भिष्णूरकर, दिवाकर नारायण (शाहिर योगेश)

Diwakar Narayan Bhishnurkar

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे शाहीर योगेश यांचा २१ ऑक्टोबर १९२८ रोजी जन्म झाला.

त्यांचे मुळ नाव दिवाकर नारायण भिष्णूरकर.  प्राथमिक शिक्षण घेत असतानाच त्यांचा यांचा संत तुकडोजी महाराजांशी संपर्क आला. त्यातून प्रेरणा घेत वयाच्या नवव्या वर्षी शाहिरीचे धडे गिरविण्यास प्रारंभ केला.

प्रापंचिक उदरनिर्वाहासाठी त्यांनी काही काळ नोकरीही केली. मात्र, नंतर त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. गोवा मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही त्यांनी डफावर थाप मारीत वीररस ओतला. ‘छत्रपती शिवरायांचा.. त्रिवार जयजयकार’, ही त्यांची ललकारी मराठी माणूस कधीच विसरणार नाही. ‘देश धरमपर मिटनेवाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी, परमप्रतापी एक ही शंभू राजा था,’ हा त्यांचा पोवाडा ऐकताच संभाजी महाराजांची मूर्तीच समोर येत असे. ‘बंबारीसे खतम ना होगा खतरा आतंकवाद का, नामोनिशाण मिटाना होगा पाकिस्तान का,’ अशी रचना करून त्यांना पाकबद्दलची चीड व्यक्त केली.

सिंदखेड राजा ते रायगड अशी जिजाऊंची पालखी सुरू करण्यात अण्णांनी पुढाकार घेतला. शीवशक ३३३ या प्रश्नावली रुपातील पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी लहान मुलांना शिवचरित्र सोपे करून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अण्णा नुसती शाहिरी गायले नाहीत तर तिच्या प्रसारासाठी ते सतत झगडत राहीले. जगत राहीले.

त्यांची ही परंपरा त्यांची मुलगी वृषाली कुलकर्णी मोठ्या जिद्दीने जतन करीत आहे. शासन दरबारी पुरस्कार मिळविण्यात अण्णा उपेक्षित राहीले, तरी समाजाच्या दरबारात त्यांना मिळालेला आदर, प्रेम आणि जिव्हाळा कितीतरी पटीने मोठा आहे, अशीच त्यांच्या सहकाऱ्यांची भावना आहे.

(महाराष्ट्र टाईम्सच्या सौजन्याने)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*