालं नाही. त्या दरम्यानच त्यांना ‘मंदारमाला’ नाटकात ऑर्गन वाजवायची संधी मिळाली. चाळीस रुपये बिदागी मिळत होती. तिथे पं. राम मराठेंचा त्यांना सहवास लाभला. शास्त्रीय संगीत आणि नाटय़संगीत या दोन्हींवर त्यांची हुकूमत होती. लोक त्यांना मानत होते. ते त्यांच्या गायकीचा अभ्यास करत होते आणि त्यांना गुरू मानू लागले.

पुढे पं.तुळशीदास बोरकर यांनी पी. मधुकर (मधुकर पेडणेकर) यांच्या कडे शिक्षण घेतले. तसेच पं. एस. सी. आर भट, पं. के. जी. गिंडे यासारख्या अनेक मातब्बरांचं मार्गदर्शन त्यांना मिळालं.

पं. तुळशीदास बोरकर यांनी पं. मल्लिकार्जुन मन्सूर, पं. भीमसेन जोशी, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. राम मराठे, पंडिता गंगुबाई हनगल, डॉ. प्रभा अत्रे यासारख्या दिग्गज कलाकारांना साथ केली आहे. पं.तुळसीदास बोरकर यांनी प्रा. मधुकर तोरडमल दिग्दर्शित हे बंध रेशमाचे या नाटकाचे साहाय्यक संगीत दिग्दर्शन केले होते.

पं. तुळशीदास बोरकर यांना साहित्य कला अकादमीचा पुरस्कार दोन वेळा, ‘नटवर्य केशवराव दाते पुरस्कार’, ‘गोविंदराव टेंबे संगीतकार पुरस्कार’, ‘ दिनानाथ मंगेशकर स्मृती गुणगौरव पुरस्कार’, गोवा सरकारच्या सांस्कृतिक कलासंचनालयाचा राज्य पुरस्कार, भारत गायन समाजातर्फे देण्यात येणारा ‘पं. रामभाऊ मराठे पुरस्कार’, ‘चतुरंग संगीत सन्मान पुरस्कार यासारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केल होते. संवादिनी वादनाकरिता सन्मानित केले जाणारे ते पहिले आणि मराठी मातीतले म्हणूनही ते एकमेव वादक होते.

पं.तुळशीदास बोरकर यांचे २९ सप्टेंबर २०१८ रोजी निधन झाले.

पं.तुळशीदास बोरकर यांचे मराठीसृष्टीवरील लेख.

जेष्ठ हार्मोनियमवादक पं.तुळशीदास बोरकर (18-Nov-2018)

जेष्ठ हार्मोनियमवादक पं.तुळशीदास बोरकर (18-Nov-2018)

जेष्ठ हार्मोनियमवादक पं.तुळशीदास बोरकर (29-Sep-2021)

#PtTulshidasBorkar #TulsidasBorkar

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*